For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

संजू बदललाय...

Advertisement

‘इंडियन प्रीमियर लीग’मधील यंदाची धमाकेदार कामगिरी संजू सॅमसनला ‘टी-20’ विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात स्थान देऊन जाईल हे निश्चित होतं...नेमकं तसंच घडलेलं असून यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये कर्णधार व फलंदाज या नात्यानं दर्शन घडलंय ते केरळच्या सदर खेळाडूच्या वेगळ्याच अवताराचं...

यंदाची ‘आयपीएल’ सुरू झाली त्यावेळी तो इतकी जबरदस्त छाप उमटवेल याची कल्पना क्वचितच कुणी केलेली असेल...मुख्य म्हणजे त्यानं जवळपास प्रत्येक डावात मोठी धावसंख्याच उभारलेली नाही, तर तसं करताना विविध भूमिकाही लीलया पार पाडल्या...कधी तो ‘फिनिशर’ राहिला (लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध नाबाद 71 आणि मुंबई इंडियन्सविऊद्ध नाबाद 38), कधी त्यानं डावाची व्यवस्थित उभारणी करून शेवटच्या टप्प्यात मनसोक्त फटकेबाजीला वाव दिला (एलएसजीविऊद्ध नाबाद 82 अन् गुजरात टायटन्सविऊद्ध नाबाद 68), तर कधी लक्ष्याचा पाठलाग करताना पाया घालून देणारा मुख्य आधार बनणं पसंत केलं (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध 69)...ही हातोटी त्याला आणखी वैशिष्ट्यापूर्ण ठरवून गेलीय. जोडीला यंदाच्या स्पर्धेनं दाखवून दिलंय ते फलंदाज या नात्यानं त्याचं वेगळंच रूप...या साऱ्यांचा परिपाक म्हणजे...‘संजू इज बॅक’...‘राजस्थान रॉयल्स’चा कर्णधार नि यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन...

Advertisement

संजूनं यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये लावलेला धडाका अन् आपला उंचावलेला खेळ पाहता अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीचा भारतीय संघ ठरविताना निवड समितीला त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच होणार नाही हे स्पष्ट होतं. कारण रिषभ पंत वगळता त्यांच्यासमोर समर्थ असा दुसरा कोणताही पर्याय नव्हता...खरं तर हा 29 वर्षीय खेळाडू बऱ्याच काळापासून संघाचं दार ठोठावत होता. परंतु अनेक वेळा नकार वाट्याला येऊनही त्यानं आशा सोडली नाही. ‘अपना टाइम आएगा’ यावर विश्वास ठेवून संजू सॅमसन शांतपणे प्रतीक्षा, प्रयत्न करत राहिला. त्याचं फळ मिळालंय...आता लहानपणापासून पाहिलेलं देशातर्फे विश्वचषक खेळण्याचं स्वप्न साकार करण्याच्या तो अगदी उंबरठ्यावर पोहेचलाय...

संजू सॅमसनचं यष्टिरक्षण अन् त्याची फलंदाजी, खास करून फटकेबाजीच्या कौशल्याविषयी वाद कधीच नव्हता. तरीही त्याच्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष झालं. याचं कारण गुणवत्तेला न्याय देण्यात त्याला यापूर्वी आलेलं अपयश...‘आयपीएल’मध्ये सुरुवात धडाकेबाज पद्धतीनं करायची अन् नंतर आलेख घसरत जायचा ही त्याच्या बाबतीत नेहमी दिसून आलेली गोष्ट. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गेल्या वर्षीचा मोसम. सुऊवातीला काही धमाकेदार अर्धशतकं झळकावल्यानंतर तो हरवला. या पार्श्वभूमीवर यंदाही त्याच पद्धतीनं सुरुवात केल्यानंतर संजू नेहमीचा कित्ता गिरविणार अशी अटकळ बांधली जात होती...

मिळालेल्या संधीचा फायदा घेता न येणं, मोक्याच्या क्षणी न खेळणं, चांगली सुरुवात करूनही ती दवडणं यामुळं संजू सॅमसनच्या हाती नारळ देणं निवड समितीला फार सोपं गेलं. परिणामी तो संघात कमी अन् बाहेर जास्त राहिला...मात्र यावेळी त्यानं कसल्याच आक्षेपाला जागा राहू दिली नाही...यंदाच्या ‘आयपीएल’मधून संजूचा फलंदाज नि कर्णधार म्हणूनही दिसलाय तो वेगळाच अवतार...लखनौ सुपर जायंट्सविऊद्धचा सामना हे त्याच्या नव्या दमाचं ज्वलंत उदाहरण. लखनौच्या प्रभावी माऱ्यासमोर 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं नव्हतं. त्यात जोस बटलरला खूप लवकर गमावलेलं. पण नवव्या षटकातील 3 बाद 78 अशा स्थितीतून संघाला बाहेर काढत सॅमसन (33 चेंडूंत सात चौकार नि चार षटकारांसह नाबाद 71 धावा) अन् ध्रुव जुरेल (34 चेंडूंत नाबाद 52) यांनी एक षटक शिल्लक असताना सात गडी राखून विजय मिळवून दिला...

फिरकीस काहीशा पोषक खेळपट्टीवर संजू सॅमसननं फिरकीपटूंचा, विशेषत: रवी बिश्नोईचा ज्या प्रकारे सामना केला ते दिग्गजांच्या नजरेत भरल्याशिवाय राहिलेलं नसेल. बिश्नोईनं टाकलेलं 16 वं षटक सुरू झालं तेव्हा राजस्थान रॉयल्स लक्ष्यापासून बरंच दूर होतं. पण सॅमसननं त्या लेगस्पिनरला दोन चौकार नि एक षटकार फटकावत ते अंतर भरून काढलं...मात्र हीच आक्रमकता त्यानं डावखुरा फिरकीपटू कृणाल पंड्याच्या अचूक माऱ्याविरुद्ध हुशारीनं दाखविली नाही अन् एक-दोन धावा काढत धावफलक हलता ठेवण्यास प्राधान्य दिलं. पूर्वीचा सॅमसन असता, तर अशा स्थितीत गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याच्या नादात खराब फटका खेळून त्यानं परतीची वाट धरली असती...परंतु यावेळी त्यानं संयमानं वाट पाहिली अन् वेळ आल्यावर तो तुटून पडला. आपल्या कौशल्याला दिलेला आवश्यक आकार अन् दृष्टिकोनात केलेला बदल यामुळं भूतकाळापेक्षा संजू आज जास्त उपयुक्त बनलाय हे कुणीही नाकारू शकणार नाही...

संजू सॅमसन ‘आयपीएल’मधील फलंदाजांच्या यादीत सध्या सहाव्या स्थानावर पोहोचलेला असून त्यानं 385 धावा खात्यात जमा केल्याहेत त्या 77 च्या सरासरीनं अन् 161.08 च्या ‘स्ट्राइक रेट’नं (यात काल गुरुवारी झालेल्या सामन्याचा समावेश नाही)...‘स्ट्राईक रेट’मध्ये त्याच्यापेक्षा सरस आहे तो फक्त ‘कोलकाता नाइट रायडर्स’चा सलामीवीर फिल सॉल्ट (180)...भारतीय संघातील दुसऱ्या यष्टिरक्षक-फलंदाजाच्या स्थानासाठी संजूची मुख्य शर्यत होती ती के. एल. राहुलशी. पण राहुलचा अनुभव भरपूर जास्त असला, तरी वरील सर्व आघाड्यांवर तो त्याच्याहून बऱ्याच पिछाडीवर राहिलाय (सरासरी 42, तर स्ट्राइक रेट 144)...

संजू सॅमसनच्या फलंदाजीचं एक वैशिष्ट्या म्हणजे फिरकी गोलंदाजांवर चाल करून जाण्याचं, त्यांना षटकार हाणण्याचं कसब. याबाबतीत आपल्या खेळाला तो मेहनतीनं पैलू पाडत गेलाय. 2013 ते 2019 पर्यंत त्याचा ‘स्ट्राइक रेट’ 122 च्या घरात होता. त्यानंतर त्यानं तो 155 पर्यंत वाढला. याभरात स्वाभाविकपणे षटकारांच प्रमाणंही वाढलं. ‘आयपीएल’मध्ये 2020 पासून त्याच्या इतकी षटकारांची बरसात (110) अन्य कुठल्याच फलंदाजाला करता आलेली नाहीये. या पार्श्वभूमीवर कॅरिबियन प्रदेशातील संथ खेळपट्ट्यांवर संजूसारखा नैसर्गिक हिटर खूप कामी येऊ शकतो...

कुठल्याही स्थानावर येऊन खेळण्याची क्षमता हे संजू सॅमसनचं पारडं जड करणारं आणखी एक वैशिट्या...फक्त यष्टिरक्षक-फलंदाज म्हणूनच नव्हे, तर निव्वळ फलंदाज म्हणून देखील तो ंसंघात फिट बसू शकतो अन् तिसऱ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करू शकतो (या स्थानावर ‘आयपीएल’मध्ये त्याच्या पेक्षा जास्त धावा जमविल्याहेत त्या फक्त सुरेश रैनानं)...निवड समितीनं संजूला स्थान दिलंय ते या सर्व बाबींचा विचार करूनच...

संजू सॅमसनची स्पर्धा होती ती जितेश शर्मा नि ध्रुव जुरेलशी. पण सॅमसन पहिल्या ते पाचव्यापर्यंतच्या कुठल्याही क्रमांकावर येऊन जशी सहज फलंदाजी करू शकतो तशी लवचिकता त्यांच्याजवळ नाही. जुरेल नि शर्मा हे खाली येऊन फलंदाजी करू शकतात, पण सलामीला किंवा तिसऱ्या स्थानावर ते येत नाहीत. खेरीज संजू हा पहिल्या चेंडूपासूनच ‘टॉप गिअर’ टाकू शकणारा खेळाडू...आता त्याच्यापुढं आव्हान आहे ते मिळालेल्या संधीचं ‘आयपीएल’प्रमाणं विश्वचषकात सुद्धा सोनं करून दाखविण्याचं !

संजू सॅमसनची वाटचाल...

  • 11 नोव्हेंबर, 1994 रोजी केरळातील पुल्लुविला गावात जन्मलेल्या संजू सॅमसनकडे वयाच्या 20 व्या वर्षी केरळच्या रणजी संघाचं कर्णधारपद चालून आलं...
  • देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या नैसर्गिक गुणवत्तेचा झालेला गाजावाजा 2012 मध्ये ‘आयपीएल’चा करार मिळवून देण्यास कारणीभूत ठरला. त्याला सर्वप्रथम करारबद्ध केलं होतं ते कोलकाता नाइट रायडर्सनं 8 लाख ऊपयांना...
  • संजूला ‘केकेआर’तर्फे एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु 2013 साली राजस्थान रॉयल्सनं त्याला 10 लाख ऊपयांना खेचलं आणि हा बदल त्याच्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरला...
  • पदार्पणातच रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्ध 41 चेंडूंत 63 धावा फटकावून सॅमसन अर्धशतक झळकावणारा ‘आयपीएल’मधील सर्वांत तऊण खेळाडू ठरला. इतकंच नव्हे, तर ‘वर्षाचा उदयोन्मुख खेळाडू’ हा पुरस्कार देखील चालून गेला तो त्याच्याचकडे...
  • राजस्थानवर दोन वर्षांची बंदी आल्यानंतर 2016 व 2017 च्या मोसमांत संजू सॅमसन दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे (सध्याचे दिल्ली कॅपिटल्स) खेळला. 2018 साली राजस्थान रॉयल्सकडे परतल्यापासून तो त्यांचा अविभाज्य भाग राहिलाय...
  • 2021 मध्ये त्याच्याकडे संघाचं अधिपत्य सोपविण्यात आलं अन् 2022 साली राजस्थाननं दुसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत पाऊल ठेवलं...संजू हा राजस्थान रॉयल्सचा सर्वांत जास्त धावा काढणारा फलंदाज बनला असून मुंबई इंडियन्सविरुद्धच्या 22 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यातून त्यानं ओलांडला तो 3500 धावांचा टप्पा...

भारतातर्फे कामगिरी...

  • संजू सॅमसननं भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवलं ते 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे इथं झालेल्या टी-20 लढतीतून...तो शेवटची आंतरराष्ट्रीय टी-20 लढत खेळला यंदाच्या प्रारंभी अफगाणिस्तानविरुद्ध...
  • 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो येथील सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या संजूनं आंतरराष्ट्रीय स्तरावरील खराब कामगिरीचा सिलसिला गेल्या वर्षीच्या अखेरीस संपुष्टात आणला तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय लढतीत आपलं पहिलं शतक झळकावून. त्यात त्यानं 114 चेंडूंत 108 धावा फटकावल्या...
  • प्रकार     सामने     डाव        नाबाद    धावा       सर्वोच्च   सरासरी  शतकं     अर्धशतकं
  • वनडे      16           14           5             510        108        56.67     1             3
  • टी-20     25           22           2             374        77           18.7       -             1
  • आयपीएल             161        157        19           4273      119        30.96     3             24

खेळ जुनाच ओळख नवी : रग्बी

रग्बी...सर्वांत धसमुसळ्या खेळांपैकी एक...आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगी स्पर्धा (दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश), सहा राष्ट्रांची स्पर्धा (इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड, वेल्स, इटली आणि फ्रान्स यांचा अंतर्भाव) आणि ‘हेनेकेन चषक’ या सदर खेळातील बड्या स्पर्धा असल्या, तरी शिखर गाठलं जातं ते ‘रग्बी वर्ल्ड कप’मध्ये...

  • प्रत्येक रग्बी सामन्यासाठी दिलेल्या 80 मिनिटांच्या कालावधीत प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक गुण मिळवणं हा संघाचा उद्देश राहतो. पूर्ण वेळेत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता म्हणून घोषित केला जातो. सामना अनिर्णित अवस्थेतही समाप्त होऊ शकतो...
  • चेंडू ताब्यात असलेल्या संघानं खेळाच्या विविध टप्प्यांतून तो पुढं नेला पाहिजे. चेंडू कधीही पुढं पास केला जाऊ शकत नाही, मात्र बाजूनं वा मागं दिला जाऊ शकतो.
  • परंतु खेळाडू चेंडू घेऊन पुढं धावू शकतात किंवा पायानं चेंडू फटकावू शकतात. प्रतिस्पर्ध्यांनी आक्रमण करणाऱ्या संघाला भिडून त्याला रोखण्याचा आणि चेंडू आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं...
  • प्रत्येक रग्बी संघात 15 खेळाडू असतात. संघ दोन गटांमध्ये विभागला जातो- ‘फॉरवर्ड’ आणि ‘बॅक’. एका संघात 8 ‘फॉरवर्ड’ आणि 7 ‘बॅक’ राहतात...
  • ‘पीच’ म्हणजे मैदान तीन विभागांमध्ये विभागलेलं असतं. एक मुख्य खेळण्याचं क्षेत्र, जे 100 मीटरपेक्षा जास्त नसतं आणि दोन ‘डेड गोल एरिया’, ज्या 10 ते 20 मीटरपर्यंत असतात. ‘पीच’ 70 मीटर ऊंद असणं आवश्यक. ‘गोल पोस्ट’ हा साधारणपणे ‘एच’ आकाराचा असतो आणि दोन खांबांमधील अंतर अंदाजे 5 ते 6 मीटर राहतं. उंचीवर मात्र कोणतेही बंधन नाही...
  • गम शिल्ड, हेड गार्ड, शोल्डर पॅड आणि शिन पॅडसह स्टडेड बूट परिधान केले जाऊ शकतात...
  • चार मार्गांनी गुण मिळविता येतात...त्यापैकी एक ‘ट्राय’ म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या ‘डेड बॉल’ क्षेत्रात चेंडू ठेवतो तेव्हा 5 गुण दिले जातात.
  • ‘कन्व्हर्शन’ म्हणजे ‘ट्राय’नंतर दिली जाणारी ‘फ्री किक’, जी संघाला 2 बोनस गुण प्राप्त करून देऊ शकते. ‘किक’ यशस्वी होण्यासाठी चेंडू आडव्या ‘बार’वरून आणि दोन खांब्यांदरम्यानच्या जागेतून जाणं गरजेचं...
  • ‘पेनल्टी किक’वर संघाला 3 गुण मिळतात आणि जेव्हा प्रतिस्पर्धी संघ उल्लंघन करतो तेव्हा संघाला ही ‘किक’ दिली जाते...याशिवाय ‘ड्रॉप गोल’ही करता येतो. म्हणजे चेंडू खाली टाकून पहिल्या उसळीवर फटका हाणायचा. तो गोल पोस्टच्या आडव्या बारवरून नि दोन खांबांमधून जायला हवा. यातून संघाला 3 गुण मिळू शकतात...
  • रग्बीचा सामना 40 मिनिटांच्या दोन सत्रांत होतो, ज्यांच्या दरम्यान 10 मिनिटांच्या विश्रांतीचा कालावधी असतो. यात ‘स्टॉपेज टाइम’ नसतो आणि सामना बरोबर 80 मिनिटांनी पूर्ण होतो...
  • बचाव करणाऱ्या संघानं प्रतिस्पर्ध्यांच्या पुढं सरसावणाऱ्या खेळाडूला पकडून त्याला जमिनीवर पाडलं पाहिजे. मात्र यादरम्यान खांद्यांच्या वरच्या भागाला लक्ष्य करता येत नाही आणि तसं केल्यास पंचाकडून ‘फाऊल’ दिला जातो...
  • रग्बीच्या सामन्यात एक पंच आणि दोन ‘टच जज्ज’ असतात...

- राजू प्रभू

महाराष्ट्र केसरी किताब जिंकायचा आहे.:- श्रीधर गोडसे

अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मला झालेल्या गंभीर दुखापती मुळे कुस्तीतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली होती. मामा अमोल फडतरे यांचे भक्कम पाठबळ असल्यामुळे कुमार केसरी विजेतेपदापर्यंत पोहचलो आहे.यापुढे देखील सरावात सातत्य ठेवून माझी कर्मभूमी नागाचे कुमठे गावाला आणखी एक महाराष्ट्र केसरी किताब मिळवून देण्याचे माझे ध्येय असल्याचे कुमार महाराष्ट्र केसरी श्रीधर गोडसे याने तऊण भारतशी बोलताना सांगितले.

शिवछत्रपती स्टेडियम क्रीडा संकुल रत्नागिरी येथे झालेल्या 44 व्या कुमार केसरी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत श्रीधर गोडसे (वडूज) याने पृथ्वीराज कोकाटे (पुणे) याच्यावर निर्णय क्षणी मात करून कुमार महाराष्ट्र केसरी किताब जिंकला आहे. अंतिम फेरीतील लढतीबद्दल श्रीधर म्हणाला अजिंक्यपदासाठी  पृथ्वीराज कोकाटे बरोबर माझी लढत होती. माझे मार्गदर्शक आणि मी पृथ्वीराजच्या लढतीचा अभ्यास केला होता. कच्चे दुवे हेऊन मला गुण मिळवायचे होते. तो आक्रमक लढतो त्यामुळे पहिल्या फेरीत बचाव कऊन त्याला दमवून काढायचे हे माझे टार्गेट होते.  पहिल्या फेरीत पृथ्वीराजने तीन विऊद्ध दोन गुणांची आघाडी घेतल्याने थोडा दबाव निश्चित होता.दुस्रया फेरीत दबाव झुगारून मी एक गुण मिळवला. पृथ्वीराजने पुन्हा दोन गुण घेऊन बढत घेतली होती. मी धीर न सोडता संधीच्या शोधात होतो. निर्णायक क्षणी मी सलग दोनदा एकेरी पटाची पकड करून दोन गुण घेऊन लढतीत बरोबरी साधली.निर्धारीत वेळेत दोघांचे समान गुण झाले होते. परंतु  शेवटचा गुण मी घेतल्यामुळे मी विजयी ठरलो.

श्रीधर मुळचा वडूज या.खटाव येथील सुपुत्र आहे. लहानपणापासून त्याला मामा महाराष्ट्र चॅम्पियन अमोल फडतरे यांच्याकडे कुस्तीचे बाळकडू मिळाले आहे. वडील मानवेंद्र गोडसे यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर अमोल फडतरे यांनी त्याचे पालकत्व स्वीकारले आहे. कुमठे ही श्रीधरची कर्मभूमी आहे. सध्या तो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जूनवीर काकासाहेब पवार, गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. श्रीधरने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर कुमार महाराष्ट्र केसरी किताब जिंकून मामा अमोल फडतरे यांच्या कष्टाचे चीज केले.

दुखापतीवर मात.

श्रीधरने कुस्तीची सुरवात मामा अमोल फडतरे बरोबर कोल्हापूरला  मोतीबाग तालमीत केली. सह्याद्री कुस्ती संकुल येथेही त्याने काही काळ सराव केला. 2021मध्ये गुडघ्याचा स्नायूबंध (लिगामेंट)तुटल्याने वर्षभर कुस्तीपासून तो दूर होता. मात्र मामाच्या मार्गदर्शनाखाली त्याने गंभीर दुखापतीवर मात करून किताब जिंकला.

हुतात्म्यांच्या भूमीतील श्रीधरने मर्दुमकी गाजविली

श्रीधरची कर्मभूमी नागाचे कुमठे असले तरी त्याचे मूळ गाव वडूज आहे. स्वातंत्र्यसेनानी स्व. सिताराम गोडसे यांचा तो पणतू आणि वडूज विकास सोसायटीचे माजी चेअरमन एम एस गोडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.एन.एस उर्फ बंडा गोडसे यांचा तो नातू आहे. हुतात्म्यांच्या भूमीतील बीलवा मल्ल श्रीधरने आखाड्यात मर्दुमकी दाखवून मानाचा किताब जिंकल्यामुळे वडूजकरांनी आनंद व्यक्त केला आहे. खटाव तालुक्याला पहिल्यांदा हा किताब त्याने मिळवून दिला आहे.

Advertisement
Tags :

.