महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स mania

06:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विश्वचषकातून ‘उदय’ !

Advertisement

‘आयसीसी’च्या वरिष्ठ स्तरावरील विश्वचषकाइतकं नसलं, तरी 19 वर्षांखालील ‘वर्ल्ड कप’लाही मागील दोन दशकांत भरपूर महत्त्व आलंय...प्रत्येक स्पर्धेतून किमान भारताच्या बाबतीत तरी काही ‘स्टार्स’ उगवल्याशिवाय राहिलेले नाहीत. यंदाचा विश्वचषक देखील त्याला अपवाद राहिलेला नसून त्यावर छाप उमटविलेल्यांमधील एक प्रमुख नाव...कर्णधार उदय सहारन...

Advertisement

युवराज सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, के. एल. राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल...या साऱ्यांचं एकसमान वैशिष्ट्या ते कुठलं ?...त्यांचा क्रिकेटच्या क्षितिजावर खरा उदय झाला तो 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून...परंतु या स्तरावर भरारी घेतल्यानंतर ती टिकवून ठेवणं, वरिष्ठ पातळीवरील आव्हानांना पुरुन उरणं अन् आपल्या प्रतिभेला न्याय देणं ही सोपी गोष्ट नव्हे. या स्पर्धेतील जबरदस्त कामगिरीनं मिळवून दिलेल्या झटपट ‘स्टारडम’नंतर त्याची पुनरावृत्ती घडविण्यात अपयशी ठरलेली, हरवलेली नावं त्याची साक्ष पुरेपूर आणून देतात...

नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकाच्या सुऊवातीपासूनचा विचार केल्यास रीतिंदर सिंग सोधी, गौरव धीमांसपासून ते उन्मुक्त चंद, हरमीत सिंग, विजय झोल, संदीप शर्मा, अजितेश अर्गल, कमल पासी, सिद्धार्थ कौल, स्मित पटेल, रविकांत सिंग व कमलेश नागरकोटी अशी ही यादी देखील खूप मोठी...पृथ्वी शॉसारख्या खेळाडूनंही पकड गमावलीय आणि त्याच्यावर आता पाय रोवण्यासाठी धडपडण्याची पाळी आलीय. यश धुलसारख्या काहींची स्थिती सुद्धा तशीच...या पार्श्वभूमीवर यंदाच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात ज्यांनी ठसठशीत छाप उमटविलीय त्यापैकी किती जण अपेक्षांना जागू शकतील ?...

याबाबतीत एका खेळाडूवर सध्या नजरा जास्तच टिकलेल्या असून ‘बड्या लीग’मध्ये सामील होण्याची ताकद बाळगणारं नाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय...खुद्द 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार...उदय सहारन...वरिष्ठांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतानं अक्षरश: ‘रोड रोलर’ चालविल्यागत सर्वांना आडवं केलं होतं, पण अंतिम फेरीत त्यांना पीट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियापुढं हात टेकावे लागले. सहारनचा चमू त्याचे उट्टे काढेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र त्यांचीही गत झाली ती नेमकी रोहित शर्माच्या संघासारखीच...परंतु म्हणून उदयनं बजावलेल्या भूमिकेचं महत्त्व कमी होत नाहीये...

खरं तर या स्पर्धेत सुरुवातीपासून भारताचा सर्वाधिक चर्चेत राहिलेला फलंदाज होता मुशिर खान, गुरुवारपासून सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठीच्या संघात वर्णी लागलेल्या सर्फराझ खानचा भाऊ. पण उदय सहारन शांतपणे आपलं काम करत राहिला...बांगलादेशविऊद्धच्या पहिल्या सामन्यात भारतानं झटपट दोन फलंदाजांना गमावल्यानंतर त्यानं 64 धावांची मोलाची खेळी करण्याबरोबर आदर्श सिंगला जास्त संधी देत त्याला साथ देण्याची भूमिका पत्करली...आयर्लंडविरुद्ध मुशिरच्या शतकापुढं त्याच्या 75 धावा झाकोळल्या गेल्या. अमेरिका नि न्यूझीलंडविऊद्ध अनुक्रमे 35 आणि 34 धावा केलेल्या उदयनंही नेपाळविऊद्ध शतक झळकावलं होतं. मात्र त्यापेक्षा अधिक प्रशंसा झाली ती सचिन धसच्या शतकाची (धससह त्यानं 215 धावांची जबरदस्त भागीदारी केली)...तथापि, शेवटी 397 धावांसह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला तो सहारनच..

उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या सामन्यात त्याच्या नेतृत्व नि फलंदाजीतील कौशल्याचा खरा कस लागला...उदय मैदानात उतरला तेव्हा 245 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघाची 2 बाद 8 अशी अवस्था झालेली. यजमानांची वेगवान जोडी क्वेना माफाका आणि ट्रिस्टन लुअस यांच्याकडून तिखट मारा चालला होता. त्यापुढं लवकरच भारताची अवस्था 4 बाद 32 अशी आणखी घसरली...पण भारतीय कर्णधारानं दबाव वाढत चाललेला असताना न डगमगता आपला साथीदार सचिन धसला सतत बोलून धीर देत, डाव सावरत आदर्श कर्णधाराचे गुण दाखविले...

या दोघांनी मग पाचव्या यष्टीसाठी भागीदारी केली ती 171 धावांची. यात आक्रमक भूमिका बजावत होत तो धस, तर सहारन एक बाजू पकडून हळूहळू धावांची भर घालत गेला. 81 धावा काढताना तो शेवटपर्यंत टिकून राहिला. त्यामुळं भारताला दोन गडी राखून विजय मिळवत सलग पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली...सामनावीर ठरलेल्या उदयनं या लढतीनंतर बोलताना भर दिला तो ‘आत्मविश्वासा’वर अन् श्रेय दिलं ते वडिलांच्या शिकवणीला...‘मला स्वत:वर विश्वास होता. मला खेळात खोलवर घुसावं लागलं. सामना जिंकण्यासाठी फक्त एक भक्कम भागीदारी हवी होती आणि घडलं नेमकं तसंच. माझे वडील मला खेळात खोलवर घुसण्यास, मोठे फटके आधी नव्हे, तर शेवटच्या टप्प्यात हाणायला सांगायचे’, उदय सहारनचे शब्द... संपूर्ण विश्वचषकात शानदार कामगिरी केलेला हा फलंदाज स्पर्धेत पहिल्यांदाच एकेरी धावसंख्येवर बाद झाला तो नेमका ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या अंतिम सामन्यात...अवघे 18 चेंडू त्याला खेळता आले अन् 8 धावा काढल्यानंतर 17 व्या षटकातच महली बियर्डमनच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार ह्यू वेबगेननं झेल टिपत पॅव्हेलियनची वाट दाखविली. 13 व्या षटकात मुशिर खान स्वस्तात बाद झाल्यानंतर लगेच बसलेला हा आणखी एक जबरदस्त धक्का होता. त्यामुळं भारताची 3 बाद 55 अशी घसरण झाली. मग त्यातून ते सावरू शकले नाहीत...

फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला अधिक प्रभावी वाटते ती उदयची मानसिकता. त्याची तुलना वरिष्ठ संघासाठी ‘फिनिशर’च्या भूमिकेत प्रभावी कामगिरी केलेला उदयोन्मुख स्टार रिंकू सिंगशी करण्याचा मोह त्याला आवरलेला नाही...‘बरेच जण उदय सहारनला या विश्वचषकाचा शोध म्हणू लागले आहेत. संघातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणारा तो पहिला कर्णधार. पण हे धावांच्या बाबतीत नाही, मला प्रभावित केलंय ते उदय सहारनच्या सामना जिंकण्याच्या क्षमतेनं, तो ज्या संयमानं खेळतो त्यानं...काहीसं रिंकू सिंग सारखंच. मी नुकतंच सांगितलंय त्याप्रमाणं हे पैशांनी विकत घेतलं जाऊ शकत नाही. उदय सहारनच्या मनात ते रुजलंय. तो शांत, संयमी आणि आत्मविश्वासानं भारलेला आहे’, अश्विन म्हणतो...

19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा सहावा भारतीय कर्णधार बनण्याची संधी हुकल्यानंतर उदय सहारन काय म्हणाला ते नजरेखालून घालण्यासारखं...‘सुऊवातीपासून खूप काही शिकायला मिळालं. मी कर्मचाऱ्यांकडून आणि सामन्यांदरम्यानही खूप काही शिकलोय. आम्ही शिकत राहण्याचा आणि अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करू’...सहारन याच वृत्तीनं पुढं जात राहिला, तर एक दिवस वरिष्ठ स्तरावर हे नाव गाजण्यास फारसा वेळ लागणार नाही !

विश्वचषकातील सातत्य...

क्रिकेटसाठी...राजस्थान ते पंजाब !

19 वर्षांखालील वाटचाल...

खेळ जुनाच ओळख नवी ! ‘सायकलिंग - कीरिन’

‘कीरिन’...म्हणजे ‘ट्रॅक सायकलिंग’मधील आणखी एक प्रकार. त्याचा अर्थ ‘रेसिंग सायकल’. यामध्ये ‘ट्रॅक’वरील सायकलस्वार ‘मोटार’युक्त किंवा ‘बिगरमोटार’युक्त ‘पेसर’च्या मागं गतीवर नियंत्रण ठेवून सुटतात अन् नंतर वेग पकडतात. 1948 च्या आसपास जपानमध्ये हा प्रकार विकसित झाला आणि 2000 मध्ये सिडनी, ऑस्ट्रेलिया इथं झालेल्या स्पर्धेपासून तो ऑलिम्पिकचा भाग बनला...

- राजू प्रभू

कोल्हापूर कुस्तीला बहर...

कुस्तीची परंपरा कायम : बऱ्याच वर्षांनी शाहू खासबाग मैदान कुस्ती प्रेमींनी भरले

कोल्हापूर अन् कुस्ती म्हंटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते राजर्षी शाहू महाराजांचं. मल्लविद्येची मायभूमी असलेल्या महाराष्ट्रात कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू यांचा काळ हा मल्लविद्येचा वैभवकाळ समजला जात होता. मल्लविद्येला शाहू महाराजांमुळेच राजाश्रय मिळाला. पंजाबमध्ये विकसित झालेला हा खेळ महाराष्ट्रात विकसित करण्याचे श्रेय छत्रपती शाहू महाराजांना आहे. त्यांनी कोल्हापूरात 1895 मध्ये सर्वप्रथम जुन्या राजवाड्यातील विस्तीर्ण मोतीबागेत तालीमखाना सुरू केला. तालमीच्या प्रवेशद्वारावरच महाराजांनी ‘पहिली शरीरसंपत्ती, दुसरी पुत्रसंपत्ती आणि तिसरी धनसंपत्ती ज्याकडे असेल तोच खरा पुण्यवान. असा फलक लावला आणि कुस्तीला बळकटी दिली. म्हणुनच कोल्हापुरात आजही कुस्तीचा सुवर्णकाळ अनुभवायला मिळत आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरात खास कुस्तीसाठी भारतीय कीर्तीचे असे खासबाग मैदान उभारले. श्रीपती खंचनाळे, गणपत आंदळकर, मारुती माने यांसारखे हिंदकेसरी तर ऑलिंपिक क्रीडासामन्यात भाग घेणारे मल्ल खाशाबा जाधव, श्रीरंग जाधव, माणगावे मास्तर यांसारखे सुप्रसिद्ध मल्लही याच लाल मातीत तयार झाले आहेत.  याच खासबाग मैदानात माजी खासदार संभाजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पैलवानांच्या रविवारी झालेल्या कुस्ती मैदानाने कोल्हापूर कुस्तीला पुन्हा एकदा बहर आल्याचे दिसुन आले. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहिलेल्या स्वराज्य केसरी आंतराराष्ट्रीय निकाली कुस्ती मैदान पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, सातारा, सांगली पश्चिम महाराष्ट्रासह परराज्यातील कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.

ना उन्हाची तमा.. ना थंडीची काळजी.. लक्ष फक्त डावपेचांकडेच

बऱ्याच वर्षांनी शाहू खासबाग मैदान कुस्तीप्रेमींनी खचाखच भरले होते. त्यामुळे लाल मातीतील कुस्तीची लोकप्रियता अजुनही कुस्ती शौकीनांच्या हृदयात ठासून भरल्याचे दिसुन आले. स्वराज्य केसरीचे मैदान पाहण्यासाठी दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत कुस्ती शौकीनांनी तोबा गर्दी केली होती. ना उन्हाची तमा.. ना थंडीची काळजी उपस्थितांचे लक्ष होते ते केवळ आणि केवळ कुस्तीतील पैलवानांच्या डावपेचांकडेच. आणि म्हणुनच कुस्तीला झालेली गर्दी पाहुन पुन्हा एकदा कुस्तीचा सुवर्णकाळ अनुभवयाला मिळाला.

तरच कुस्ती जीवंत राहील...

कोल्हापुरला कुस्तीची परंपरा आहे. कुस्ती शौकीनांसह येथील मल्ल देशात चमकले आहेत. असे असताना कोल्हापुरात किमान वर्षाला आठ ते दहा मैदाने भरविली पाहिजेत. पण तसे होताना दिसत नाही. हे शक्य करयाचे असेल तर कोल्हापुरातील बडे राजकीय नेते, कारखानदार, उद्योजक, तालीम संस्था यांनी पुढाकार घेवून सहा महिन्यातून मैदानाचे आयोजन होऊ शकते. पैलवानांचा नेहमी सराव तर असतोच पण स्पर्धा भरविल्याने पैलवानांच्यात एक नवी उर्जा निर्माण होते. यातून झालेल्या गौरवातून कुस्ती जीवंत राहण्यास नक्कीच मदत होईल.

चांदीची गदा देण्याची परंपरा

1913 साली शाहू खासबाग मैदानात खलिफा गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष (विश्वविजेता मल्ल गामाचा भाऊ) पैलवान यांच्यात पहिली कुस्ती रंगली. त्यात पैलवान इमामबक्ष विजयी झाला. यात इमामबक्षला शाहू महाराजांनी चांदीची गदा बक्षीस म्हणून दिली आणि तेंव्हापासूनच विजेत्या मल्लास चांदीची गदा देण्याची प्रथा भारतामध्ये चालू झाली. आजही ही परंपरा कायम आहे.

...तर वर्षभरात किमान सहा कुस्ती मैदाने शक्य

राजर्षी शाहूंच्या काळात दर महिन्याला दोन कुस्तींची मैदाने होत असत. दिवाळी नंतर कुस्ती हंगामाला सुरूवात होते. सद्यस्थितीत वर्षभरात किमान सहा कुस्त्यांचे मैदाने होण्यात काहीच अडचणी नाहीत. यासाठी कोल्हापुरातील राजकीय नेते, सहकारी संस्था, उद्योजक, कारखानदार यांच्या पुढाकाराची गरज आहे. प्रशासकीय पातळीवरही दरवर्षी एखादे मैदान भरविणे शक्य आहे. अशा कुस्ती मैदानामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मल्ल तयार तर होतीलच शिवाय शाहूंच्या कुस्ती पंढरीला उर्जिता आवस्था आणून नक्कीच कुस्ती जीवंत ठेवता येईल.

- अशोक पोवार, सचिव, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ

थरार अनुभवण्यासाठी सुमारे वीस हजार कुस्ती शौकीनांची हजेरी

हलगीचा ठेका... तुतारीचा निनाद..., तांबड्या मातीत श•t ठोकत एकमेकांना आव्हान देणारे पैलवान... व हजारो कुस्तीप्रेमींच्या टाळ्या-शिट्ट्यांनी गजबणारे राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदान असेच चित्र स्वराज्य केसरी कुस्ती मैदानावेळी झाले होते. यातून कुस्तीवर असणारे प्रेम, इर्ष्या, चुरस, जल्लोष कुस्ती शौकीनांच्यातून अधोरेखित झाले. या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर (पुणे) याने इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल महदी इराणी नाकपटी डावावर आसमान दाखविले. तर दुसऱ्या लढतीत महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर ) याने आंतरराष्ट्रीय विजेता मल्ल हादी इराणी (इराण) याला घुटना डावावर चितपट केले. तिसऱ्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ (पुणे) याने पंजाबचा आंतरराष्ट्रीय पैलवान लवप्रित खन्नाला धुळ चारत शौकीनांची वाहवा मिळवली. व असे मैदाने वारंवार भरविली जावी अशी आशाही व्यक्त केली.

- इम्रान गवंडी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article