For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

यष्ट्यांमागचा ‘ध्रुव’ तारा!

Advertisement

चौथ्या कसोटीत भारतानं इंग्लंडला नमवून मालिका जिंकली अन् एक नाव सर्वांच्या तोंडी पोहोचलं...सामनावीर ठरलेला ध्रुव जुरेल...केवळ दुसराच सामना असूनही ज्या विलक्षण धैयानं नि शांतपणे त्यानं परिस्थितीचा सामना केला त्याचं भरपूर कौतुक झाल्याशिवाय राहिलेलं नाहीये...जुरेलचा आदर्श हा एम. एस. धोनी...तो पुढचा धोनी बनेल असं आताच म्हणणं धाडसाचं ठरणार असलं, तरी भारतीय संघाचा ‘ध्रुव’ तारा बनण्याची ताकद त्याच्यात निश्चितच लपलीय यात शंका नाही...

साल 2014...नोएडातील प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक फूलचंद तो दिवस कधीच विसरणार नाहीत...एक किशोरवयीन मुलगा त्यांच्या कार्यालयात दाखल झाला. त्यांनी काही विचारण्याआधीच आपलं नाव सांगून त्या मुलानं विनंती केली, ‘कृपया मला तुमच्या अकादमीत घ्या’...फूलचंद यांना त्याच्यासोबत कोणीही पालक आलेले दिसले नाहीत. त्यामुळं तो नोएडाचा स्थानिक मुलगा असावा अशी त्यांची धारणा बनली. मग तो म्हणाला, ’सर, मी आग्राहून एकटाच आलोय आणि ज्या मित्रानं त्याच्या घरी माझी राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिलं होतं तो कॉलला प्रतिसाद देत नाहीये’...

Advertisement

प्रशिक्षकांना तो मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी घरातून पळून तर आलेला नाही ना अशी शंका भेडसावू लागली. त्यामुळं त्यांनी त्याच्याकडे वडिलांचा फोन क्रमांक मागितला अन् तत्परतेनं त्यांच्याशी संपर्क साधला. वडिलांनी सांगितलं की, त्यांना सोबत यायचं होतं. पण त्यांच्या वडिलांचं श्राद्ध असल्यानं ते येऊ शकले नाहीत. शिवाय मुलानं त्यांना सांगितलं, ‘काळजी करू नका, मी आग्राहून दिल्लीला रेल्वेनं जाईन’...क्रिकेटच्या ध्यासापोटी त्या 13 वर्षांच्या मुलानं एकट्यानं केलेला प्रवास पाहूनच फूलचंद यांना जाणवलं की, त्याच्यात काही तरी खास आहे. त्यांना सुरुवातीपासून भावला तो त्याचा जबरदस्त आत्मविश्वास...

10 वर्षांनी इंग्लंडविरुद्धच्या राजकोट येथील तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 104 चेंडूंत 46 धावांची संयमी खेळी त्यानं केली तसंच रविचंद्रन अश्विनसह आठव्या यष्टीसाठी 77 धावांची मोलाची भागीदारी साकारली ती त्याच आत्मविश्वासाच्या बळावर...ध्रुव जुरेल...नोएडा येथील ‘सेक्टर 71’मध्ये आपली अकादमी चालविणाऱ्या फूलचंद यांनी प्रशिक्षण दिलेल्यांपैकी जुरेल हा कसोटी क्रिकेटच्या स्तरापर्यंत धडकलेला पहिला अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला वेगवान गोलंदाज शिवम मावीनंतरचा दुसरा खेळाडू...

ध्रुव जुरेल त्या अकादमीत दाखल झाला त्यावेळी त्याच्याकडे राहायला जागाही नव्हती. त्यामुळं फूलचंद यांनी त्याची वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली. तिथं निवासी प्रशिक्षणार्थी राहायचे. त्याचा क्रिकेटच्या विश्वातील प्रवास सुरू झाला तो अशा प्रकारे...फूलचंद म्हणतात, ‘ध्रुव लहानपणापासूनच खूप मेहनती होता आणि त्याच्यात प्रतिभाही होती. त्यामुळं आपल्या कामगिरीच्या जोरावर प्रत्येक स्तर पार करणं त्याला अवघड गेलं नाही’...

भारतीय कसोटी संघात पदार्पण केल्यानंतर लगेच समोर आलेली खडतर आव्हानं लीलया पेलताना ध्रुव जुरेलनं चुणूक दाखविली ती त्याचीच...पण राजकोटपेक्षा रांचीतील चौथ्या कसोटीत तो दोन नव्हे, दहा पावलं पुढं गेला...पहिल्या डावात ध्रुव जुरेल क्रीजवर आला तेव्हा पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पोहोचले होते. तो स्थिरावण्याआधीच आणखी दोन फलंदाजांनी परतीची वाट पकडली. त्यामुळं त्याच्यावर पाळी आली ती तळाकडच्या फलंदाजांना घेऊन झुंजण्याची...हे काम सोपं नव्हतं. कारण गरज होती ती स्वत: जलद गतीनं धावा करतानाच इतरांना शक्य तितका कमी ‘स्ट्राईक’ मिळेल याची काळजी घेण्याची...त्यात या 23 वर्षीय खेळाडूचा हा दुसराच आंतरराष्ट्रीय सामना. त्यापूर्वी जुरेल फक्त 17 प्रथम श्रेणी सामने खेळलेला...खरं तर तो जास्त धावा न करता बाद झाला असता, तरीही परिस्थिती कठीण असल्यानं आणि कसोटी क्रिकेटमध्ये नवीन असल्यानं त्याला ते अपयश सहज पचून गेलं असतं...

पण दबावाला भीक न घालता ध्रुव जुरेलनं या परिस्थितीकडे पाहिलं ते जगाला आपली ताकद, क्षमता दाखविण्याची संधी या नात्यानं...त्यानं चिवट झुंज दिली आणि प्रत्येक चेंडू जास्त जोखीम न घेता त्याच्या गुणवत्तेनुसार तो खेळला. इंग्लिश गोलंदाज त्यावेळी अव्वल लयीत होते आणि ध्रुवला ते चांगलंच माहीत होतं. दिवसाचा खेळ आणखी फलंदाज न गमावता कसा तरी संपवणं हे त्याच्यासमोरचं मुख्य उद्दिष्ट होतं. दुसऱ्या टोकाला असलेल्या कुलदीप यादवलाही त्यानं व्यवस्थित सांभाळून घेतलं. त्यामुळं दुसरा दिवस संपला तेव्हा ही जोडी नाबाद राहिली अन् भारताला 7 बाद 219 पर्यंत मजल मारता आली...

अर्धं काम फत्ते झालेलं असलं, तरी अजूनही 134 धावांनी भारत पिछाडीवर होता, हाती केवळ तीन फलंदाज शिल्लक राहिले होते. तिसऱ्या दिवशी ध्रुव जुरेल त्याच ऊर्जेनं मैदानात उतरला. त्याचं लक्ष धावफलकाकडे फारसं नव्हतं, तर व्यवस्थित खेळण्यावर भर होता. मात्र दोघांनी 76 धावांची भर घातल्यानंतर कुलदीप 28 धावांवर बाद झाला अन् जुरेलनं गीअर बदललं...बाकीचे दोन फलंदाज फारसे भरवशाचे नसल्यामुळं जास्तीत जास्त धावा जमवण्याची गरज त्यानं ओळखली. टॉम हार्टलेच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी 90 धावांच्या खेळीत एकूण चार षटकार नि सहा चौकार फटकावत इंग्लिश आक्रमणाचा त्यानं खरपूस समाचार घेतला...

आक्रमक फलंदाजी करणं आवडणाऱ्या जुरेलनं या डावात काही कमी तडजोडी केल्या नाहीत. आपल्या हातून आडव्या बॅटनं फटका खेळला जाणार नाही याची त्यानं कटाक्षानं काळजी घेतली. त्याला कट व स्वीप करायला आवडतं, पण त्या मोहाला मुरड घालून तो मुख्यत: सरळ बॅटनं खेळला. त्याचे सर्व चौकार ‘लाँग-ऑफ’ नि ‘वाइड डीप मिडविकेट’च्या दरम्यान नोंदले गेले आणि ‘थर्ड मॅन’च्या दिशेहून आल्या त्या अवघ्या चार धावा (राजकोट नि रांचीत यष्टिरक्षण करताना देखील असेल दिसले ते त्यानं हुशारीनं केलेले बदल)...ध्रुवला बहुमोल शतक हुकलेलं असलं, तरी ती खेळी भारताला भक्कम परिस्थितीत पोहोचवून गेल्याशिवाय राहिली नाही...

दुसया डावात जुरेल फलंदाजीस आला तेव्हाही भारत अडचणीतच होता पण तो नेहमीसारखा शांत अन् धैर्यानं परिस्थितीला भिडताना दिसला. 77 चेंडूंत नाबाद 39 धावा काढताना त्यानं शुभमन गिलच्या समवेत संघाची नौका वादळातून बाहेर काढून तडीस लावली....महान सुनील गावस्करना ध्रुव जुरेलची तुलना महेंद्रसिंह धोनीशी करावीशी वाटलीय अन् प्रतिस्पर्धी कर्णधार बेन स्टोक्सला देखील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारताना इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज बेन फोक्स त्याचा चाहता झालाय असं सांगावंसं वाटलं ते उगाच नव्हे!

वेगवान झेप...

  • ध्रुव जुरेलच्या सुदैवानं कारकिर्दीच्या सुऊवातीच्या काळातच तो नुसता नजरेत भरला नाही, तर त्याला वेळोवेळी संधीही मिळाली...विजय मर्चंट चषक स्पर्धेत खेळलेल्या उत्तर प्रदेशच्या 16 वर्षांखालील संघात त्यानं प्रवेश केला तेव्हा त्याला 15 वर्षं देखील झाली नव्हती. त्याला स्थान देण्यात आलं ते फलंदाज म्हणून...
  • 17 वर्षांचा होईपर्यंत तो 19 वर्षांखालील उत्तर प्रदेशच्या संघात यष्टिरक्षण सांभाळू लागला, तर 18 व्या वर्षांपर्यंत त्याला संधी चालून आली ती भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा यष्टिरक्षक बनण्याची...
  • 2020 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्यानं केवळ यष्ट्यांमागंच जबाबदारीच पेलली नाही, तर त्या भारतीय संघाचं उपकर्णधारपदही त्याच्याकडे सोपविण्यात आलं होतं. ध्रुवनं त्या स्पर्धेत आपण किती सक्षम आहोत त्याची झलक दाखविणाऱ्या काही उपयुक्त खेळी केल्या...याचीच परिणती 2021 साली त्याला देशातील प्रमुख ‘टी-20’ स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली चषकासाठीच्या उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवून देण्यात झाली...

उत्तर प्रदेश ते भारतीय संघ, व्हाया ‘आयपीएल’...

  • ‘कोव्हिड’नंतर देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटची गाडी रुळावर येईपर्यंत उपेंद्र यादव रेल्वेच्या संघात दाखल झालेला असल्यानं जुरेलसाठी आपसूक उत्तर प्रदेश संघातील जागा खुली झाली. त्यातच त्यानं पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतकं झळकावली आणि पुढील मोसमात तर कळस गाठताना नागालँडविऊद्ध 329 चेंडूंत 249 धावा केल्या. शिवाय त्या खेळीनंतर केवळी नऊ षटकांची विश्र्रांती घेऊन तो यष्टिरक्षणासाठी उतरला...
  • लवकरच उत्तर प्रदेशसाठी ध्रुव जुरेल हे नाव क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील संघांत झळकताना दिसू लागलं आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळं त्याच्याकडे चालून आला तो ‘राजस्थान रॉयल्स’चा ‘इंडियन प्रीमियर लीग’साठीचा करार...2022 च्या ‘आयपीएल’ लिलावात त्याला 20 लाखांना करारबद्ध करण्यात आलं. मात्र मुख्य संघात स्थान मिळण्यासाठी त्याला बरीच प्रतीक्षा करावी लागली...
  • शेवटी ध्रुवला संधी मिळाली ती गेल्या वर्षी...यशस्वीरीत्या पदार्पण करताना त्यानं 2023 च्या मोसमात 172 च्या ‘स्ट्राइक रेट’नं 152 धावा जमविल्या. त्याच्या भात्यात असलेले फटके अन् दबावाखाली मनमोकळेपणे खेळण्याची क्षमता यामुळं तो नजरेत भरल्याशिवाय राहिला नाही...त्यानंतर त्यानं भारत ‘अ’तर्फेही चांगली कामगिरी केली...

वडील नव्हते सुरुवातीला अनुकूल...

ध्रुव जुरेलचे वडील नेम सिंग हे भारतीय सैन्यातील निवृत्त हवालदार...त्यांनी कसा कारगिलच्या युद्धात भाग घेतला होता अन् ध्रुवनं त्यांच्या इच्छेचा मान राखून चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर कसा सैनिकी थाटात ‘सॅल्युट’ ठोकला ते आता विख्यात झालंय...पण एका टप्प्यावर जुरेल चांगली कामगिरी करत असतानाही त्याचे वडील त्यानं क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्यास फारसे अनुकूल नव्हते. त्यांना चिंता होती ती त्या खेळातील अनिश्चिततेची...त्यामुळं ध्रुवनं ‘नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी’च्या परीक्षेची तयारी करावी अशी त्याची इच्छा होती. मात्र जुरेलनं निर्णय पक्का केला होता. त्याचं एकच ध्येय होतं...मेहनत करत राहणं अन् क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावणं...

क्रिकेटसाठी जेव्हा आईला विकावे लागले दागिने

ध्रुव जुरेलकडे प्रतिभा असली, तरी घरची परिस्थिती तेवढी भक्कम नसल्यानं त्याच्यासाठी सुरुवातीला प्रवास सोपा गेला नाही...एकवेळ तर त्याला क्रिकेट किट घेता यावं यासाठी त्याच्या आईला आपले दागिने विकावे लागले...‘त्याला एक किट बॅग हवी होती, पण ती खूप महाग होती, जवळपास 6 हजार ऊपये. मी त्याला म्हणालो ’मत खेलो, इतना पैसा नहीं है’. त्यावर त्यानं स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतलं. शेवटी त्याच्या आईनं आपल्याकडील एकमेव सोनसाखळी विकून टाकण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आम्ही त्याला पहिली किट बॅग विकत घेऊन दिली होती’, नेम सिंग आठवणींना उजाळा देताना सांगतात...आज त्या सर्व त्यागांचं जबरदस्त फळ पदरात पडलंय...

खेळ जुनाच ओळख नवी ! : सायकलिंग’-‘टीम पर्स्युट’

‘टीम पर्स्युट’ हा ‘ट्रॅक सायकलिंग’मधील आणखी एक प्रकार...1908 साली तो ऑलिम्पिकमध्ये झळकला खरा, पण त्यावेळी तो पुरुषांपुरता मर्यादित होता. 2012 मध्ये महिलांची शर्यत त्यात जोडण्यात आली...सुरुवातीला महिलांसाठी 3 हजार मीटर्स अंतराची प्रत्येकी तीन सायकलस्वारांच्या संघांसह शर्यत झाली होती. परंतु 2016 मधील रिओ ऑलिम्पिकपासून पुऊष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये संघांसाठी समान प्रमाणात अन् समान अंतराची शर्यत होऊ लागली...

  • या प्रकारात प्रत्येक संघ चार रायडर्सचा बनलेला असतो, जे 16 फेऱ्यांमध्ये (4 हजार मीटर्स) एर्वत्रितरीत्या शर्यत करतात. तिसऱ्या सायकलस्वाराच्या सायकलचे पुढचे चाक अंतिम रेषा ओलांडते ती वेळ जमेस धरली जाते...
  • यात संघाचा ‘लीड रायडर’ तिरकस वळणावर वर जातो आणि नंतर खाली उतरून शेवटच्या सायकलस्वाराच्या मागे येऊन मिळतो...या प्रकारात तांत्रिक कौशल्य, ‘एअरोडायनॅमिक्स’साठी उपकरणांच्या नवकल्पना तसंच वेग आणि रणनीती यांचा कस लागतो...
  • संघातील ताकदवान सायकलस्वार शेवटच्या टप्प्यासाठी शक्ती वाचवून ठेवणे पसंत करत असतात. रायडर्सना एकमेकांच्या क्षमता चांगल्या प्रकारे माहीत असणं आवश्यक असतं आणि किमान तीन सायकलस्वार शेवटपर्यंत एकत्र राहतील याची काळजी घ्यायची असते..संघाला पाच सायकलस्वारांचा समावेश करून वेगवेगळी समीकरणे वापरून प्रत्येक फेरीत चार जणांना उतरविण्याची परवानगी असते...
  • एखाद्या संघाला तीन फेऱ्या पार कराव्या लागतात...पहिली पात्रता फेरी, जिथं प्रत्येक संघ एकटाच ‘ट्रॅक’वर राहतो. त्यांचं लक्ष्य शक्य तितका जलद वेळ नोंदविण्याचं असतं. त्यांना 4 किलोमीटरांचं अंतर कापावं लागतं (16 फेऱ्या)....
  • सर्वांत जलद आठ संघ पहिल्या फेरीत पोहोचतात आणि मानांकनानुसार कुठल्या संघानं कुठल्या संघाचा मुकाबला करायचा ते ठरविलं जातं. उदाहरणार्थ 1 वि. 8, 2 विरुद्ध 7 अशा प्रकारे...
  • शेवटच्या दोन फेऱ्यांतील विजेते अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी स्पर्धा करतात, तर या फेऱ्यांतील पराभूत संघांच्या वेळा आणि पहिल्या दोन फेऱ्यांतील संघांच्या वेळा एकत्रित केल्या जातात. त्या सहापैकी दोन वेगवान संघ कांस्यपदकासाठीच्या फेरीत प्रवेश करतात.
  • त्यानंतर पदकं संघांच्या सरळ मुकाबल्यात ठरविली जातात. तिथं विजेता एकतर वेगवान वेळेच्या आधारे किंवा विरोधी संघाला गाठल्यानं ठरतो. जर संघ त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला पकडण्याच्या जवळ म्हणजे एक मीटरवर पोहोचला, तर तो आपोआप जिंकतो..

- राजू प्रभू

बुद्धिबळातील लिटल मास्टर -  इथन वाझ

विश्वातील सर्वात लहान इंटरनॅशनल मास्टर

व्याच्या 12 वर्षीय इथन वाझने बुद्धिबळ खेळात इंटरनॅशनल मास्टर (आयएम) किताब पटकावून सर्वात लहान वयातील लिटल मास्टर बनण्याचा मान प्राप्त केला आहे. लहान वयात त्याची ही महान कामगिरी क्रीडा क्षेत्रात विस्मयकारक ठरली आहे.  गोवा तसेच भारतासाठी त्याची ही कामगिरी गौरवास्पद आहे. सहा महिन्यापूर्वी त्याला फिडे मास्टर किताब प्राप्त झाला होता. इथनने गोवा राज्य तसेच भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 15 आंतरराष्ट्रीय, 14 राष्ट्रीय व पन्नासच्यावर राज्य पातळीवरील पुरस्कार पटकाविले आहेत. आयएम बनण्यासाठी लागणारा तिसरा नॉर्म त्याने बुडापेस्ट-हंगेरी येथे 3 जाने. 2024 रोजी झालेल्या स्पर्धेत मिळविला. त्यापूर्वी पहिला नॉर्म त्याने अबुधाबी व दुसरा नॉर्म हंगेरी येथे झालेल्या स्पर्धेत मिळविला होता. इथनचे फिडेमानांकन 2400 च्या वर आहे. राय सालसेत येथील इथन मडगावच्या किंगस् स्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिकत आहे. 2017 पासून त्याचा बुद्धिबळातील खेळातील प्रवास सुरु झाला. सुरुवातीला स्थानिक स्पर्धेत तो सहभागी झाला. यश अपयशाला सामोरे जात आज तो अभिमानास्पद कामगिरी बजावत आहे. 2023 साली त्याने 12 वर्षा खालील गटात ब्लीट्झमध्ये विश्व क्रमांक 1 व क्लासिकल बुद्धिबळात विश्व क्रमांक 2 चे स्थान मिळविले आहे. गेल्या पाच वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवित असताना राज्य पातळीवरील स्पर्धेत पाच वेळा अजिंक्यपदे प्राप्त केली आहे.

आईवडिलांचा पाठिंबा

इथनच्या वाटचालीस त्याचे वडिल एडवीन व आई लिंडा यांचा त्याला सर्वाधिक पाठिंबा मिळत आहे. याशिवाय किंगस् स्कूलचे संचालक लिगीया परेरा, चेअरमन मेलवीन परेरा, आयएम सागर शाह, चेस बेज इंडिया, आजी अॅलिजा फर्नांडिस व आजोबा मारियानो तसेच नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांचे सहकार्य मिळत आहे. त्याला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या गोवा बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे इथनच्या आई लिंडा यांनी आभार मानले आहे.

मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गौरव

इथनच्या या अलौकिक कामगिरीमुळे अनेक संस्थांनी त्याचा गौरव केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे व इतर मान्यवरांतर्फे त्याचा गौरव करण्यात आला आहे.

विश्व चॅम्पियन बनण्याचे स्वप्न

बुद्धिबळ खेळाप्रती आवड, समर्पित भावना यामुळे इथनने ऐतिहासिक यश मिळविले आहे. कोरोना काळात फिडे मानांकन स्पर्धा खंडित झाल्या होत्या. दोन वर्षे आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या नाहीत. त्यापूर्वी त्याचे 1384 इलोगुण होते.  2022 सालानंतर केवळ नऊ महिन्यात त्याने 2058 इलो गुणावर झेप घेतली. आता त्याचे 2403 इलोगुण आहेत. त्याच्या यशात त्याला प्रशिक्षक प्रकाश विक्रम सिंग व जीएम स्वयम मिश्रा यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. भविष्यातील योजनाबद्दल विचारले असता, इथन म्हणाला की आपल्याला ‘ग्रँडमास्टर’ बनण्याची इच्छा आहे. त्यानंतर ‘सुपर ग्रँडमास्टर’चे ध्येय ठेवले असून ‘विश्व चॅम्पियन’ होण्याचे स्वप्न बाळगल्याचे त्यांने सांगितले.

आर्थिक पाठबळाची गरज

इथनची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळाची गरज भासणार आहे. त्याच्या कुटुंबासाठी हे एक आव्हान आहे. प्रगत प्रशिक्षणासाठी तसेच देशात व परदेशात सहभागी होण्यासाठी बराच खर्च येत असतो. यासाठी पुरस्कर्त्यांकडून तसेच शासनाकडून त्याला मदतीची अपेक्षा आहे. लहानातली लहान मदत सुद्धा इथनचे स्वप्न पूर्ण करण्यास साहाय्य करेल. यासाठी त्याच्या हितचिंतकांकडून मदत गोळा करण्यास प्रारंभ केला आहे. ज्याप्रमाणे इथन वाझ बुद्धिबळ खेळात प्रगती साधून यशोशिखरे गाठत आहे. त्यानुसार ग्रँडमास्टर व विश्व चॅम्पियन होण्याची त्याची स्वप्ने साकार होवो!

- नरेश गावणेकर

Advertisement
Tags :

.