स्पोर्ट्स mania
भारताचा ‘हार्टब्रेक’ करणारा...हार्टले !
‘बाझबॉल’चे ढोल वाजवत भारतात दाखल झालेल्या बेन स्टोक्सच्या इंग्लंडचे मनसुबे अपेक्षेप्रमाणं पहिल्या कसोटीपासूनच मातीत मिसळणार असं वाटू लागलं होतं...परंतु अचानक चक्र उलटं फिरलं अन् हैदराबादमध्ये रोहित शर्माच्या संघावर प्रसंग ओढवला तो 0-1 असा पिछाडीवर पडण्याचा. ही किमया घडवून आणली ती द्विशतक चार धावांनी हुकलेल्या ओलिव्ह पोपपेक्षा 7 बळी मिळवून भारतीय फलंदाजीची दाणादाण उडविणाऱ्या टॉम हार्टलेनं. ही त्याची पहिलीच कसोटी आणि हे लक्षात घेता या फिरकी गोलंदाजाच्या कामगिरीचं मूल्य आणखी वाढतं...
ग्लंडचा पहिला डाव अडीचशेच्या आत संपुष्टात आणल्यानंतर आपण पहिल्या डावात 436 धावा जमवून 190 धावांची भरभक्कम आघाडी घेतलेली...अशा परिस्थितीत अपेक्षा काय होती ?...भारताकडे असलेले रवींद्र जडेजा नि रविचंद्रन अश्विनसारखे गोलंदाज अन् इंग्लिश फलंदाजांचा फिरकी हा ‘विकपॉइंट’ लक्षात घेता त्यांचा दुसरा डाव कोसळणार अन् भारत आरामात सामना खात्यात जमा करणार...ओलिव्ह पोपनं एकहाती इंग्लंडला 400 च्या पल्याड जाण्यासाठी मदत करताना 196 धावांची खेळी केल्यानंतर पाल चुकचुकली होती. तरीही बाजी आपल्याच हाती विसावलीय असं वाटत होतं, कारण एक तर आव्हान अवघ्या 231 धावांचं. त्यात फिरकी खेळण्यातले आपण ‘दादा’ असा समज (मात्र हल्लीच्या काळात चांगल्या फिरकीनं भारतीय फलंदाजांना वेळोवेळी हैराण करून सोडलंय). पण हैदराबादमध्ये काही तरी वेगळं घडायचं होतं...
डावातील 12 वं षटक...रोहित शर्मासह आश्वासक वाटणाऱ्या भागीदारीला आकार देणाऱ्या यशस्वी जैस्वालला पुढं सरसावून ‘ऑन साइड’ला फटका हाणण्याचा मोह अंगलट आला अन् पोपनं ‘शॉर्ट लेग’वर झेल पकडण्याची संधी सोडली नाही. दोन चेंडूंनंतर शुभमन गिलनं त्याचाच कित्ता गिरवला...18 वं षटक...रोहित शर्मानं चेंडू फिरेल या अपेक्षेनं आपलं पाऊल चुकीच्या जागी टाकलं अन् त्याला चकवा देणारा, सरळ आलेला चेंडू पायचित करून गेला...30 वं षटक...डावखुऱ्या फिरकीपटूचा सामना करण्यासाठी पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलला चहापानानंतरच्या पाचव्या चेंडूवर टप्पा नीट ओळखता आला नाही. मग अर्धवट हाणलेला ड्राईव्ह सरळ विसावला तो गोलंदाजाच्या हातात...
62 वं षटक...श्रीकर भरत नि अश्विन ही जोडी धोकादायक ठरण्याची चिन्हं दिसत असताना ती फोडण्यासाठी कर्णधार स्टोक्सनं पुन्हा एकदा चेंडू त्या डावखुऱ्या गोलंदाजाच्या हातात दिला अन् त्यानंही कर्णधाराला निराश केलं नाही...भरतला मंद गतीनं टाकलेला चेंडू मधल्या यष्टीसमोर पडला अन् ‘ऑफ स्टंप’ वाकवून गेला...पुढचे यष्टिचित करून मिळविलेले दोन बळी ही त्यानं टाकलेल्या दबावाची परिणती...64 वं षटक...संयम सुटलेला अश्विन फटका हाणण्यासाठी पुढं सरसावला अन् यष्टिरक्षक बेन फोक्सच्या हाती बाद होऊन परतला...70 वं षटक...मोहम्मद सिराजची हालतही झाली ती तशीच...कुणाचा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीनं भारतानं कसोटी गमावली आणि इंग्लंडच्या गोटात एका नावाचा जयजयकार सुरू झाला...टॉम हार्टले...
पहिल्या दिवसाचा विचार करता स्टोक्सची योजना खरं तर फसल्यात जमा होती. कारण हार्टलेची सुऊवात चांगली झाली नव्हती. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी, विशेषत: यशस्वी जैस्वालनं त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला. दुसऱ्याच षटकात या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाच्या हातात नवा चेंडू सोपविण्यात आला. पण जैस्वालनं त्याच्या पहिल्याच चेंडूला मैदानाबाहेर भिरकावून दिलं आणि पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार खेचला. त्यानंतरही यशस्वी जैस्वालचं आक्रमण चालूच राहिलं...टॉम हार्टलेनं दुसऱ्या दिवशी स्वत:ला सावरलं खरं, परंतु तोवर व्हायचं ते नुकसान झालं होतं. 25 षटकांत त्यानं दोन गडी टिपले असले, तरी त्याच्या गोलंदाजीवर तब्बल 131 धावा निघाल्या. त्यापैकी 63 पहिल्या दिवशीच्या नऊ षटकांत...आणि जे दोन बळी मिळाले त्यातही फलंदाजांच्या चुकांचा प्रमुख वाटा. शुभमन गिलनं खेळलेला खराब फटका मिडविकेटवरील क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला, तर के. एल. राहुलनं झेल दिला तो डीप मिडविकेटवर...
‘तिथं गोलंदाजी करणं खरोखरच कठीण होतं. आम्ही कल्पना केली होती तितका चेंडू फिरला नाही. पण प्रशिक्षक मेकॉलम, कर्णधार स्टोक्स यांनी धीर दिल्यानं मी आत्मविश्वास गमावला नाही अन् त्यातून बाहेर सरून माझी सर्वोत्कृष्ट कामगिरी करता आली’, हार्टले पहिल्या डावातील गोलंदाजीविषयी बोलताना सांगतो...भारताच्या दुसऱ्या डावात दर्शन घडलं ते वेगळ्याच
टॉम हार्टलेचं. त्यानं ‘स्टंप-टू-स्टंप लाईन’ राखत मारा करताना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अचूकता आणली. चेंडू वळणाऱ्या अन् नैसर्गिक विविधतेला पोषक ठरणाऱ्या खेळपट्टीवर अचूक गोलंदाजी ही दणके देण्यास पुरेशी असते...शिवाय त्यानं इंग्लंडच्या दोन्ही डावांमध्ये 23 व 34 धावा फटकावत फलंदाजीतही महत्त्वाचं योगदान दिलं. त्या धावा सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवून गेल्या, असं हार्टले म्हणतो...
इतिहासात डोकावल्यास भारतीय भूमीत पाय ठेवल्यानंतर एका दिवसात ‘हिट’ ठरलेले अनेक खेळाडू सापडतील. टॉम हार्टले हे त्यात भर पडलेलं नवीन नाव...याचं श्रेय कर्णधार स्टोक्सलाही जातं. त्यानं हार्टलेवरील विश्वास कायम ठेवला आणि पहिल्या डावातील सर्वांत महागडा गोलंदाज ठरूनही धावफलक न पाहता त्याला गोलंदाजी दिली...खरं तर त्याला त्याच्या कौंटी संघातूनही नियमित खेळविलं जात नाही. तरी सुद्धा इंग्लंडसाठी मुख्य भूमिका बजावली ती टॉम हार्टलेनंच !
इतिहासाच्या पुस्तकात स्थान देणारी कामगिरी...
- इंग्लंडचा नवोदित फिरकी गोलंदाज टॉम हार्टले भारताविऊद्धच्या पहिल्या कसोटीतील ‘मॅच-विनिंग’ स्पेलसह विक्रमांच्या पुस्तकात जाऊन बसलाय...या डावखुऱ्या फिरकीपटूनं दुसऱ्या डावात 62 धावा देऊन 7 बळी, तर एकूण सामन्यात 193 धावा देऊन 9 बळी घेतले...1945 नंतर कसोटीतील पदार्पणात इंग्लंडच्या एखाद्या फिरकीपटूनं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी...
- 1948 मध्ये जिम लेकरनं बजावलेल्या पराक्रमानंतर इंग्लंडच्या एखाद्या नवोदित फिरकी गोलंदाजानं डावात सात बळी घेण्याची ही पहिलीच खेप... शिवाय माजी इंग्लिश फिरकीपटू रॉबर्ट बेरीनं 1950 मध्ये मँचेस्टर इथं वेस्ट इंडिजविऊद्ध सामन्यात 116 देऊन घेतलेल्या 9 बळींशी त्यानं बरोबरी केलीय... याशिवाय आदिल रशिद (2015 साली अबुधाबी इथं 64 धावांत 5 बळी), विल जॅक्स (2022 मध्ये रावळपिंडीत 161 धावांत 6 बळी) आणि रेहान अहमद (त्याच मालिकेत 48 धावांत 5 बळी) यांच्या पावलावर पाऊल ठेवत तो या शतकातील पदार्पणाच्या कसोटीत पाच बळी घेणारा इंग्लंडचा चौथा फिरकी गोलंदाज ठरलाय...
- या पार्श्वभूमीवर भारताविऊद्धच्या पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाजांच्या वाट्याला एकही बळी न येता इंग्लंडच्या फिरकीपटूंनी साऱ्याचे सारे 20 फलंदाज टिपले. परंतु कसोटीत अशी कामगिरी करण्याची इंग्लंडची ही पहिलीच वेळ नव्हे. सर्वप्रथम इंग्लंडच्या फिरकीपटूंनी सर्व 20 बळी मिळविले होते ते भारताविरुद्धच. 1952 मध्ये कानपूर इथं हा पराक्रम नोंदला गेला होता...चार वर्षांनंतर त्यांनी पुन्हा असा प्रताप गाजविला तो मँचेस्टरमध्ये त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविऊद्ध...इंग्लिश फिरकीपटूंनी 2018 साली तिसऱ्यांदा पल्लेकेले इथं श्रीलंकेविऊद्धच्या कसोटीत सर्व 20 फलंदाजांना बाद करून दाखविलं...
कशी झाली निवड?
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी हार्टलेनं 20 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये फक्त 40 बळी मिळविले होते. तरीही तो इंग्लंडच्या संघात दाखल झाला त्यामागं धूर्त डावपेच लपलेत...कर्णधार बेन स्टोक्स, प्रशिक्षक ब्रँडन मेकॉलम आणि क्रिकेट संचालक रॉब की यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच भारताविऊद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी नियोजन सुरू केलं होतं. त्याअंतर्गत त्यांनी भारतीय परिस्थितीचा विचार करून भरपूर उंची असलेल्या, अचूक मारा करू शकणाऱ्या फिरकी गोलंदाजांचा शोध चालविला होता. त्यापायी या त्रिकुटानं संपूर्ण कौंटी क्रिकेट पालथं घातलं असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. यातून निवडलेल्या गोलंदाजांमध्ये लँकेशायरचा डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टलेचाही समावेश होता. खरं तर हार्टलेकडे पाहिलं जात होतं ते पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांसाठीचा गोलंदाज या नजरेतून. मात्र उंची (6 फूट 4 इंच), अचूकता आणि गोलंदाजीच्या शैलीमुळं तो योजनांमध्ये फिट बसला. 2021 मध्ये भारत दौऱ्यावर आल्यावेळी इंग्लंडला अक्षर पटेलनं भरपूर सतावलं होतं. 2020 साली व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला 24 वर्षीय हार्टले त्याच धर्तीवर इंग्लंडच्या माऱ्यामध्ये फरक घडवून आणू शकेल असं वरील साऱ्यांना वाटल. अन् शेवटी भारत दौऱ्याचं तिकीट त्याच्या हाती पडलं...
कोण हा हार्टले?
- टॉम हार्टलेचे वडील बिल हार्टले हे धावपटू. 1974 च्या युरोपियन स्पर्धेत त्यांनी 4×400 मीटर्स शर्यतीत सुवर्ण जिंकलं होतं. टॉमच्या मनात सुरुवातीला भरला होता तो फुटबॉल. त्यातून लहानपणी तो एका अकादमीतही दाखल झाला होता, परंतु त्वरित त्यानं त्या खेळाला रामराम ठोकला...
- त्याच्या कुटुंबाचा मूळ व्यवसाय हा बागायतीकामाचा. त्याची स्थापना 1890 मध्ये झाली. ‘हार्टलेज नर्सरी’साठी काम करणाऱ्या कुटुंबाच्या सहाव्या पिढीचा तो प्रतिनिधी...
- मर्चंट टेलर्स स्कूलमध्ये असताना हार्टलेचं क्रिकेटवरील प्रेम वाढीस लागलं. तो 14 वर्षांखालील असताना लँकेशायर अकादमीचं लक्ष त्यानं वेधून घेतलं. फलंदाजीत तळाकडे बऱ्यापैकी हातभार लावू शकणारा फिरकी गोलंदाज म्हणून स्वतची ओळख प्रस्थापित केलेल्या टॉम हार्टले पुढं लँकेशायरच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांतील त्रिसदस्यीय फिरकी माऱ्याचा मुख्य भाग बनला...
- सप्टेंबर, 2023 मध्ये टॉमनं आयर्लंडविऊद्ध इंग्लंडच्या एकदिवसीय संघातून पदार्पण केलं. त्या मालिकेत त्याला एकाच डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली अन् त्यातही त्याला बळी टिपता आला नाही...
खेळ जुनाच ओळख नवी ! : ‘ट्रॅक सायकलिंग’
‘ट्रॅक सायकलिंग’ हा प्रकार म्हणजे अंडाकृती ‘ट्रॅक’वरील सायकलिंगच्या शर्यती. हे ट्रॅक बहुतेकदा लाकडापासून बनविलेले असतात आणि सहसा ‘इनडोअर’ म्हणजे ‘वेलोड्रोम’वर तो आयोजित केला जातो. 18 व्या शतकाच्या मध्यास सायकली पहिल्यांदा विकसित केल्या गेल्या आणि 1870 च्या सुऊवातीपासून इंग्लंडमध्ये होऊ लागलेल्या ‘ट्रॅक रेस’ लोकांवर भुरळ टाकू लागल्या...
- ‘ट्रॅक सायकलिंग’मधील स्पर्धेनुसार नियम वेगवेगळे असतात, परंतु सामान्यत: या खेळामध्ये जिंकण्यासाठी प्रथम अंतिम रेषा ओलांडणं किंवा सर्वांत जास्त गुण मिळविणं किंवा ‘फिल्ड लॅप्स’ म्हणजे फेऱ्या पूर्ण करणं आवश्यक ठरतं...
- 1896 पासून ऑलिम्पिकमध्ये ‘ट्रॅक सायकलिंग’ प्रकार समाविष्ट राहिलाय. फक्त स्टॉकहोममधील 1912 च्या स्पर्धेचा त्याला अपवाद राहिला. तेव्हा फक्त ‘रोड रेस’ आयोजित करण्यात आली...
- 1924 ते 1992 दरम्यान या गटात ‘स्प्रिंट’, एक किलोमीटरची ‘टाइम ट्राईल’, ‘टँडम’ आणि ‘टीम परस्युट’ या प्रकारांचा समावेश राहिला. टोकियो येथील 1964 च्या ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक ‘परस्युट’ची त्यात भर घालण्यात आली आणि म्युनिक येथील 1972 च्या ऑलिम्पिकनंतर ‘टँडम’ला वगळण्यात आलं...1988 च्या ‘सोल गेम्स’पासून या ‘ट्रॅक इव्हेंट’मध्ये महिलांच्या शर्यती देखील होऊ लागल्याहेत...
- ‘ट्रॅक सायकलिंग’मध्ये येणाऱ्या प्रकारांपैकी एक असतो ‘स्प्रिंट’. त्यात ‘प्रिंट’, ‘टीम स्प्रिंट’, ‘केइरिन, ‘ट्रॅक टाइम ट्रायल’ यांचा समावेश असतो...
- ‘प्रिंट’ गटातील शर्यती वेगवान असतात अन् त्यांची व्याप्ती 8 ते 10 फेऱ्यांदरम्यान असते. त्यात सायकलपटू गती, शर्यतीचं तंत्र आणि प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी डावपेच यावर लक्ष पेंद्रीत करतात. या प्रकारच्या शर्यतींमध्ये भाग घेणारे ‘स्प्रिंट रायडर्स’ विशेष प्रशिक्षण घेतात आणि दीर्घ अंतराच्या ‘एंड्युरन्स’ गटातील शर्यतींमध्ये भाग घेत नाहीत...
- ‘एंड्युरन्स’ विभागातील शर्यती खूप लांब अंतराच्या असतात. या शर्यतींची व्याप्ती वैयक्तिक किंवा सांघिक गटासाठी 12 ते 16 फेऱ्यांची राहते, तर संपूर्ण व्याप्तीची शर्यत 120 फेऱ्यांपर्यंत जाते...
- ‘एंड्युरन्स’ गटात ‘इंडिव्हिज्युअल परस्युट’, ‘पॉइंट्स रेस’, ‘हँडिकेप’ किंवा ‘हॅर अँड हाउंड्स’, ‘टीम परस्युट’, ‘मॅडिसन’, ‘मिस अँड आउट’, ‘स्क्रॅच रेस’ व ‘ओम्निअम’ यांचा समावेश होतो...
- ‘वेलोड्रोम’ म्हणजे ‘ट्रॅक’ हा कलंडलेल्या स्वरुपाचा असतो. ट्रॅकच्या मध्यभागी सर्वांत जास्त उतार राहतो. 333 मीटर्स, 400 मीटर्स, आणि 500 मीटर्सचे ट्रॅक असतात. पण जागतिक मानक आकार 250 मीटरांचा आहे...
- यातील जाणून घेण्याजोगी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ट्रॅक’वरील दिशा. सायकलस्वार नेहमी घड्याळाच्या उलट्या दिशेनं प्रवास करतो म्हणजे त्यांना नेहमी डावीकडे वळावं लागतं...
- ‘ट्रॅक सायकल’ला ब्रेक नसतो आणि त्यामागं उद्देश असतो तो हा की, सायकलपटूनं ब्रेक लावून गती गमावू नये, त्याच्या मागे असलेल्या सर्व स्वारांची कोंडी करू नये वा त्यांना पाडण्यास कारणीभूत ठरू नये...
- राजू प्रभू
यशाच्या राष्ट्रीय शिखरावर विराजमान गोव्याचे पॉवरलिफ्टर्स
मागील काही वर्षांपासून गोव्यात पॉवरलिफ्टर्स, शरीरसौष्ठवपटू तसेच वेटलिफ्टर्सची राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रगती पाहायला मिळत आहे. या मर्दानी देहयष्टींच्या खेळात आता युवा वर्ग कमालीचा आकर्षित झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आता प्रत्येक ठिकाणी जिम्नॅशियम झाले असून फिटनेस आणि स्पर्धांसाठीही युवा पुरूष व महिलांचाही सहभाग आता वाढल्याचे दिसून येत आहे.
शासनाने बांधलेल्या जिम्स तसेच प्रोफेशनल पद्धतीचे प्रशिक्षण देणाऱ्या जिम्सही आता राज्यात मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. सध्या राज्यात बॉडिबिल्डींग, पॉवरलिफ्टींग आणि वेटलिफ्टिंग क्रीडाप्रकारात क्रेझ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद बघितला तर या खेळाला फुटबॉलनंतर चांगला प्रेक्षकवर्ग लाभू शकतो, हे दिसून आलेले आहे.
सध्या पॉवरलिफ्टींग खेळाने जबरदस्त प्रगती साधल्याचे दिसून आले आहे. चिराग नायक यांच्या अध्यक्षतेखालील गोवा पॉवरलिफ्टींग अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाने अल्पावधीतच गोव्याचे नाव या खेळात अग्रस्थानावर आणले आहे. हल्लीच नवी मुंबईत झालेल्या 30 व्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याने ज्युनियर, सीनियर आणि मास्टर्स विभागात केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी तसेच युवांना या मर्दानी खेळाकडे आकर्षित करणारी आहे.
नवी मुंबईत झालेल्या या स्पर्धेत देशातील 19 राज्य आणि संघ प्रदेशांनी भाग घेतला होता. एकूण 380 पॉवरलिफ्टर्सना कडवी लढत देत गोव्याच्या पॉवरलिफ्टींगपटूंनी मिळविली एकूण 13 पदके. यात 10 सुवर्ण, 2 रौप्य व एक कास्यपदकांचा समावेश होता. गोव्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पॉवरलिफ्टींगपटूंनी तर कमाल करताना तब्बल 10 सुवर्णपदके मिळवून सर्वांनाच थक्क केले. ‘गोव्यात पॉवरलिफ्टींग खेळाचा प्रसार आम्ही कुशलतेने तसेच भावी युवा पिढीला समोर ठेऊन केला आहे’ असे यावेळी गोवा पॉवरलिफ्टींग अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव तसेच मडगावच्या प्रसिद्ध ‘इन्फिनिटी’ जिमचे मालक गोविंद लोटलीकर म्हणाले.
‘राज्यात पॉवरलिफ्टींग खेळ ‘डेड’ झाला होता. 2019 पूर्वी राज्यात या खेळातील स्पर्धांही होत नव्हत्या. काही पॉवरलिफ्टर्सनी तर या खेळाला रामरामही ठोकला होता. या तगड्या खेळाच्या प्रेमींनी एकत्रित होऊन नवीन संघटना बांधली. संघटना स्थापन झाल्यानंतर आम्ही पहिली स्पर्धा मडगावात केली. या स्पर्धेला मिळालेला पॉवरलिफ्टींगपटूंचा तसेच या खेळाच्या प्रेमींचा प्रतिसाद बघितल्यानंतर आम्ही सांगे, कुठ्ठाळी तसेच कालकोंडा येथे पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन केले’ असे गोविंद लोटलीकर म्हणाले.
’गोव्यात या खेळाला चांगला वाव आहे. मात्र स्पर्धेंची संख्या वाढली पाहिजे. शासनाचा पाठिंबा तसेच पुरस्कर्तेही पाहिजेत. आमचे यापुढे हेच लक्ष्य आहे. या खेळाकडे युवक आता जास्त आकर्षित झाले असून महिलांचा सहभागही वाढला आहे, असे लोटलीकर म्हणाले.
लक्षदा शिरोडकर, अॅग्नीस फर्नांडिस, श्रेया नाईक, जॉविएट मोनिज, इराम इर्षाद खत्री व बीवर्ली डिकॉस्ता यांनी नवी मुंबईत सुवर्णपदके मिळविताना केलेली कामगिरी तसेच त्यांचे पोडियमवर सुवर्णपदके स्वीकारताना चेहऱ्यावरील हास्य आणि समाधान पुष्कळ काही सांगून गेले. कित्येक महिने केलेल्या मेहनतीचे फळ गोव्याच्या पॉवरलिफ्टींगपटूंना या स्पर्धेतून मिळाले.
गोवा पॉवरलिफ्टींग अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष चिराग नायक तसेच आबुली रायकर, दामोदर नाईक, बाप्पा विर्डीकर व गोविंद लोटलीकर यांनी पॉवरलिफ्टींग खेळाला राज्यात भरारी देण्याचा केलेला यत्न स्त्युत्य आहे. पदरमोड करून संघांना राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिभा दाखविण्यासाठी पाठवणे हे कुठल्याही क्रीडा संघटनासाठी जिकिरीचे काम असते, मात्र पॉवरलिफ्टींग संघटनेने हे करून दाखविले असून ते यासाठी कौतुकास पात्र आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे खेळाडूंना मिळणारे मार्गदर्शनामुळेच तसेच खेळाडूंच्या अथक परिश्रमामुळे राष्ट्रीय पातळीवर गोव्याला हे धवल यश प्राप्त झाले हे कोणीही नाकारू शकणार नाहीत.
गोव्याच्या पॉवरलिफ्टर्सची शानदार कामगिरी
- जॉविएट मोनिजला ‘ज्युनियर स्ट्राँगेस्ट’ गर्लचा किताब
- रजत गडेकरला ‘स्ट्राँगेस्ट मॅन’चा किताब
- मेनार्ड फुर्तादोला ज्युनियर 83 किलो वजनीगटात सुवर्ण
- आर्यन सातार्डेकरला 93 किलो वजनीगटात सुवर्ण
- रजत गडेकरला सीनियर 66 किलो वजनीगटात सुवर्ण
- गौतम गावकरला सीनियर 59 किलो वजनीगटात सुवर्ण
- लक्षदा शिरोडकरला ज्युनियर 52 किलो वजनीगटात सुवर्ण
- अॅग्नीस फर्नांडिसला ज्युनियर 63 किलो वजनीगटात सुवर्ण
- श्रेया नाईकला सीनियर 63 किलो वजनीगटात सुवर्ण
- जॉविएट मोनिजला 72 ज्युनियर 72 किलो वजनीगटात सुवर्ण
- इरम इर्शाद खत्रीला ज्युनियर 84 किलोवरील वजनीगटात सुवर्ण
- बीवर्ली डिकॉस्ताला 84 किलो वजनीगटात सुवर्ण
- लिरॉय कार्दोझला ज्युनियर 74 किलो वजनीगटात रौप्य
- यश गाडला ज्युनियर 120 किलो वजनीगटात रौप्य
- नायजल फर्नांडिसला सीनियर 105 किलो वजनीगटात कांस्य
- संदीप मो. रेडकर