For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

‘मिस्टर डिपेंडेबल’...राहुल द्रविड !

Advertisement

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता राहुल द्रविडचा प्रशिक्षक या नात्यानं डावही संपुष्टात आलाय असं वाटत होतं...पण ‘बीसीसीआय’नं पुन्हा एकदा, आगामी ‘टी20’ विश्वचषकापर्यंत भरवसा ठेवलाय तो ‘मिस्टर डिपेंडेबल’वरच...द्रविडच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीवर टाकलेला एक दृष्टिक्षेप...

राहुल द्रविड...भारतीय क्रिकेटची ‘दि वॉल’...त्याच्या वाट्याला प्रशंसा नि आदर भरपूर आला. तरीही प्रकाशझोताचा विचार करता सदैव मिळालं ते दुसरं स्थान...तो नेहमी पडद्यामागं राहिला असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये...त्याच्याकडे ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरसारखं ‘मास अपिल’, वीरेद्र सेहवागसारखा बिनधास्तपणा, व्ही. व्ही. एस. लक्ष्मणसारखी कलात्मकता, सौरव गांगुलीसारखी आक्रमकता अन् महेंद्रसिंह धोनीसारखा धूर्तपणा कधीच नव्हता...पण संघांवर जेव्हा जेव्हा संकट ओढवायचं तेव्हा तेव्हा आठवण यायची ती त्याचीच अन् तो देखील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरल्यानंतर अभेद्य भिंतीसारखा उभा राहून साऱ्या अपेक्षा इमाने इतबारे पूर्ण करायचा. कारण भक्कम बचाव नि परिपूर्ण तंत्र तो कोळून प्याला होता...द्रविडला ‘मिस्टर डिपेंडेबल’ म्हणजेच भरवशाचा खेळाडू असं टोपणनाव मिळालं ते उगाच नव्हे...

Advertisement

परिस्थिती विपरित असताना न डगमगता भिडण्याचं राहुल द्रविडचं फलंदाज या नात्यानं वैशिष्ट्या त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतही जाणवल्याशिवाय राहिलं नाही...अलीकडेच संपलेल्या एकदिवसीय लढतींच्या विश्वचषकात भारताला ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात चीत केल्यानंतर सर्वांना धक्का बसला. कारण साखळी फेरीपासून उपांत्य सामन्यापर्यंत भारतीय संघानं अक्षरश: ‘रोड रोलर’ फिरविल्यागत विरोधकांना नेस्तनाबूत केलं होतं. त्यामुळं अपेक्ष गगनाला भिडल्या होत्या...विश्वचषक अक्षरश: हातातून हिरावून घेतला गेल्यानंतर विराट कोहली व कर्णधार रोहित शर्माला अश्रू आवरले नाहीत. द्रविड मात्र आपल्या नेहमीच्या शांत शैलीत मीडियाला सामोरं जाऊन म्हणाला, ‘आम्ही यातून शिकू, ते प्रतिबिंबित करू अन् पुढे जाऊ. खेळाडू म्हणून तुम्ही तेच करायचं असतं’...

पण ही परिस्थिती राहुल द्रविडला अनोखी नव्हे...याहून कमालीचं वाईट वातावरण होतं ते 2007 साली...त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या स्पर्धेत विश्वचषकाच्या इतिहासातील नीचांकी कामगिरीपैकी एक नोंदविली होती. बांगलादेश व श्रीलंकेकडून पराभूत झालेल्या भारताला साखळी फेरी देखील ओलांडता आली नव्हती...मग क्रिकेटवेड्या भारतीयांच्या अनावर झालेल्या रोषाचा तडाखा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, एम. एस. धोनी, झहीर खानसारख्यांना बसला. वीरेंद्र सेहवागनं तर स्वत:ला खोलीत कोंडूनच घेतलं. अशा वेळी द्रविड धोनी नि इरफान पठाणकडे जाऊन म्हणाला, ‘आम्ही सगळेच अस्वस्थ आहोत. चला, एखादा चित्रपट पाहून येऊया’...धक्का बसलेल्या त्या दोघांना मग त्यानं सांगितलं, ‘आम्ही विश्वचषक स्पर्धा गमावलीय खरी. आम्हा सर्वांना मोठा फरक घडवून आणायचा होता. पण ही काही अखेर नव्हे. जीवन याहून किती तरी मोठं आहे. आम्ही उद्या पुन्हा उसळी घेऊ’...यातून दिसून येते ती राहुलची कणखर मानसिकता. त्याच मानसिकतेनं त्यानं भारतीय किकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचं सुकाणू संभाळलंय...

‘मिस्टर डिपेंडेबल’कडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं सोपविण्यात आली ती रवी शास्त्राr युगाची समाप्ती झाल्यानंतर. त्यावेळी परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. विराट कोहलीनं कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिलेली अन् रोहित शर्मानं जबाबदारी स्वीकारलेली...प्रशिक्षक या नात्यानं त्याच्यासमोर आव्हान होतं ते खेळाडूंना कसं खेळायचं हे शिकविण्याचं नव्हे, तर योग्य दिशा देण्याचं, विस्कटलेली घडी जाग्यावर घालण्याचं आणि वरिष्ठ खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर खेळण्यात, कामगिरी करून दाखविण्यात आनंद वाटेल याची काळजी घेण्याचं...हा काही 19 वर्षांखालील किंवा ‘भारत अ’सारखा संघ नव्हता. त्या चमूंतील युवा खेळाडू दिग्गज मार्गदर्शक या नजरेतून द्रविडकडे पाहायचे. इथं सर्वांचे अहंकार सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. खेरीज खेळाडू त्यांच्या स्वत:च्या ध्येयाबरोबर संघाच्या यशासाठी एकत्र येऊन खेळण्यावर लक्ष केंद्रीत करतील याचीही तजवीज करायची होती...

त्यातच पहिली परीक्षा ही एकदिवसीय सामन्यांत लागून त्यामध्ये नव्यानं नियुक्त केलेल्या पूर्णवेळ कर्णधाराविना उतरावं लागलं. गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये झालेल्या त्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 3-0 असा ‘व्हाईटवॉश’ केला...भारतासाठी 2022 चा शेवट देखील चांगला झाला नाही. कारण ते परदेशात न्यूझीलंड नि बांगलादेशकडून हरले. परिस्थिती आणखी बिघडविली ती ‘टी20’ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडनं 10 गडी राखून मिळविलेल्या विजयानं...मग राहुल द्रविडच्या प्रशिक्षण कौशल्यावरही प्रश्न उठू लागले. या पार्श्वभूमीवर त्याला जास्त तारलं ते कसोटी असो वा एकदिवसीय-‘टी20’ मालिका, मायदेशात भारतानं गाजविलेल्या वर्चस्वानं...

राहुल द्रविडच्या दुर्दैवानं प्रमुख खेळाडूंना सतत दुखापती झाल्यामुळे संघ पूर्ण ताकदीनं बराच काळ खेळू शकला नाही...याबाबतीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव प्रकर्षानं भासली. काही वेळा कर्णधारही बदलले ते त्याच कारणासाठी. दक्षिण आफ्रिकेतील ज्या मालिकेनंतर विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिली त्यातील तीनपैकी एका सामन्यात तो जखमी झाल्यानं के. एल. राहुलला भार पेलावा लागला. नियमित कर्णधार रोहित शर्मा तसंच उपकर्णधार राहुल इंग्लंडमधील निर्णायक कसोटीला मुकले...विश्वचषकाच्या दोन महिने आधीपर्यंत भारताची मधली फळी पूर्ण ताकदीनिशी खेळू शकेल की नाही याविषयी शंका होती. कारण होतं दुखापतीशी बराच काळ झुंजाव्या लागलेल्या राहुल नि श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीविषयी असलेलं प्रश्नचिन्ह. परंतु भारताचं नशीब बलवत्तर असल्यानं विश्वचषक येईपर्यंत रिषभ पंत वगळता बुमराहसह सर्वजण पूर्णपणे तंदुऊस्त होऊन परतले...

खरं तर भारतानं गती घेतली होती ती श्रीलंकेत आशिया चषक जिंकल्यानंतर. एकदा संघरचना निश्चित होऊन सूर गवसला, संघ एका ध्येयावर केद्रीत झाला की, गरज राहते ती फक्त आत्मविश्वासाची. विश्वचषकातील प्रत्येक सामन्यानिशी तो वाढत गेला...जवळपास प्रत्येक फलंदाज फॉर्ममध्ये होता अन् गोलंदाजी तर विलक्षण अपवादात्मक राहिली. भारताच्या वाट्याला भलेही उपविजेतेपद आलं असेल, परंतु स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून बोट दाखवावं लागेल ते त्याच्य्राकडेच यात शंका नाही...

प्रशिक्षक या नात्यानं राहुल द्रविडची पहिली इनिंग झाली ती 2016 मध्ये. त्यावेळीही 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम सामन्यात विंडीजसमोर नमतं घ्यावं लागलं होतं...त्या चमूतील रिषभ पंत, इशान किशन, शुभमन गिल यासारख्या सध्याच्या उगवत्या ‘स्टार्स’ना विकसित करण्यात त्याची मोठी भूमिका राहिलीय. द्रविडनं विराट कोहलीला देखील त्याचा ‘फॉर्म’ गवसण्याकामी मदत केली अन् त्याचा परिणाम विश्वचषकात पुरेपूर दिसून आला. या स्पर्धेत त्यानं रोहित शर्माला सोबत घेऊन आखलेल्या आक्रमक डावपेचाच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल...राहुल द्रविडच्या मुकुटात उणीव आहे ती ‘आयसीसी’च्या स्पर्धेच्या किताबाची. येत्या ‘टी20 विश्वचषका’तून ती सुद्धा दूर करण्याची संधी ‘दि वॉल’कडे चालून आलीय !

द्रविडची प्रशिक्षक या नात्यानं कामगिरी...

 • प्रकार   सामने   विजय   पराभव  टाय      अनिर्णीत
 • कसोटी  17       9         5         -         3
 • वनडे    53       36        14       -         3
 • टी20     56       39       15       1         1

राहुल द्रविडच्या कार्यकाळात भारतीय संघाची वाटचाल...

 • राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली ती नोव्हेंबर, 2021 मध्ये आणि त्याच्या मूळ कराराची मुदत यंदाच्या एकदिवसीय सामन्याच्या विश्वचषकानिशी संपुष्टात आली...
 • प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीनं भारताला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अग्रक्रमांकावर पोहोचविलं...
 • यंदाच्या सुऊवातीला मायदेशात ऑस्ट्रेलियाविऊद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताची जी सरशी झाली त्याचा एक शिल्पकार द्रविड होता...
 • द्रविडच्या कार्यकाळात भारतानं श्रीलंका आणि न्यूझीलंडविऊद्ध मायदेशी झालेल्या कसोटी मालिका तसंच बांगलादेश नि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या कसोटी मालिकाही खिशात घातल्या...
 • द्रविडच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारतानं ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अन् श्रीलंकेविरुद्ध स्वगृही खेळविण्यात आलेल्या ‘टी20’ मालिका जिंकल्या. शिवाय एकदिवसीय सामन्यांच्या आशिया चषक स्पर्धेचा किताबही मिळवून दाखविला...
 • पण कित्येकदा उतरंडही पाहावी लागली...दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 नं आघाडी घेतल्यानंतर सुद्धा मालिका 1-2 नं गमावली...
 • गेल्या वर्षी झालेल्या ‘टी20’ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला खरा, परंतु अॅडलेडमध्ये इंग्लंडकडून पराभूत होण्याची पाळी आली...
 • इंग्लंडमधील निर्णायक पाचवी कसोटी गमावली...खेरीज ‘आयसीसी’च्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडूनच पराभूत व्हावं लागलं...
 • एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात सलग 10 सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केल्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार करता आलं नाही...

फलंदाजीतील ‘दि वॉल’...

 • प्रकार   सामने   डाव     नाबाद   धावा     सर्वोच्च  सरासरी शतकं   द्विशतकं अर्धशतकं
 • कसोटी  164      286      32       13288    270      52.31    36        5         63
 • वनडे    344      318      40       10889   153      39.17    12       -         83
 • टी20     1         1         -         31        31        31        -         -         -
 • आयपीएल         89       82       5         2174    75       28.23    -         -         11

खेळ जुनाच ओळख नवी ! ‘फुटसाल’

‘फुटसाल’, ज्याचे सामान्यत: ‘इनडोअर फुटबॉल’ असे भाषांतर केले जाते, हे नाव स्पॅनिश भाषेतील ‘फुटबोल साला’ आणि पोर्तुगीज भाषेतील ‘फुटबॉल दि सालांव’मधून आले आहे. ‘फुटसाल’ हा फुटबॉलचा मिनी म्हणजे ‘फाइव्ह-ए-साइड’ (पाच खेळाडूंच्या संघाचा) अवतार असून फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था ‘फिफा’ने मंजूर केलेला ‘इनडोअर फुटबॉल’चा हा एकमेव प्रकार....

 • ‘फुटसाल’च्या उत्पत्तीची मुळे दक्षिण अमेरिकेत सापडू शकतात. अर्जेंटिनात जन्मलेले प्रशिक्षक जुआन कार्लोस सेरिआनी यांनी 11 खेळाडूंचा संघ ज्यात मैदानात उतरतो त्या पारंपरिक फुटबॉलचा एक प्रकार उऊग्वेतील इनडोअर स्पर्धांसाठी तयार केला. त्याचवेळी ब्राझीलमधील साओ पाउलोमध्येही रस्त्यांवर एक खेळ साकारू लागला होता. पाहता पाहता ‘फुटसाल’ दक्षिण अमेरिकेत पसरला आणि त्यात उर्वरित जगातील सहभागही वाढत गेला. ‘फिफा’च्या अंदाजानुसार, जागतिक स्तरावर सध्या ‘फुटसाल’ खेळणाऱ्यांची संख्या तीन कोटींहून अधिक...
 • ‘फिफा’च्या अभ्यासात असेही दिसून आले आहे की, त्यांच्या 211 सदस्य संघटनांपैकी 170 पेक्षा जास्त ठिकाणी ‘फुटसाल’ खेळला जातो. पारंपरिक फुटबॉल मैदानापेक्षा जवळपास आठ पट लहान मैदानावर लहान चमूसह खेळल्या जाणाऱ्या या वेगवान खेळात अचूक तांत्रिक अंमलबजावणीची आवश्यकता असते...
 • ब्युनोस आयर्स येथे 2018 साली झालेल्या उन्हाळी युवा ऑलिम्पिक खेळांत प्रथमच ‘फुटसाल’ झळकला. पुऊष व महिलांच्या गटांत त्यावेळी 10 संघ सहभागी झाले होते. ‘फिफा’ची महिलांसाठीची ‘फुटसाल’ स्पर्धा होण्याची देखील ही पहिलीच खेप होती...
 • ‘फुटसाल’ हा ज्या चेंडूने खेळला जातो जो पारंपरिक फुटबॉलइतका उसळत नाही...सहसा त्याचे मैदान 40 मीटर लांब अन् 20 मीटर रुंद असते अन् ‘गोल पोस्ट’ही लहान म्हणजे 3 मीटर रुंदीचा अन् 2 मीटर उंचीचा असतो...
 • हा खेळ 20 मिनिटांच्या दोन सत्रांमध्ये खेळला जातो आणि त्यांच्यात 15 मिनिटांचे मध्यांतर असते. जेव्हा खेळ चालू नसतो किंवा सामन्यात खंड पडतो तेव्हा घड्याळ थांबवले जाते. खेळ पुन्हा सुरू झाल्यावरच घड्याळ पुन्हा सुरू केले जाते...
 • प्रत्येक संघ एका सत्रात एका मिनिटाच्या ‘टाइम आउट’ची विनंती करू शकतो. हे तेव्हाच केले जाऊ शकते जेव्हा अशी विनंती करणाऱ्या संघाच्या ताब्यात चेंडू असतो आणि ‘टाइमकीपर’ला सूचित केलेले असते. जर एखादा सामना अतिरिक्त वेळेत गेला, तर तिथे ‘टाइम आउट’ची सोय असत नाही...
 • प्रत्येक संघ एक गोलरक्षक आणि चार आउटफिल्ड खेळाडूंसह सामन्याला प्रारंभ करतो. 40 मिनिटांच्या कालावधीत नऊपर्यंत अतिरिक्त खेळाडू वापरले जाऊ शकतात आणि ते अमर्यादित वेळा बदलले जाऊ शकतात. ‘फुटसाल’चे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे खेळ न थांबवता हे बदल करता येतात...
 • जर एखाद्या खेळाडूने ‘फाऊल’ केले, तर पंच थेट किंवा अप्रत्यक्ष फ्री-किक आणि पेनल्टी क्षेत्रामध्ये ‘फाऊल’ झाल्यास पेनल्टी देण्याचा निर्णय घेऊ शकतो. फुटबॉलप्रमाणेच ‘फुटसाल’मध्ये पिवळी नि लाल कार्डे दाखविली जातात. जर एखाद्या खेळाडूला लाल कार्ड दाखवले गेले, तर त्याच्या जागी दोन मिनिटांच्या अनिवार्य दंडानंतर बदली खेळाडू उतरविला जाऊ शकतो. या कालावधीत संघावर गोल झाल्यास सदर दोन मिनिटे पूर्ण होण्यापूर्वीच बदली खेळाडू मैदानात उतरू शकतो...

- राजू प्रभू

क्रीडानगरी कोल्हापुरातील ऑलराऊंडर खेळाडू अन् आंतरराष्ट्रीय हॉकी पंच : श्वेता पाटील

वडील (कै.) किशोर पाटील यांची तळमळ आणली सत्यात, राष्ट्रीय हॉकी, क्रिकेट व फुटबॉल म्हणूनही कमवले नाव, सहा देशातील आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत सांभाळली पंचगिरीची जबाबदारी कोल्हापुरातील श्वेता पाटील या तऊणीला क्रीडा क्षेत्रातील एक चमकता तारा म्हणून संबोधले तर ते वावगे होणार नाही. ती फक्त हॉकीच नव्हे तर क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये आपण किती कसलेली आणि ऑलराऊंडर खेळाडू आहोत हे दाखवून दिले आहे. तिच्यात विविध खेळामध्ये एक चांगली खेळाडू होण्याच बळ आलं ते वडील (कै.) किशोर पाटील यांच्यामुळेच. प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकताना वडीलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे श्वेता पहिल्यांदा हॉकी खेळण्यासाठी मैदानात उतरली. इतर खेळांच्या तुलनेत हॉकीसाठी जास्ती प्रमाणात धावून खेळावा लागत असल्याने वडीलच तिच्याकडून रोज व्यायामासह धावण्याचा सराव करवून घेत होते. या रोजच्या सरावामुळेच तिला पद्माराजे हायस्कूलच्या हॉकी संघात स्थान तर मिळाले शिवाय तिच्यातील राष्ट्रीय हॉकीपटू, क्रिकेटपटू व फुटबॉलपटूचे दर्शन देशाला घडले. तसेच तिच्यातील आंतरराष्ट्रीय हॉकी पंचचे दर्शन जगभरातील हॉकी क्षेत्राला झाले.

हॉकीच्या सरावाला सुऊवात करण्यापूर्वी श्वेताही इतर मुलींसारखीच पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पाचवीचे शिक्षण घेत होती. मात्र मैदानात उतरल्यानंतर तिला हायस्कूलचे क्रीडा शिक्षक महेश सूर्यवंशी यांचे मोलाचे पाठबळ लाभले. त्यांनी तिच्याकडून हॉकीच्या मैदानात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेला सराव रोजच्या रोज करवून घेतला. त्यामुळे तिच्यात हॉकीच्या मैदानामध्ये राईट आऊट फॉरवर्डला खेळण्याइतपत क्षमता निर्माण झाली. ती पाहून वडील किशोर पाटील यांनी तिला तू हॉकीतच करिअर कर, असा सल्ला दिला. त्यांचा सल्ला मनात ठेवून श्वेता हॉकीचा सराव जेमाने कऊ लागली. श्वेता ही नववीत शिकत असताना मात्र अचानक वडीलांचे निधन झाले. हॉकीचाच नव्हे तर जणू जीवनाचा मार्गदर्शक गमवल्याची तिची भावना झाली. यानंतर मात्र आई अश्विनी पाटील व आजी सविता पाटील ह्या वडीलांप्रमाणे श्वेताच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळेच तिच्यातील हॉकी खेळण्याची जिद्द कोलमडली नाही. दहावीपर्यंत सतत शालेय हॉकी स्पर्धा खेळत राहिली. या स्पर्धांसाठी सराव करताना सामन्यातील सर्वात महत्वाचा भाग असलेल्या बॉल हिटींगसाठी लागणारी पॉवर तिच्यात तयार झाली होती. या पॉवरच्या जोरावर ती सामन्यात गोल करण्यासाठी आपल्या संघातील खेळाडूंना अगदी सुकर पास देण्याचे कौशल्य तिच्या तयार होत गेले. शिवाय सामन्यात अटीतटीच्या क्षणाला एखादी संधी निर्माण ती गोलही नोंदवू लागली. दहावी शिकत असताना तिला चंदीगडमध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळण्याची संधी मिळाली. इथूनच श्वेताचा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय हॉकीपटू होण्याच्या दृष्टीने प्रवास सुऊ झाला. पद्माराजे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्येही शिकत असताना श्वेताने राष्ट्रीय शालेय 19 वर्षाखालील मुलींची हॉकी स्पर्धा खेळली. जमेची बाजू म्हणजे वरील दोन्ही राष्ट्रीय स्पर्धेतील सर्व सामने श्वेता खेळली आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्वामी विवेकानंद महाविद्यालयात प्रवेश घेऊन कॉलेजपातळीवरील मुलींच्या हॉकी स्पर्धा खेळल्या. या स्पर्धांमधून तिला 2012 साली जोधपूर व 2013 साली जयपूरमध्ये झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघातून खेळण्याची संधी मिळाली. यानंतर फेडरेशनच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी झालेल्या 6 राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळण्याची संधी चालून आली. मिळत राहिलेल्या संधींचा फायदा उठवत सामन्यांमध्ये संयम आणि तितकाच आक्रमक खेळ करत तीने आपला राष्ट्रीय हॉकीपटू म्हणून दर्जा उंचावला. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळणे मोठे कठिण असते. ज्या खेळाडूत खरोखरच धमक आहे, तोच संघात स्थान मिळवू शकतो हे उघड सत्य आहे. मात्र श्वेता ही आपल्यातील बॉल हिटींग आणि पासिंगसाठी आवश्यक असलेली धमक दाखवू महाराष्ट्र संघ निवड चाचणी आयोजक निवड समितीचे लक्ष वेधून घेत संघ समितीला आपणास संघात स्थान देण्यास भाग पाडले होते.

श्वेताने जसे हॉकीत राष्ट्रीय खेळाडू म्हणून नाव कमवले तसे क्रिकेट व फुटबॉलमध्ये ही कमवले आहे. हॉकीच्या दैनंदिन सरावाच्या जोरावर तीने विवेकानंद कॉलेजच्या क्रिकेट संघातही ऑलराऊंडर म्हणून स्थान मिळवत शिवाजी विद्यापीठ विभागीय व आंतरविभागीय महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा खेळल्या. स्पर्धेतील सामन्यात तीने चांगली गोलंदाजी व फलंकाजीत केली. त्याची दखल घेऊ तिला सुरत येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ संघात स्थान देण्यात आले. हॉकी, क्रिकेटप्रमाणे तिच्यातील फुटबॉलपटूलाही विवेकानंद महाविद्यालयानेच मोठी संधी दिली. महाविद्यालयाच्या फुटबॉल संघातही तीने स्थान मिळवत सरावाला सुऊवात केली. या संघातून आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत फॉरवर्डला खेळलेल्या श्वेताने आपल्यातील फुटबॉलचेही कौशल्य दाखवून दिले. या कौशल्याची दखल घेऊन तिला शिवाजी विद्यापीठाच्या संघात स्थान देण्यात आले. विद्यापीठाच्या संघातून तीने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉळ स्पर्धेबरोबरच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेतही प्रतिनिधीत्व केले. 2014 पासून तीने पुन्हा हॉकी खेळावर लक्ष केंद्रीत कऊन राष्ट्रीय पंच म्हणून करिअर करण्याचे ठरवले. त्यादृष्टीने तीने तयारीला सुऊवात केली. येथूनच तिच्यातील पंचाने उभारी घेतली. सामना व पंचांचे नियम जाणून घेऊन ती पंचगिरी कशी करायची असते याचा सराव करत गेली. पूर्वी स्थानिक स्पर्धांमध्ये केलेल्या पंचगिरीचा अनूभवही तिच्याकडे होता. पंचगिरी करताना त्यात पारदर्शकता ठेवण्याला तीने प्राधान्य दिले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पंचगिरी करण्यास आपण लायक असावे यासाठी तीने हॉकी इंडियातर्फे घेतली जाणारी लेखी व फिटनेस टेस्ट दिली. यात ती उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिला राष्ट्रीयबरोबरच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही पंचगिरी करण्यासाठीची दारे खुली झाली. आजपर्यंत तीने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, भोपाळ, ग्वाल्हेर (मध्यप्रदेश), राजस्थान, झारखंड, ओडीशा, तामिळनाडू, केरळ, येथे झालेल्या विविध तीसहून अधिक राष्ट्रीय महिला स्पर्धेत पंचगिरी करून आपल्यातील जणू आणखी एक आयाम देशासमोर आणला आहे. भोपाळ (मध्यप्रदेश) भारत व बेलारूस या संघात आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये ही तिली पंचगिरी करण्याचे भाग्य लाभले. याचबरोबर ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बँकॉक, ओमान, मलेशिया येथे झालेल्या जगभरातील मात्तबर संघांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतही तिला पंचगिरी करण्यासाठी हॉकी इंडियाच्या माध्यमातून संधी देण्यात आली होती. श्वेताची ही अफलातून कामगिरी समाजातील मुलींसाठी अनुकरणीय ठरत आहे. सध्या श्वेता आंतरराष्ट्रीय पंच म्हणून आणि अम्पायर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. मात्र तिची ही खेळातील ऑलराऊंडर कामगिरी पाहण्यासाठी मार्गदाता ठरलेले तिचे वडील किशोर पाटील हे दुदैवाने या जगात नाहीत. मात्र आई अश्विनी पाटील आणि आजी सविता पाटील या दोघी श्वेताच्या पाठीमागे एखाद्या पहाडे सारख्या उभ्या राहून तिला आणखी पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहेत. दुसरीकडे हॉकीतील कामगिरीबद्दल समाजात मोठा मानही तिला मिळतो आहे. वडीलांसारखा खंदा मार्गदाता आणि माजी राष्ट्रीय हॉकीपटू विजय साळोखे-सरदार व माजी राष्ट्रीय हॉकीपटू व पंच सागर जाधव,  हे माझ्या पाठीशी खंबीरपणे होते म्हणून मी राष्ट्रीय हॉकी, क्रिकेट व फुटबॉल खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय हॉकी पंच म्हणून नावारूपाला आले याचा मला गर्व वाटतो, असे श्वेताही अभिमानाने सांगते.

संग्राम काटकर, कोल्हापूर

Advertisement
Tags :

.