For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

‘डेडली’ मोहम्मद सिराज !

Advertisement

अलीकडच्या काळात भारताच्या वेगवान माऱ्याचं एक प्रमुख अस्त्र बनलाय तो मोहम्मद सिराज...गेल्या वर्षी आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला गारद केल्यानंतर यंदा जागतिक कसोटी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याचीच पुनरावृत्ती घडवत हैदराबादच्या या गोलंदाजानं संघातील आपलं महत्त्व पुरेपूर सिद्ध केलंय...

3 जानेवारी, 2024...दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स, केपटाऊन...पहिल्या कसोटीत दणदणीत पराभव झाल्यामुळं मालिका 2-0 नं हातची गमवावी लागण्याचा धोका डोक्यावर लटकणारा...पण दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील त्या सलग नऊ षटकांच्या ‘स्पेल’नं यजमानांचे सगळे इरादे उलटेपालटे करून टाकले...अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीनं सर्वांत प्रथम चौथ्या षटकात बळी घेतला तो एडन मार्करमचा. चेंडूनं त्याच्या बॅटची कड घेतली अन् स्लीपमध्ये यशस्वी जैस्वालनं झेपावत सुरेख झेल पकडला...सहाव्या षटकात शेवटची कसोटी खेळणाऱ्या कर्णधार एल्गरनं ऑफस्टम्पबाहेरील चेंडू ‘पंच’ करण्याच्या नादात यष्ट्यांवर ओढवून घेतला...10 व्या षटकात हुशारीनं लेगस्टम्पबाहेर केलेली गोलंदाजी खेळणं टोनी डी झोर्झीच्या अंगलट येऊन चेंडू बॅटच्या कडेला चाटत सरळ यष्टिरक्षक के. एल. राहुलच्या हातात पोहोचला...

Advertisement

एकाच गोलंदाजाचा मारा एका बाजूनं कायम राखण्याचा कर्णधार रोहित शर्माचा प्रयोग चांगलाच कामी आला...16 वं षटक...डेव्हिड बेडिंगहॅमला ड्राईव्ह करण्याच्या मोहात पाडलं गेलं अन् अपेक्षेहून जास्त उसळलेला चेंड ग्लोव्हजला घासून गेला यशस्वी जैस्वालच्याच दिशेनं...त्याच षटकाचा अंतिम चेंडू...दोन इनडिप्परनंतरचा आदर्श टप्प्यावरील लेगकटर अष्टपैलू मार्को जेनसेनला त्रासात टाकून गेला. बॅटच्या कडेला लागून चेंडू आरामात विसावला तो राहुलच्या ग्लोव्हजमध्ये...17 व्या षटकाच्या अन् त्या स्पेलच्या नवव्या षटकातील पाचवा चेंडू...काइल व्हेरिनला शुभमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडत परतीची वाट दाखविण्यात आली...

मोहम्मद शमीची उणीव पुरेपूर भरून काढताना मोहम्मद सिराजनं दक्षिण आफ्रिकेची अर्ध्याहून अधिक फळी केवळ 15 धावा देत 1.66 च्या ‘इकोनॉमी रेट’नं कापून काढली ती वेग, स्विंग, ‘सिम मूव्हमेंट’ नि अचूक टप्प्याच्या जोरावर...सिराजला ‘रोल बॉलर’ म्हटलं जातं ते उगाच नव्हे. कारण तो ज्या दिवशी जोमात येऊन अक्षरश: आग ओकू लागतो त्या दिवशी त्याच्यासमोर टिकून राहणं कठीणच...श्रीलंकेच्या संघाहून हे जास्त चांगल्या प्रकारे कुणीही सांगू शकणार नाही....गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन वेळा श्रीलंकेला त्यानं अशाच पद्धतीनं आडवं केलंय...

जानेवारीत थिऊअनंतपुरममध्ये मोहम्मद सिराजच्या सुऊवातीच्या 7-0-20-4 या स्पेलनं श्रीलंकेला 73 धावांवर गाशा गुंडाळायला लावण्यास अन् भारताला 317 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. हा श्रीलंकेचा 50 षटकांच्या सामन्यांतला सर्वांत मोठा पराभव...त्यानंतर सप्टेंबरमध्ये कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवरील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका टप्प्यावर सिराजच्या गोलंदाजीचे आकडे होते 5.2-1-7-6. शेवटी त्यानं 21 धावांत सहा बळी घेऊन यजमानांचा पुरता सफाया केला (त्यासरशी त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांत कमी म्हणजे 16 चेंडूंत पाच बळी मिळविण्याच्या चामिंडा वासच्या 2003 सालच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली)....आणि मग नोव्हेंबरमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात त्यानं 4 षटकांत (त्यापैकी दोन निर्धाव) अवघ्या पाच धावा देंऊन घेतलेल्या तीन बळींनी श्रीलंकेच्या घसरगुंडीचा नारळ फोडला. परिणामस्वरुप भारताच्या 8 बाद 357 धावांना प्रत्युत्तर देताना पाहुण्यांनी 55 धावांवर मान टाकली... गेल्या दीड वर्षात मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी यांच्या छायेतून बाहेर सरलाय, संघाचं मुख्य हत्यार बनलाय. मध्यंतरी बुमराह दुखापतींमुळं बाहेर पडलेला आणि शमीला सातत्याच्या अभावानं ग्रासलेलं...ही परिस्थिती त्याला मुसंडी मारण्यास आणखी फायदेशीर ठरली. पण महत्त्वपूर्ण बाब म्हणजे त्यानंही मिळालेली संधी वाया जाऊ दिली नाही आणि प्रतिस्पर्ध्यांना हादरे देण्याच्या बाबतीत सिराज भरवशाचं नाव बनत गेला...संघाला लवकर यश मिळवून देण्याची त्याची क्षमता हे भारतानं मागील काही काळात गाजविलेल्या वर्चस्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक !

गली क्रिकेट ते रणजी...

  • हैदराबादमधील नामवंतांच्या, धनिकांच्या राहण्याचं ठिकाण असलेल्या बंजारा हिल्सच्या सीमेवर वसलेल्या फर्स्ट लान्सर भागातील मोहम्मद सिराजची गली क्रिकेट ते भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य आधारस्तंभ बनण्यापर्यंतची झेप ही अभूतपूर्वच...क्रिकेटची आवड असली, तरी त्यानं योग्य चेंडूनं गोलंदाजी करण्यास सुरुवात केली ती पार 2015 मध्ये. तोपर्यंत तो टेनिसबॉलनं खेळायचा...
  • 13 मे, 1994 रोजी जन्मलेल्या सिराजचे वडील रिक्षाचालक...चारमिनार क्रिकेट क्लबचे मोहम्मद मेहबूब अहमद यांनी त्याला हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या लीगमध्ये सर्वप्रथम ‘ब्रेक’ दिला त्यावेळी त्याच्याकडे खेळण्यासाठी योग्य क्रिकेट बूटही नव्हते. पण त्यानं दाखविलेल्या भरपूर उत्साहानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं...
  • मोहम्मद सिराजनं हैदराबादतर्फे रणजी स्पर्धेत पाऊल ठेवलं तेव्हा प्रशिक्षक होते ते माजी सलामीवीर अब्दुल अझीम. त्यांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास सिराजची आई त्यांच्याकडे घरकाम करायला यायची अन् ती त्यांना नेहमी मुलाची गोलंदाजी पाहण्याचा आग्रह करायची...सिराजला रणजीत संधी मिळाली ती हैदराबादचा माजी कर्णधार पी. अक्षत रे•ाrनं 2015 मध्ये सेनादलाविरुद्धच्या बाद फेरीतील सामन्यासाठी त्याचा समावेश करावा अशी सूचना केल्यानं...

भरत अरुणनी बनविलं ‘मॅचविनर’...

  • मोहम्मद सिराजचं रणजीतील पदार्पण सामान्य राहिलेलं असलं, तरी हैदराबादनं पुढील हंगामात भारताचे माजी खेळाडू भरत अऊण यांची प्रशिक्षक म्हणून केलेली नियुक्ती त्याच्या झपाट्यानं प्रगतीस कारणीभूत ठरली. सिराजनं त्या मोसमात 9 सामन्यांत घेतलेले 41 बळी त्याला ‘आयपीएल करार’ मिळवून देऊन गेले...अझीम यांच्यानुसार, अऊण हे स्वत: मध्यमगती गोलंदाज राहिलेले असल्यानं त्यांची सिराजला घडवण्यात, त्याला ‘मॅचविनर’ बनवण्यात खूप मदत झाली. त्यातच त्याच्याकडे पटकन शिकण्याचं कसब होतं अन् त्यानं कष्टही घेतले खूप...
  • काही महिन्यांनी मोहम्मद सिराजसाठी सर्वप्रथम खुली झाली ती न्यूझीलंडविऊद्धच्या भारताच्या ‘टी-20’ संघाची दारं...त्यानंतर 15 जानेवारी, 2019 रोजी अॅडलेड इथं ऑस्ट्रेलियाविऊद्ध त्यानं एकदिवसीय संघात पाऊल ठेवलं, तर 2020 साली मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविऊद्धच त्याचं कसोटी पदार्पण झालं...सिराजच्या सुदैवानं त्यावेळी भरत अऊण यांच्याकडे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सूत्रं सोपविण्यात आली. त्यांचं मार्गदर्शन अन् भारताचा तत्कालीन कर्णधार विराट कोहलीचा विश्वास यांनी सिराजला वेगवान गोलंदाज म्हणून बहरण्याकामी मोलाची मदत केली...

कसोटीप्रमाणं ‘वनडे’तही भेदक...

  • सिराज हा आधी कसोटी क्रिकेटसाठी जास्त उपयुक्त मानला जात होता आणि त्यानंही पहिल्या 15 कसोटी सामन्यांमध्ये 30.39 च्या सरासरीनं 46 बळी घेऊन त्यावर मोहर उमटविली होती...पण मागील दोन वर्षांत त्यानं पांढरा चेंडू हाताळण्याच्या बाबतीतही आपण तितकेच कुशल असल्याचं दाखवून दिलंय...
  • आपल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात एकही बळी मिळविता न आलेला मोहम्मद सिराज तीन वर्षे संघाबाहेर राहिला. त्यानं पुनरागमन केलं ते 6 फेब्रुवारी, 2022 रोजी अहमदाबाद इथं झालेल्या वेस्ट इंडिजविऊद्धच्या सामन्यात. त्यानंतर सिराजनं मागं वळून पाहिलेलं नाही. 2022 साली त्यानं 15 एकदिवसीय लढतींतून 24 बळी घेतले, तर गेल्या वर्षी श्रीलंकेविऊद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 9 बळी घेत त्यानं सुरू केलेला धडाका पुढं कायम राहिला...

निर्णायक दणका...

  • दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातील त्या दणक्यानं नोंद केली ती मोहम्मद सिराजच्या त्या भूमीतील पहिल्या पाच बळींची...एकंदरित पाहता पाच बळी घेण्याची त्याची ही तिसरी खेप...त्यापूर्वी त्याची कसोटीच्या एका डावातील सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली होती ती गेल्या वर्षी जुलैमध्ये पोर्ट ऑफ स्पेन इथं वेस्ट इंडिजविऊद्ध. त्यात सिराजनं 60 धावांत 5 बळी मिळविले होते...तर त्यानं सर्वांत प्रथम ‘फायफर’ साध्य केला होता तो (5/73) 2020-21 च्या मोसमात ऑस्ट्रेलियाविऊद्ध ब्रिस्बेनमध्ये ....
  • दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत पाच बळी घेणारा तो 10 वा, तर सहा बळी टिपणारा केवळ चौथा भारतीय गोलंदाज...सिराजच्या आधी कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारापूर्वी पाच बळी घेतले होते ते फक्त डावखुरा फिरकीपटू मनिंदर सिंगनं 1987 साली बेंगळूरमध्ये पाकिस्तानविऊद्ध...
  • प्रकार      सामने      डाव          बळी         डावात सर्वोत्कृष्ट    सामन्यात सर्वोत्कृष्ट                  सरासरी  5 बळी      10 बळी
  • कसोटी   23              42              68             15 धावांत 6 बळी    126 धावांत 8 बळी                    28.25      3                 -
  • वनडे        41              40              68             -                  21 धावांत 6 बळी    22.81      1                  -
  • टी20         10               10               12               -                  17 धावांत 4 बळी   27.83     -                  -
  • आयपीएल                 79             79             78             -                  21 धावांत 4 बळी   29.82     -                  -

खेळ जुनाच ओळख नवी ! : ग्रीको रोमन कुस्ती

पहिलं आधुनिक ऑलिम्पिक म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या अथेन्समधील 1896 च्या स्पर्धेतील नऊ मूळ खेळांपैकी एक या नात्यानं ‘ग्रीको रोमन’ कुस्तीला या खेळांच्या इतिहासात विशेष स्थान प्राप्त झालंय...या शैलीची कुस्ती ही 1908 पासून नियमित ऑलिम्पिकमध्ये झळकलीय...

  • जगातील बहुतांश हौशी कुस्तीच्या प्रकारांप्रमाणं ‘ग्रीको रोमन’ कुस्तीतही कुस्तीपटूचं मुख्य उद्दिष्ट सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही खांद्यांना मॅटवर टेकवून ठेवणं किंवा निर्धारित वेळेच्या शेवटी अधिक गुण खात्यात जमा करणं हे असतं...
  • एका लढतीत तीन मिनिटांची दोन सत्रं असतात आणि त्यादरम्यान 30 सेकंदांचा ‘ब्रेक’ असतो. कुस्तीपटू धरून ठेवणं, कोंडी करणं वा जखडून ठेवणं, फेकणं किंवा इतर कायदेशीर पद्धतीनं प्रतिस्पर्ध्याला नमवून गुण मिळवू शकतो...
  • चाली अन् धरून ठेवण्यासाठी दिलेले गुण हे त्यांची अंमलबजावणी किती कठीण राहते त्यावर अवलंबून असतात. एकाच चालीतून जास्तीत जास्त पाच गुण मिळविता येतात ते ‘ग्रँड अॅम्प्लिट्यूड थ्रो’द्वारे. त्याची परिणती होते ती ‘धोकादायक स्थितीत’ म्हणजे प्रतिस्पर्ध्याची पाठ ‘मॅट’वर अनेक सेकंदांसाठी टेकवून ठेवली जाते. या चालीमध्ये प्रतिस्पर्ध्याला उचलून जमिनीवर फेकणे आणि त्याच्यावर नियंत्रण मिळविणे यांचा समावेश असतो...
  • प्रतिकारातून किंवा बाजी उलटवून म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर बचावात्मक स्थितीतून उसळी घेऊन नियंत्रण मिळविल्यास गुण मिळू शकतात. त्याचप्रमाणं प्रतिस्पर्धी कुस्तीपटूनं उल्लंघन करून त्याबद्दल त्याला इशारा मिळाल्यास गुणप्राप्ती होते...दोन फेऱ्यांच्या शेवटी गुणांची बेरीज केली जाते आणि सर्वाधिक गुण मिळविणारा कुस्तीपटू लढत जिंकतो...
  • बरोबरी झाल्यास विजेता ठरविताना सामन्यादरम्यान सर्वोच्च मूल्याची (गुणाची) केलेली चाल, मिळालेल्या इशाऱ्यांची कमीत कमी संख्या आणि नोंदविलेला शेवटचा तांत्रिक गुण या क्रमानं निकष विचारात घेतले जातात...
  • प्रतिस्पर्ध्याला चीत करून देखील विजय मिळवता येतो. यामध्ये प्रतिस्पर्ध्याला खाली पाडून त्याचे दोन्ही खांदे ‘मॅट’ला स्पर्श करतील या पद्धतीनं पुरेशा कालावधीसाठी त्याला दाबून ठेवावं लागतं. यात झटपट विजय नोंदला जातो...
  • निर्विवाद विजयाचा दुसरा मार्ग म्हणजे तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठता गाजविणं किंवा प्रतिस्पर्ध्यावर निश्चित आघाडी मिळवणं. आठ गुणांची आघाडी मिळविल्यास तांत्रिक श्रेष्ठता सिद्ध होऊन विजय पदरात पडतो...
  • प्रतिस्पर्ध्याला अपात्र ठरवलं, तो जखमी झाला किंवा पुढे चाल मिळाली, तर सामना कुस्तीपटूच्या नावावर जमा होऊ शकतो...
  • ‘ग्रीको रोमन’ नि ’फ्रीस्टाइल’ कुस्तीमधील लढतीची गुणमापन पद्धती व नियम कमीअधिक प्रमाणात समान असले, तरी दोन्हींमध्ये काही प्रमुख तांत्रिक फरक आहेत. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे ‘ग्रीको रोमन’ कुस्तीमध्य कंबरेच्या खाली धरण्यास मनाई असते अन् कुस्तीपटूला कोणतीही आक्रमक किंवा बचावात्मक कृती करण्यासाठी त्याचे पाय सक्रियपणे वापरण्यास परवानगी नसते. त्यामुळं ‘फ्रीस्टाइल’ कुस्तीच्या तुलनेत या प्रकारात वर्चस्व गाजविण्यासाठी कुस्तीपटूंना त्यांच्या शरीराच्या वरच्या भागावर जास्त अवलंबून राहावं लागतं...

- राजू प्रभू

बॅडमिंटनमधील प्रेरणा...

कोल्हापूरच्या प्रेरणा आळवेकरची यशोगाथा : राष्ट्रीय स्पर्धांमधील यशामुळे देशात मिळाली 73 वी रँक, गतवर्षी प्रतिष्ठेची सिनिअर नॅशनल वुमन्स बॅडमिंटन स्पर्धा खेळण्याचेलाभले भाग्य, भारतीय संघातून दोनदा खेळली शालेय आंतरराष्ट्रीय स्पर्धा  बालेवाडीत (पुणे) गतवर्षी झालेल्या सिनिअर नॅशनल वुमन्स बॅडमिंटन टुर्नार्मेंटसाठी महाराष्ट्राकडून कोल्हापूरची प्रेरणा आळवेकर सिलेक्ट झाली आणि एक दर्जेदार बॅडमिंटनपटू म्हणून प्रकाशझोतात आली. यानिमित्ताने तब्बल 42 वर्षांनंतर तीने सिनिअर नॅशनलमध्ये कोल्हापूरची बॅडमिंटनपटू म्हणूनही प्रतिनिधीत्व केले. सिनिअर नॅशनल खेळणे हे देशातील बॅडमिंटनमध्ये प्रतिष्ठेच मानलं जातं. ही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तीने दर्जेदार खेळ करत गतवर्षी नागपूर, नांदेड व बुलढाणा येथे झालेल्या सिनिअर स्टेट बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये नामवंत महिला बॅडमिंटनपटूंना हरवत दोनदा उपांत्य व उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने तिला सिनिअर नॅशनल खेळण्याची संधी दिली. गेली 13 वर्षे बॅडमिंटनचा अखंडीत सराव करण्याबरोबरच राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यश आणि अनुभवाचे हे फलित आहे.

आवडीखातर घराच्या अंगणात नेट बांधून बॅडमिंटनचा सराव केलेल्या प्रेरणा आळवेकरने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत घेतलेली झेप प्रशंसनीय आहे. प्रेरणा ही वडणगे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) या गावची. तिला 2010 साली वडणगेतील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यामंदिरच्या तिसरीमध्ये शिकत असताना बॅडमिंटनची आवड लागली. आवडीला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक असलेले वडील शिवाजी आळेवकर यांनी तिला नेट, एक शटल (फुल) व त्याकाळी 100 रुपयांना मिळणारी रॅकेट आणून दिली. घराच्या अंगणामध्येच नेट बांधून ती  थोरली बहिणी ऋचाबरोबर बॅडमिंटन खेळू लागली. खेळता खेळता प्रेरणामध्ये बॅडमिंटनची ऊची वाढली. त्याकडे गांभिर्याने पाहून वडिल व त्यांचे मित्र निवास सासने यांनी बॅडमिंटन कोच अनिल जाधव यांच्याकडे प्रेरणाला सरावासाठी पाठवले. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षे सराव केल्यानंतर प्रेरणा शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली. तिच्याकडे विऊद्ध खेळाडूच्या कोर्टात वेगाने शटल मारण्याची ताकद निर्माण झाली. मैदानात अर्धातास न दमता खेळण्याचीही क्षमताही तिच्यात तयार झाली. स्पर्धेतील जय-पराजय पचवत ती बॅडमिंटनचा सराव करतच राहिली. कालांतराने सासने ग्राऊंडमधील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये कोच महेश सावंत, केदार नाडगोंडा, अक्षय मनवाडकर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने तीने बॅडमिंटनचे आधुनिक धडे घेतले. हे धडे देताना प्रशिक्षकांनी तिच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित मोठ्या स्पर्धांचे व्हिजनही ठेवले. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून वडणगेतील देवीपार्वती हायस्कूलमध्ये शिकत असताना शालेय स्पर्धेच्यानिमित्ताने प्रेरणाने 14 वर्षाखालील मुलींच्या गटातून शहर, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धा जिंकत-जिंकत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. एकट्या प्रेरणाने जिद्दीने खेळ करत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. स्पर्धेतील कामगिरीबद्दल झालेल्या कौतुकाने हरकुन गेलेल्या प्रेरणाने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनतर्फे रत्नागिरीत झालेल्या राज्य स्पर्धेतील 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात तीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे तिची तेनाली (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या 31 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. मात्र स्पर्धेत फारसे यश मिळाले नसले तरी राष्ट्रीय स्पर्धा कशी खेळतात याचा तिला अनुभव मिळाला. याच अनुभवाच्या जोरावर तीने 2018 साली एलुरु (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. स्पर्धेत तीने सर्व मुलींना भारी पडत सुवर्ण पदक मिळवले. पुढील राष्ट्रीय स्पर्धेत मात्र खराब कामगिरीमुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या पदकी कामगिरीची दखल घेवून प्रथमच तिला खेलो इंडिया प्राधिकरणाने दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवडले. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यापर्यंत मजल मारत तीने आपली राष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळख तयार केली. शिवाय उपांत्यपुर्व फेरीपर्यंत मारलेल्या मजलची  दखल घेत तिला देशाच्या इंटरनॅशनल स्कूल गेम फेडरेशनने आग्रा येथे झालेल्या भारतीय 18 वर्षाखालील मुलींच्या संघ निवड चाचणीसाठी निमंत्रित केले. यावेळी ती महावीर कॉलेजात शिकत होती. चाचणीसाठी देशातून आलेल्या 28 मुलींमध्ये स्पर्धा घेतली. या स्पर्धेत तीने लक्षवेधी खेळी करत तिसरा क्रमांक मिळवला. या कामगिरीमुळे तिला पाच मुलींचा सहभाग असलेल्या भारतीय संघात स्थान मिळाले. बालेवाडी (पूणे) येथे वर्ल्ड स्कूल गेम्सअंतर्गत झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रेरणाचा सहभाग असल्याने भारतीय संघाने दुहेरी प्रकारामध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत झेप घेतली. यानंतर 2018 साली वर्ल्ड फेडरेशन ऑफ स्कूल गेम्सने आयोजित केलेल्या एशिएन स्कूल गेम्समधील बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या चाचणीलाही प्रेरणाला बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने निमंत्रित केले. बालेवाडीत झालेल्या चाचणीतही शानदार खेळाचे प्रदर्शन करत भारतीय संघात स्थान मिळवले. यातून तीने आपल्यात राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची क्षमता असल्याचे अधोरेखित केले. नागपुरात झालेल्या एशिएन स्कूल गेम्समधील बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघातून दुहेरी प्रकारातील सामने खेळताना तीने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. 2018 साली एरागुंताडा (आंध्रप्रदेश) झालेल्या शालेय 19 वर्षाखालील मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेतही प्रेरणाचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र संघाने अंतिम फेरीपर्यंत मजत सुवर्ण पदक जिंकले. स्पर्धेच्या वैयक्तिक गटातही तीने अंतिम फेरीपर्यंत झेपावत रौप्य पदक मिळवले.

या सर्व कागगिरीची दखल घेऊन खेलो इंडिया प्राधिकरणाने 2018 साली बालेवाडी येथे झालेल्या खेलो इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी प्रेरणाची निवड केली. या स्पर्धेत तीने बेंगळूर, हैद्राबाद, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील मुलींना पराभूत कऊन उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक दिली. विद्यापीठ पातळीवर झालेल्या स्पर्धेतही तीने शानदार कामगिरी कऊन दाखवली आहे. तीने कोल्हापूर जिल्हा कॉलेजअंतर्गत झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून आंतरविभागीय महाविद्यालयीन स्पर्धेसाठी निवडलेल्या पाच जणींच्या टीमध्ये स्थान मिळवले. या टीमध्ये प्रेरणासोबत थोरली बहिण ऋचा आळवेकर हिचाही सहभाग होता. या टीमने आंतरविभागीय महाविद्यालयीन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. त्यामुळे प्रेरणा, ऋचाचा सहभाग असलेल्या टीमची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. या स्पर्धेतही शिवाजी विद्यापीठ संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी प्रेरणा व ऋचाने केलेला शानदार खेळ महत्वपूर्ण ठरला. पश्चिम विभागीय पातळीवर मिळालेले सुवर्ण पदक हे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या इतिहासातील पहिले पदक ठरले. इतकेच नव्हे तर विद्यापीठाची टीम भोपाळमध्ये (मध्यप्रदेश) झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठीही पात्र ठरली होती.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून मिळालेला अनुभव पणाला लावत स्वत:च्या हिंमतीवर प्रेरणाने गतवर्षी देशात प्रतिष्ठेची समजली जाणारी सिनिअर नॅशनल वुमन्स बॅडमिंटन टुर्नार्मेंट खेळण्याची संधी मिळवली. नागपूर, बुलढाणा आणि नांदेड झालेल्या सिनिअर स्टेट बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये उत्तम खेळाच्या जोरावर नामवंत महिला बॅडमिंटनपटूंना पराभूत करत दोनदा उपांत्यपूर्व व एक उपांत्य फेरीपर्यंत मजल माऊन 4 गुण मिळवले. याची दखल घेऊन तिला सिनिअर नॅशनलसाठी पात्र ठरवले गेले. 42 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या बॅडमिंटनपटू वर्षादेवी नोडगौंडे ह्या सिनिअर नॅशनल टुर्नार्मेंट खेळल्या होत्या. नाडगौंडे यांनी कौतुक करताना प्रेरणाला रणरागिणी म्हणून संबोधले होते. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे बालेवाडीमध्ये झालेल्या सिनिअर नॅशनलमध्ये प्रथमच खेळताना तीन सामने जिंकून आगेकुच केली होती. मात्र चौथ्या सामन्यात तिचा पराभव झाला. प्रेरणाने गोवा येथे झालेल्या 37 व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना रौप्य पदक व गुवाहाटी (आसाम) येथे गेल्याच महिन्यात झालेल्या 76 व्या आंतरराज्य व आंतरविभागीय स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना सुवर्ण पदक मिळवले. तसेच 85 व्या सिनिअर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेतील दुहेरी प्रकारात प्रेरणाने मृण्मयी देशपांडेच्या (सोलापूर) साथीने कांस्य पदक पटकावले. आजवरच्या सर्व स्पर्धांचा अनुभव घेऊन प्रेरणा ही सध्या राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिकचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रोज पाच तास सराव करत आहे.

स्पर्धेपर्यंत जाण्यासाठी आर्थिक पाठबळ देणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचाही माझ्या यशात मोठा वाटा आहे, वडील शिवाजी आळेवकर हे तर बॅडमिंटनच्या सरावाच्या पहिल्या दिवसापासून आजअखेरपर्यंत एक आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, असे सांगून प्रेरणा म्हणाली की, मी गेल्या 3 वर्षापासून तन्मय करमरकर बॅडमिंटन अॅकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक तन्मय करमरकर यांच्याकडून बॅडमिंटनचा आधुनिक सराव करत आहे. करमरकरांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे माझ्यामध्ये बॅटमिंटनच्या मैदानात दीड तास टिकून राहण्याची आणि ताकतीने विऊद्ध खेळाडूला टक्कर देण्याची क्षमता निर्माण झाली आहे. मी गेल्या दोन वर्षा 6 राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. या स्पर्धांमध्ये वैयक्तिक व टीममधून खेळताना 1 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य पदक मिळवले. या कामगिरीमुळे मला देशात 73 वे रॅकींग मिळाले आहे. या रॅकींगमुळेच माझ्यासाठी इंटरनॅशनल स्पर्धांचे द्वार खुले झाले आहे. त्यानुसार मी 5 ते 11 व 12 ते 18 फेब्रुवारीमध्ये 2024 या कालावधीत कोलंबोत (श्रीलंका) होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी जाणार आहे.

संग्राम काटकर, कोल्हापूर

Advertisement
Tags :

.