महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स mania

06:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅरिबियन वादळ...आंद्रे रसेल !

Advertisement

अलीकडच्या काळातील तुफानी ‘हिटर’ म्हटल्यानंतर आठवण होईल ती ख्रिस गेलची....‘टी-20’मध्ये त्याचाच वारसा चालविणारा वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल म्हणजे कॅरिबियन बेटांतील ‘हरिकेन’प्रमाणं प्रतिस्पर्ध्यांवर येऊन आदळणारा फटकेबाज...इतर अनेक तडाखेबंद फलंदाजांप्रमाणं त्यालाही सातत्याच्या अभावानं ग्रासलेलं असलं, तरी ज्या दिवशी तो रंगात येतो त्या दिवशी विरोधी गोलंदाजांचा खात्मा हा ठरलेला...शिवाय प्रभावी मध्यमगती गोलंदाजीचं शस्रही भात्यात असल्यानं तो ‘केकेआर’साठी ‘काम की चीज’ ठरत आलाय...

Advertisement

‘कोलकाता नाइट रायडर्स’चा सलामीवीर अन् त्याच्यासोबत ‘दि हंड्रेड’मध्ये ‘मँचेस्टर ओरिजिनल्स’तर्फे खेळणारा फिल सॉल्ट म्हणतो, ‘तो एक अभूतपूर्व फटकेबाज. जो दिवस त्याचा असतो त्या दिवशी तो जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरतो’...स्वत: गोलंदाजांचा कर्दनकाळ राहिलेल्या वीरेंद्र सेहवागनं त्याच्या यंदाच्या ‘आयपीएल’मधील सलामीच्याच खेळीनंतर ‘एक्स’वर लिहिलं...‘चक्के की बारिश करदूं जब दिल करे. क्लीन बॉल स्ट्राइकिंग’...वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज...आंद्रे रसेल !

जमैकाचा आंद्रे रसेल कॅरिबियन लीगमध्ये ‘पॉवरहिटर’ म्हणून चमकल्यानंतर ‘आयपीएल’मधील संघांचं त्याच्याकडे लक्ष खेचलं गेलं. 2012 मध्ये सर्वप्रथम त्याला करारबद्ध केलं होतं ते तब्बल 4 लाख 50 हजार डॉलर्स मोजून ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’नं याची आता कुणाला आठवणही राहिलेली नसेल. परंतु तुरळक संधी आणि दुखापती यामुळं 2012 व 2013 च्या हंगामांत त्याच्या वाट्याला मोजकेच सामने येऊ शकले...

रसेलचं भाग्य पालटलं ते 2014 साली ‘कोलकाता नाइट रायडर्स’नं त्याला सामील करून घेतल्यानंतर. अर्थात तेही लगेच घडलं नाही. त्या वर्षी ‘केकेआर’नं दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली खरी, पण त्याला अवघ्याच काही सामन्यांमध्ये संधी मिळाली...2015 मध्ये परिस्थिती बदलली आणि आंद्रेनं त्या हंगामात 192 च्या ‘स्ट्राइक रेट’नं 326 धावा केल्या. त्यात समावेश होता तो तीन अर्धशतकांचा. गोलंदाजीत देखील त्यानं आपला इंगा दाखविताना 14 बळी घेतले. या पार्श्वभूमीवर तीन सामन्यांमध्ये सामनावीर ठरलेल्या विंडीजच्या या खेळाडूची ‘सर्वांत मौल्यवान खेळाडू’ म्हणून निवड होणं हे फारसं आश्चर्यकारक नव्हतं...

2016 च्या स्पर्धेत त्याची बॅट फारशी तळपली नसली, तरी तितकी कसर त्यानं 15 बळी घेऊन भरून काढली. त्या वर्षी ‘केकेआर’नं ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवलं खरं, पण अंतिम फेरीत पोहोचणं त्यांना शक्य झालं नाही...2017 चा हंगाम बंदीमुळं चुकल्यानंतर 2018 मध्ये परतलेल्या रसेलला पुन्हा आपले कारनामे सुरू करण्यास फक्त दोन सामने लागले. त्या वर्षी त्यानं 13 बळी खात्यात जमा केले आणि 300 हून अधिक धावाही केल्या...

आंद्रे रसेलच्या तळपणाऱ्या बॅटनं खरा प्रताप दाखविला तो पुढच्या 2019 च्या हंगामात. त्यानं तब्बल 510 धावा जमविल्या अन् नोंद केली ती चार अर्धशतकांचे. शिवाय गोलंदाजीत 11 गड्यांना टिपून दाखविलं. ही फटकेबाजी करताना त्याचा ‘स्ट्राईक रेट’ 205 इतका जबरदस्त राहिला. त्यामुळं ‘आयपीएल सुपर स्ट्रायकर’ किताब चालून येण्यासह स्पर्धावीर म्हणून निवड झाली ती आंद्रेचीच. शिवाय त्या वर्षी षटकार लगावण्यात सुद्धा आघाडीवर राहिला तो तोच (52 षटकार)....

2020 (117 धावा नि 6 बळी) अन् 2021 (183 धावा व 11 बळी) या दोन वर्षांत फारशी चमक दाखविता न आल्यानंतर आंद्रे रसेलचं महत्त्व ओसरू लागलंय की काय या सुरू झालेल्या चर्चेला त्यानं 2022 मध्ये चोख उत्तर दिलं. हा त्याच्यासाठी आणखी एक विलक्षण हंगाम ठरून त्यानं ‘नाइट रायडर्स’साठी मोलाची अष्टपैलू भूमिका बजावली. 14 सामन्यांमध्ये 335 धावा आणि 17 बळी हे त्याचे आकडे म्हणजे त्या मोसमातील ‘केकेआर’साठीची सर्वोच्च कामगिरी. रसेलचं इतकं योगदान असूनही शाहरूख खानचा संघ मात्र ‘प्ले-ऑफ’साठी पात्र ठरू शकला नाही, कारण ते फेकले गेले सातव्या स्थानावर...गेल्या वर्षी 14 सामन्यांतून 172 धावा अन् फक्त सात बळी मिळविता आल्यानंतर रसेलला आता तरी सोडचिठ्ठी देण्याचा विचार ‘कोलकाता’नं करायला हवा असा सूर पुन्हा येऊ लागला होता. मात्र यंदा पहिल्याच सामन्यातून त्यानं वादळ घोंगावत राहण्याची लक्षणं दाखविलीत...

29 एप्रिल, 1988 रोजी जन्मलेल्या 36 वर्षीय ‘ड्रे रूस’च्या (ड्वेन ब्राव्होप्रमाणं त्यालाही गायनाची आवड, त्यासाठी त्यानं घेतलेलं हे टोपण नाव) जीवनात ‘आयपीएल’ नि ‘केकेआर’ यांना अनन्यसाधारण स्थान...‘कोलकाता नाईट रायडर्स’समवेतच्या त्याच्या नात्याला यंदा एक दशक पूर्ण झालंय. भलेत्ही त्याचा आलेख हेलकावे खात राहिलेला असला, तरी संघानं त्याच्यावरील विश्वास तोडलेला नाहीये अन् त्यानंही तो कित्येकदा सार्थ ठरवून दाखविलाय !

जबरदस्त पराक्रम...

‘आयपीएल’मधील ‘धूमशान’...

 

 

खेळ जुनाच ओळख नवी ! ऱ्हदमिक जिम्नॅस्टिक्स

जिम्नॅस्टिक्स हा सर्वांत जुन्या खेळांपैकी एक अन् ‘ऱ्हदमिक जिम्नॅस्टिक्स’ ही या खेळाची एक नवीन शाखा...आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघानं 1961 मध्ये त्याला एक प्रकार म्हणून मान्यता दिली. त्यानंतर दोन वर्षांनी पहिली जागतिक स्पर्धा बुडापेस्ट येथे झाली...

- राजू प्रभू

टेनिस बॉल क्रिकेटमधील खराखुरा ‘आयकॉन’

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या दर्शन बांदेकर या नावाची खूप मोठी हवा आहे. एक मॅचविनर अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असलेला दर्शन गोलंदाजीत तेजतर्रार मारा तर करतोच. शिवाय फलंदाजी करताना तेवढ्याच ताकदीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देतो. त्याने मारलेल्या षटकारांची उंची, लांबी पाहिली की असे वाटते की, खरेतर या फटक्याला आठ धावा द्यायला पाहिजेत. इतके त्याचे षटकार उत्तुंग असतात. आपल्या उच्च दर्जाच्या खेळामुळेच तो आज टेनिस बॉल क्रिकेटमधील एक

लोकप्रिय खेळाडू बनला आहे. त्यापुढे जाऊन सांगायचे झाले तर संघाला गरज नसेल तर सलग सहा षटकार न मारण्याच्या आपल्या स्वतंत्र विचारधारेमुळे त्याने खेळाडू म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने तो इतरांसाठी ‘आयकॉन खेळाडू’ बनला आहे.

मालवण तालुक्यामधील देवबाग गावात एका मच्छीमार कुटुंबात जन्मलेल्या दर्शनने लहानपणापासूनच समुद्रकिनारी क्रिकेटचे धडे गिरवले. एखाद्या जलदगती गोलंदाजास साजेशी उंची आणि शरीरयष्टी त्याच्याकडे आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्याच्याकडे एक जलदगती गोलंदाज म्हणूनच पाहिले गेले. त्या दृष्टीने त्याची वाटचालही सुरू झाली. काही वर्षांपूर्वी दुबईत झालेल्या आयपीएलसाठी सज्ज होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना त्याने नेटमध्ये गोलंदाजी केली होती. नेट प्रॅक्टिससाठी एकेकाळी तो रोहित शर्माचा आवडता गोलंदाज होता, असे सांगितले जाते. त्यावेळी भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळे आणि स्विंग गोलंदाजीचा बादशाह शॉन पोलॉक यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन त्याला लाभले.

गेल्या चार-पाच वर्षात दर्शनने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. दर्शन एखाद्या स्पर्धेत खेळतोय म्हटल्यावर त्या स्पर्धेला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतो, एवढी त्याची लोकप्रियता आहे. त्याच्या या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी आयोजकदेखील स्पर्धेत दर्शन खेळणार असल्याचा प्रचार करतात. दर्शनच्या लोकप्रियतेचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे धावांचा पाठलाग करताना दर्शनचा संघ सामना एकतर्फी जिंकणार हे माहिती असूनसुद्धा

प्रेक्षक आपली जागा सोडत नाहीत. कारण त्यांना दर्शनचा उत्तुंग आणि लांबलचक षटकार ‘याची देही याची डोळा’ पाहण्याचा आनंद अनुभवायचा असतो.  नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दर्शनच्या संघाला विजयासाठी 24 चेंडूत केवळ 13 धावांची गरज होती. त्याच्या संघाचे सर्व गडी शाबूत होते आणि तो स्वत: त्यावेळी क्रीझवर उभा होता. पण सामन्यातील रंगत संपलीय असे म्हणून पण प्रेक्षक अजिबात जागचे हलले नाहीत. उरलेल्या 13 धावांमध्ये दर्शनच्या बॅटमधून आपल्याला किमान एक तरी षटकार पाहायला मिळेल या आशेने ते बसून होते. दर्शननेही आपल्या चाहत्यांची अपेक्षापूर्ती करताना विजयी षटकार ठोकत शानदार विजय साजरा केला.

सिंधुदुर्गातील लोकप्रिय मालवणी समालोचक बादल चौधरी सांगतात की, दर्शन बांदेकर म्हणजे एकखांबी तंबू. आपण समालोचन करत असताना बऱ्याचदा सीमारेषेच्या बाहेरील एखाद्या जागेचा उल्लेख करतो. जेणेकरून त्या ठिकाणी दर्शनने षटकार मारावा, असे आम्हाला आमच्या समालोचनातून नकळत त्याला सूचवायचे असते. अशावेळी दर्शन आमची निराशा न करता त्या ठिकाणी षटकार ठोकण्याची किमया लिलया साधतो. एका सामन्यात तर त्याने दोन वेगवेगळ्या गोलंदाजांना सलग आठ षटकार ठोकले आहेत. ते स्कोअर बुक आपण आजही जपून ठेवले आहे. कुठल्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता त्याच्या खेळात आहे. दर्शन म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमधील एक झंझावत आहे. आपल्या फिटनेसबद्दलही तो खूप जागरुक असतो. अरबट-चरबट काही तो खात नाही. त्याची उंची आणि शरीरयष्टी आकर्षक आहे. मैदानावर कधीच कुणाशी हुज्जत घालताना आम्ही त्याला पाहिलेले नाही. सर्वांशी तो आदराने वागतो. त्यामुळे आम्हा सर्वांना तो खूप भावतो, असे चौधरी त्याच्याविषयी मोठ्या कौतुकाने सांगतात.

दहा हजाराचे बक्षीस असूनही मारला नाही सहावा षटकार

संघाला गरज नसताना एकाच षटकात सलग सहा षटकार न ठोकण्याच्या आपल्या वेगळ्या विचारधारेमुळे दर्शनची लोकप्रियता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. सिंधुदुर्गातील एका मोठ्या स्पर्धेत सलग सहा षटकारांसाठी त्याला तब्बल दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले होते. त्यावेळी त्याने सलग पाच षटकार ठोकलेदेखील होते आणि सहावा षटकारसुद्धा तो सहज ठोकू शकला असता अशी तेव्हाची परिस्थिती होती. पण त्याने अतिशय जाणीवपूर्वक सहावा चेंडू जमिनीलगत तटवून काढला. त्याच्या या कृतीचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण आज टेनिस बॉल क्रिकेटमध्येसुद्धा खूप व्यावसायिकता आली आहे. असे असताना दहा हजार रुपये मिळविण्याच्या संधीचे सोने करण्यापेक्षा त्याने आजवर मनापासून जोपासलेल्या तत्त्वाचे पालन केले. प्रेक्षकांनी त्यावेळी उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. सामना संपल्यानंतर आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना तो म्हणाला, गोलंदाज हासुद्धा माझ्यासारखा एक माणूस आहे. तोसुद्धा खेळाचा आनंद घेत असतो. खेळाडू म्हणून त्यालासुद्धा आपल्या संघासाठी काहीतरी करावसं वाटत असते. एखादा फलंदाज सलग सहा षटकार ठोकतो, तेव्हा फलंदाजाचे कौतुक होतेच. पण त्याचबरोबर ज्याच्या गोलंदाजीवर सहा षटकार लगावले जातात, त्या गोलंदाजाला नकारात्मक प्रसिद्धी मिळते. त्याला चिडवले जाते. चेष्टा केली जाते, हे मला आवडत नाही. त्यामुळे माझ्या संघाला गरज नसेल तर मी सहावा षटकार मारण्याचा प्रयत्न करत नाही. पण संघाला गरज असेल तेव्हा नक्कीच मी सहाव्या षटकारासाठी जाणार, असे दर्शन तेव्हा म्हणाला होता. त्याच्या या उत्तराने त्याने साऱ्यांचीच मने जिंकली. आजवर आपण थेट प्रक्षेपण असलेल्या स्पर्धेत तीनवेळा तर ऑफलाईन स्पर्धेत पाचवेळा हा सलग पाच षटकार ठोकण्याचा पराक्रम केल्याचे दर्शन सांगतो.

गत हंगामात 51 मालिकावीर पुरस्कार

क्रिकेट स्पर्धांच्या हंगामात त्याला दरदिवशी मोठ्या प्रमाणात मोबाईल कॉल येतात. 2022-23 च्या हंगामात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील स्पर्धांमध्ये तो तब्बल 51 वेळा मालिकावीराचा मानकरी ठरला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमधून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर तो समाधानी आहे. त्याच्या या वाटचालीत त्याला त्याच्या कुटुंबियांचा खूप मोठा पाठिंबा आहे. अशा या टेनिस बॉल क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या गुणवान खेळाडूला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्याचे त्याच्या चाहत्यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीची सर्वांना अपेक्षा आहे.

-महेंद्र पराडकर, रत्नागिरी

नसेल हाताची साथ तरीही तो मारतो क्रिकेटचा शॉट

दोन्ही हात नसताना क्रिकेट खेळणे शक्य आहे का किंवा हातांशिवाय क्रिकेट खेळण्याचा कोणी विचारही करू शकतो का? याचे उत्तर नाही असेच असेल. पण असे म्हणतात की, मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है’. या ओळी स्वार्गाहूनी सुंदर असलेल्या काश्मीरमधील एका क्रिकेटपटूने प्रत्यक्षात खऱ्या करुन दाखवल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमधील 34 वर्षीय आमिर हुसैन लोनची अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे. आमिर हुसैनला जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. खांद्यापासून दोन हात नसलेला आमिर आपल्या अनोख्या शैलीत क्रिकेट खेळतो. त्याची ही शैली क्रिकेटविश्वात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

आमिर हा गळा आणि खांद्यात बॅट धरुन फलंदाजी करतो आणि पायाचा अंगठा आणि इतर बोटांच्या चिमटीत बॉल धरुन पायाने गोलंदाजी करतो. हे शब्दात सांगताना आपला सहजा सहजी यावर विश्वास बसणार नाही. पण आमिरच्या क्रिकेट कौशल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच क्रिकेट चाहत्यांना त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. पण प्रत्यक्षात आमिर हा जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामनेही तो खेळला आहे.

अनंतनाग जिह्यातील बिजबेहाराजवळ असणाऱ्या गावात राहणाऱ्या आमिर हुसेनची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. 8 व्या वर्षी आमिरचे दोन्ही हात सॉ मशीनने कापले गेले. 1997 साली लहान असताना तो वडीलांच्या लाकूड कापण्याच्या कारखान्यात डबा द्यायला गेला होता. त्यावेळी कारखान्यातील यंत्रामध्ये त्याचे जॅकेट अडकल्यामुळे त्याचा अपघात झाला. आपल्या मुलाला दोन्ही हात गमवावे लागल्यामुळे वडील बशीर अहमद लोण यांनी नंतर कारखानाच बंद करून टाकला. पुढची तीन वर्षे तो रुग्णालयात होता. औषधोपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून सरळ विष देऊन मारून टाका इथपर्यंतचे सल्ले लोकांनी त्याच्या आई-वडिलांना दिले. खर्चापायी जमीन विकावी लागली, सॉ मिल बंद पडली, आयुष्याची अशी राखरांगोळी झालेली असतानाही तो धडपडत राहिला. त्या राखेतूनच त्याने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच झेप घेतली आणि पुढे काय झाले हे साऱ्या जगाने पाहिले आहे.

बालपणापासून क्रिकेटचे वेड असलेल्या आमिरचा खरा हिरो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनचा खेळ पाहून प्रेरित झालेल्या आमिरनेही उत्तुंग अशी झेप घेतली आहे. एका अपघातामुळे त्याच्या स्वप्नांची राख झाली. पण तरीही तो डगमगला नाही. हिमालयासारखा परिस्थितीसमोर उभा राहिला. त्याच्या आजीने आमिरला नवी उमेद दिली. एकदा आजीने माझ्या दिशेने चेंडू फेकला आणि मी आनंदून गेलो. आजी आणि मी पुन्हा पुन्हा हा खेळ खेळायचो, त्यातूनच मला फलंदाजी करण्याची नवी कल्पना गवसली, असे तो नेहमी सांगतो. डिसेंबर 2023 मध्ये आमिर हुसैनला ‘सा रे ग म पा’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. यावेळी त्याची संघर्षमय कहाणी ऐकूनच सर्वच जण थक्क झाले.

2013 मध्ये मिळाला ब्रेक

हुसैनचे टॅलेंट पाहून 2013 मध्ये जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट संघात त्याचा समावेश करण्यात आला. लवकरच तो या संघाचा कर्णधारही बनला. 2014 मध्ये आलेल्या पुरामुळे तो जवळपास वर्षभर खेळापासून दूर राहिला. 2015 मध्ये त्याने आंतरराज्य पॅरा टूर्नामेंटमध्ये पुनरागमन करत संघाला चॅम्पियन बनवले. यानंतर 2018 मध्ये त्याला बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. याशिवाय, नेपाळ व दुबईमध्येही त्याने काही सामने खेळले. दोन्ही हात नसताना क्रिकेट खेळणे, पायाच्या अंगठ्याने गोलंदाजी करणे हे सारेच अशक्यप्राय असे आहे. पण अथक सरावामुळे आमिरने हे शक्य केले आहे. आज जिथे जिथे क्रिकेट खेळण्यासाठी जातो, त्या त्या ठिकाणी कौतुक होते, असे आमिर सांगतो.

काही दिवसापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भेटण्याची संधी आमिरला मिळाली. यावेळी सचिनने आमिरसोबत बसून बराच वेळ गप्पा मारल्या. त्याच्या संघर्षाबद्दल खूप काही जाणून घेतलं. यासोबतच क्रिकेटच्या देवाने आपल्या जबरा फॅन्सला खास गिफ्टदेखील दिलं. आमिरचे हे कौशल्य देशातील अनेक युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देणारे आहे. आजच्या घडीला आमिरसारखे ध्येयवेडे खेळाडू फार कमी पहायला मिळतात, हे मात्र नक्की.

विनायक भोसले, /कोल्हापूर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article