For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

जिगरबाज...रिषभ पंत !

Advertisement

2022 सालच्या त्या भीषण अपघातानंतर यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या जीवनातील दुसरा डाव सुरू झालाय असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये...त्यावेळी त्याच्या आईला चिंता लागली होती ती तो पुन्हा चालू शकेल की नाही याची...आता पंत नुसता चालू लागलेला नाही, तर पूर्वीप्रमाणं गोलंदाजांवर तुटून पडण्यास अन् सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गुडघ्याच्या दृष्टीनं यष्टिरक्षणाचं कठीण आव्हान देखील पेलण्यास सिद्ध झालाय...

30 डिसेंबर, 2022...भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर जबरदस्त वेगानं उगवणारा तो क्रिकेटपटूच नव्हे, तर अनेक जण हा दिवस जन्मात विसरणार नाहीत...त्या 26 वर्षीय खेळाडूनं आपल्या जीवनाची गाडी अशी भीषण पलटी घेईल याची स्वप्नात देखील कल्पना केलेली नसेल...दिल्लीहून उत्तराखंडमधील रुरकी येथील घरी मर्सिडिज चालवत जात असताना त्याला झोप लागली अन् पहाटे साडेपाच वाजता वेगात असलेली कार भरकटून रुरकीजवळच्या महामार्गावरील दुभाजकाला धडकत तिनं पेट घेतला...त्यावेळी तिथं असलेल्या दोन तरुणांनी अन् एका ट्रकचालकानं धाडस करून त्याला जळत्या वाहनातून बाहेर काढलं नसतं, तर काय बाका प्रसंग ओढवला असता त्याची कल्पनाही करवत नाही...

Advertisement

त्यानंतर तत्परतेनं ‘108 सेवेची’ ऊग्णवाहिका बोलावली गेली. रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्याला त्यानं कशीबशी विनंती केली ती खूप वेदना होत असल्यानं आधी वेदनाशामक इंजेक्शन देण्याची. हलाखीच्या स्थितीतील त्या तरुणाला सदर कर्मचाऱ्यानं नाव विचारलं असता तो म्हणाला, ‘मी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू...रिषभ पंत’...आधी रुरकीतील अन् नंतर डेहराडूनच्या इस्पितळात रात्रभर असह्य वेदनांपायी ओरडत राहिलेल्या पंतच्या त्या किंकाळ्या अजूनही त्याच्या भेटीस गेलेल्यांच्या कानात गुंजतात....

सदर अपघाताच्या व्हिडिओमध्ये जळणारी कार ज्यांनी ज्यांनी पाहिलीय त्यांना रिषभ पंत त्यातून जिवंत बाहेर येऊ शकला यावर सुरुवातीला विश्वासच बसत नाही...काय अवस्था झाली होती त्याची ?...प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, पंतचा उजवा गुडघा 90 अंशाच्या कोनात वळला होता. त्यातच त्याला गाडीतून बाहेर काढण्यापूर्वी पाय सरळ करावा लागला. गुडघा पूर्णपणे बाहेर पडला होता आणि त्याचा एकही ‘लिगामेंट’ वाचला नव्हता. कारबाहेर काढताना सर्वत्र काचेचे तुकडे असल्यामुळं त्वचा फाटून संपूर्ण भागामध्ये ‘सॉफ्ट टिश्यू’च्या दुखापतीची भर पडली होती...दात वगळता तो संपूर्णपणे रक्तानं माखला होता. स्नायू शरीराबाहेर लोंबकळत होते. पाठ अशी सोलून निघाली की, मानेच्या मागून कंबरेपर्यंत हाडं दिसत होती...सुदैवानं पायाच्या उर्वरित भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवहिन्या व संवेदना पुरविणाऱ्या नसा मात्र शाबूत होत्या...त्याला बँडेज गुंडाळायलाच तब्बल पाच तास लागले. या प्रक्रियेरदरम्यान दोनदा भूल द्यावी लागली...

त्या अपघाताला आता 15 महिने झालेत...अन् तोच यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत त्या दुखापतींमधून सावरून यंदाच्या ‘आयपीएल’मधून स्पर्धात्मक क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर पुनरागमन करण्यास, ‘दिल्ली कॅपिटल्स’चं नेतृत्व सांभाळण्यास सज्ज झालाय...ही काही कमी नवलाईची गोष्ट नव्हे. खुद्द पंतला देखील तसंच वाटतंय...‘मी एकाच वेळी उत्साहित नि ‘नर्व्हस’ देखील झालोय. मला ज्या गोष्टींचा सामना करावा लागलाय ते पाहता पुन्हा क्रिकेट खेळता येणं हे चमत्कारापेक्षा कमी नाही’, तो म्हणतो...

ही लढाई पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क वा अँडरसनचा सामना करण्यापेक्षा प्रचंड अवघड होती...कारण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या अनुसार गुडघा निखळणं ही सर्वांत वाईट दुखापतींपैकी एक. जोडीला फ्रॅक्चर झालेलं मनगट व पाऊल. हे कमी म्हणून काय गरज होती ती ‘लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन’ शस्रक्रियेची...4 ऑक्टोबर, 1997 रोजी उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या रिषभच्या परत येण्यात प्रगत वैद्यकशास्त्र, तज्ञांची किमया, ‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमी’तील (एनसीए) फिजिओथेरेपिस्ट्सची मेहनत याबरोबरच त्याच्या स्वत:च्या निर्धाराचा सुद्धा काही कमी वाटा नाही...

मागील काही महिने ‘एनसीए’मध्ये घालवलेल्या रिषभ पंतनं ‘पुनर्वसन’ कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर आता ‘बीसीसीआय’नं त्याला यष्टिरक्षकाची जबाबदारी पेलण्याच्या दृष्टीनं सुद्धा तंदुऊस्त घोषित केलंय...‘एनसीए’चे फिजिओथेरपिस्ट तुलसी युवराज यांनी सांगितल्यानुसार, डॉक्टरांनी त्याला पूर्ण बरं होण्यासाठी दोन वर्षं लागतील असं भाकीत केलं होतं. परंतु रिषभनं जबरदस्त मानसिक ताकद दाखविण्याबरोबर पुनर्वसन योजनेत स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं. ‘त्याचं मानसिक बळ नि आत्मविश्वासामुळं आम्ही त्याच्या ‘रिहॅबिलिटेशन’ मोहिमेत 100 टक्के योगदान देऊ शकलो. एकदा ‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमी’त पाऊल ठेवल्यानंतर त्याच्यासाठी सुरू झाला तो प्रगतीचाच टप्पा’, युवराज सांगतात...

पंतसमवेत काम केलेले दुसरे फिजिओ धनंजय कौशिक यांनीही पुनर्वसन मोहीम सर्व बाबतीत यशस्वी करण्याच्या दृष्टीनं कमालीची शिस्त दाखविल्याबद्दल त्याचं कौतुक केलंय...‘आम्ही ‘रिहॅब’ सुरू केलं त्यावेळची अवस्था आणि त्याची सध्याची स्थिती पाहिल्यास त्यानं खूप मेहनत घेतलीय. मग तो पोषक आहार असो, स्वत:ला सावरणं असो वा झोपेची पद्धत असो, त्यानं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होईल याची काळजी घेतली’, कौशिक म्हणतात... गेल्या दोन महिन्यांत रिषभ पंत आपल्यावरील खेळण्याचा ताण वाढवत गेलाय. शिवाय स्पर्धात्मक क्रिकेटच्या तीव्रतेला सामोरं जाण्याची तयारी करताना ‘एनसीए’नं बेंगळूरमध्ये आयोजित केलेली सराव सामन्यांची मालिका खेळलाय...खरं तर गेल्या महिन्याच्या अखेरीसपर्यंत यष्टिरक्षक नि फलंदाज म्हणून त्याच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्हच होतं !

सावरण्याच्या अवघड मार्गावरील वाटचाल...

  • फेब्रुवारी, 2023 : रिषभ पंतच्या उजव्या गुडघ्याच्या तीन ‘लिगामेंट्स’वर मुंबईच्या कोकिळाबेन इस्पितळात शस्त्रक्रिया...जवळजवळ 45 दिवस अंथऊणाला खिळून राहिल्यानंतर त्यानं गच्चीवर कुबड्या वापरून चालत असल्याचं छायाचित्र ‘सोशल मीडिया’वर पोस्ट केलं...
  • एप्रिल, 2023 : पंतचं प्रथमच सार्वजनिक दर्शन घडलं ते दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर ‘दिल्ली कॅपिटल्स’च्या ‘गुजरात टायटन्स’विऊद्धच्या सामन्यात. उजव्या गुडघ्याला भरपूर पट्ट्या बांधलेल्या स्थ्तीत तो आला होता...
  • मे, 2023 : बेंगळूरच्या ‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमी’तील पुनर्वसन मोहिमेच्या दरम्यान कुबड्यांचा आधार घेतल्याशिवाय आपण चालत असल्याचा व्हिडीओ त्यानं ‘पोस्ट’ केला...एका महिन्यानंतर त्यानं आणखी एक व्हिडीओ टाकला तो पायऱ्यांवरून चालण्याचा...
  • जुलै, 2023 : शरीराच्या वरच्या भागाचं ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’....दोन महिन्यांनंतर त्यानं सुरुवात केली ती ‘जॉगिंग’ करण्यास...
  • ऑगस्ट, 2023 :  लोअर बॉडी फिटनेस ट्रेनिंगला प्रारंभ...
  • फेब्रुवारी, 2024 : ‘एनसीए’त फलंदाजी व यष्टिरक्षणाचा सराव सुरू...या साऱ्या प्रवासादरम्यान तो लहान, पण लक्षणीय टप्पे हळूहळू ओलांडत गेला...उदाहरणार्थ दात घासणं, सहज आंघोळ करणं...‘या गोष्टी छोट्या असल्या, तरी त्यांनी मला आनंद दिला. कारण मला मिळालेलं हे दुसरं आयुष्य आहे. प्रत्येक जण इतका भाग्यवान ठरत नाही’, पंत म्हणतो...

कारकिर्दीतील पराक्रम...

  • कसोटी क्रिकेटमध्ये षटकारानं सुऊवात करणारा पहिला भारतीय फलंदाज...
  • कसोटी क्रिकेटमध्ये 50 फलंदाजांना झेल घेऊन वा यष्टिचित करून बाद करण्याची कामगिरी सर्वांत वेगानं करणारा भारतीय यष्टीरक्षक...
  • एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम देखील रिषभ पंतच्याच नावावर जमा झालाय...
  • टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करण्याच्या बाबतीत दुसरा सर्वांत तऊण भारतीय क्रिकेटपटू...

जबरदस्त डाव...

  • नाबाद 125 (2022, ओल्ड ट्रॅफर्ड) : भारताची स्थिती 4 बाद 72 अशी बिकट झालेली आणि सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी गरज होती ती 260 धावांची...रिषभ पंतनं पुन्हा एकदा भारताला तारताना त्याचं पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं आणि हार्दिक पंड्यासोबत 133 धावांची भागीदारी केली...
  • 146 (2022, एजबॅस्टन) : इंग्लंडविऊद्धच्या पाचव्या कसोटीत पहिल्या दिवशी फलंदाजी 5 बाद 98 अशी कोसळल्यानंतरही भारतानं बाजी पलटविली ती अवघ्या 89 चेंडूंत शतक फटकावणाऱ्या रिषभ पंतच्या जोरावर. पंतनं 111 चेंडूंत 15 चौकार आणि एका षटकारासह 146 धावा केल्या अन् रवींद्र जडेजासमवेत सहाव्या यष्टीसाठी जोडल्या त्या 222 धावा. याभरात तो कसोटी सामन्यात सर्वांत जलद शतक झळकविणारा भारतीय यष्टिरक्षक बनला...
  • 97 (2021, सिडनी) : तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 400 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य भारताला गाठता आलं ते रिषभ पंतमुळं. आघाडीचे तीन फलंदाज 102 धावा होईपर्यंत परतल्यानंतर त्याच्या 118 चेंडूंतील 97 धावांनी भारताला कसोटी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला...
  • नाबाद 89 (ब्रिस्बेन, 2021) : चौथ्या कसोटीत पंतनं 138 चेंडूत नाबाद 89 धावा केल्यानं भारताला 328 धावांचं लक्ष्य गाठणं आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 3 गडी राखून अविस्मरणीय विजय मिळवत आणखी एक मालिका खात्यात जमा करणं शक्य झालं...
  • नाबाद 159 (2019, सिडनी) : ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या चौथ्या कसोटीत दिल्लीच्या या खेळाडूनं चेतेश्वर पुजारासह सहाव्या यष्टीसाठी 89 धावांची भागीदारी करताना आपलं दुसरं कसोटी शतक पूर्ण केलं. भारतानं तो पहिला डाव 7 बाद 622 वर घोषित केला. त्यात पंतचा वाटा नाबाद 159 धावांचा...
  • 114 (ओव्हल, 2018) : इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या कसोटीत 450 हून अधिक धावांच्या पाठलाग करताना 5 बाद 121 अशी पडझड झाल्यानंतर आपली पहिलीच कसोटी मालिका खेळणाऱ्या रिषभनं के. एल. राहुलसोबत डाव सावरताना 146 चेंडूत 114 धावांची झुंझार खेळी केली...

फलंदाजीतील धडाका...

  • प्रकार     सामने     डाव        नाबाद    धावा       सर्वोच्च   सरासरी  शतकं     अर्धशतकं
  • कसोटी   33           56           4             2271      159        43.67     5             11
  • वनडे      30           26           1             865        125        34.6       1             5
  • टी20       66           56           12           967        65           22.43     -             3
  • आयपीएल             98           97           15           2838      128        34.61     1             15

खेळ जुनाच ओळख नवी ! अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स

अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स..तसं पाहिल्यास शेकडो वर्षांपासून विविध स्वरुपांत अन् विविध संस्कृतींमध्ये अस्तित्वात असलेला प्रकार...‘अॅक्रोबॅटिक्स’साठीचे पहिले स्पर्धा नियम तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये तयार करण्यात आले. या प्रकारातील सोव्हिएतमधील पहिली राष्ट्रीय स्पर्धा 1939 मध्ये झाली, तर ‘स्पोर्ट अॅक्रोबॅटिक्स’ या नावानं पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा 1957 साली वॉर्सा इथं आयोजित करण्यात आली...

  • ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स अॅक्रोबॅटिक्सची (आयएफएसए) स्थापना 1973 मध्ये करण्यात आली अन् पहिली जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली ती त्याच्या पुढील वर्षी...1998 मध्ये ‘आयएफएसए’ विसर्जित झाल्यानंतर ‘आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघा’नं हा प्रकार स्वीकारला अन् 2007 पासून तो ओळखला जाऊ लागला ‘अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स’ या नावानं...
  • ‘अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्ट’ हे जोड्यांनी किंवा गटामधून आपले कौशल्य सादर करतात आणि विशिष्ट स्तर किंवा वयोगटाच्या श्रेणीनुसार त्यांच्या स्पर्धा होतात...प्रत्येक जोडीमध्ये जटील हालचाली पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे नि क्षमतेचे जिम्नॅस्ट वापरले जातात. ते एकमेकांना पूरक ठरावेत म्हणून अशा प्रकारे संतुलन साधलं जातं...
  • काही जिम्नॅस्ट प्रामुख्यानं साहाय्यकाची आणि ‘पिचिंग’ची भूमिका पार पाडतात. त्यांना ‘बेस’ म्हणून ओळखलं जातं. संतुलन साधण्यासाठी त्यांच्याबरोबर सामान्यत: लहान जिम्नॅस्टना वापरले जातं, ज्यांना ‘टॉप’ म्हटले जाते...पुऊष आणि महिला गटांमध्ये एक किंवा दोन ‘मिडल्स’ देखील असतात. ते आणखी एका ‘बेस’सारखीच भूमिका बजावतात आणि ‘बेस’ जिम्नॅस्टवर तोल साधताना ‘टॉप’ जिम्नॅस्टला आधार देतात...
  • महिलांची जोडी (दोन महिला), पुऊषांची जोडी (दोन पुऊष), मिश्र जोडी (एक पुऊष ‘बेस’ व एक महिला ‘टॉप’), महिला गट (तीन महिला), पुऊष गट (चार पुऊष) अशा प्रकारे स्पर्धा रंगताना दिसतात...
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर 11 ते 16, 12 ते 18, 13 ते 19 आणि 15 वर्षांवरील (वरिष्ठ) अशा चार वयोगट श्रेणी असतात...1 ते 6 अशा ‘ग्रेड’ देखील असतात. त्यापैकी ‘ग्रेड 5’ ही 11 ते 16 वयोगटासारखी आणि ‘ग्रेड 6’ ही 12 ते 18 वयोगटासारखीच कठीण असते...‘ग्रेड 1-2’मध्ये मिश्र गट देखील असू शकतात. म्हणजे पुरुष नि महिला मिळून 3 किंवा 4 जण...
  • स्पर्धेमध्ये जोडी संगीतावर हालचाली करते, ज्या सहसा त्यांच्यासाठी खास कोरिओग्राफ केलेल्या असतात. जिम्नॅस्ट त्यांच्या अॅक्रोबॅटिक हालचालींची सांगड नृत्याशी घालतात आणि हे सर्व काही वेळेत तसंच संगीताच्या शैलीशी सुसंगत पद्धतीनं केलं जातं...
  • यात स्पर्धक तीन प्रकारचं सादरीकरण करतात-बॅलन्स (तोल), डायनॅमिक (गतिशील) आणि ‘कम्बाईन्ड’ (एकत्रित)...सर्व सादरीकरण ‘आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघा’च्या निकषांचं पालन करणाऱ्या 12×12 मीटरच्या स्प्रंग जिम्नॅस्टिक फ्लोअरवर करणं आवश्यक...‘बॅलन्स’ नि ‘कम्बाईंड’ प्रकारासाठी दिला जाणारा कमाल कालावधी 2 मिनिटे 30 सेकंद इतका, तर ‘डायनॅमिक’साठी 2 मिनिटांचा असतो...
  • कलात्मकता/नृत्य (31.5 पैकी 10 गुण) कौशल्यांची अंमलबजावणी (31.5 पैकी 20 गुण) आणि कौशल्याचा कस (1.5 गुण) यावर परीक्षण केलं जातं...
  • अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिकनं 2018 च्या ब्युनोस आयर्स येथील खेळांतून उन्हाळी युवा ऑलिंपिकमध्ये पाऊल ठेवलेलं असलं, तरी अजून मुख्य ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश झालेला नाही...

-  राजू प्रभू

कुस्तीच्या आखाड्यात दंगल गर्ल वेदांतिकाची सुवर्ण भरारी

फिरोज मुलाणी, /औंध

वेदांतिका आखाड्यात पदक मिळवण्यासाठीच उतरते. अनेक मानाच्या स्पर्धेत तिने पदकाला गवसणी घातली आहे. नुकत्याच झालेल्या ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिने 68 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे. अनेक मैदाने गाजवणाऱ्या वेदांतीकांने राष्ट्रीय पातळीवर देखील चमकदार कामगिरी करून आपला दबदबा निर्माण केला आहे. हजारमाची ता. कराड येथील पवार कुटुंब आणि कुस्ती हे समीकरण आहे. स्वा सैनिक पणजोबा लक्ष्मण पवार यांच्यापासून अलिकडच्या नव्या पिढीपर्यंत कुस्तीचा मोठा वारसा कुटुंबात आहे. नव्या पिढीत हा दैदिप्यमान वारसा पुढे नेहण्याची जबाबदारी वेदांतिकाने खांद्यावर घेतली आहे. आपल्या कर्तबगारीने ती यामध्ये यशस्वी होताना दिसत आहे. वेदांतिका ही पैलवान अतुल पवार यांची कन्या. चुलते सुहास पवार हे देखील पैलवान घरात नेहमीच कुस्तीबद्दल चर्चा होत असल्याने वेदांतिकाला देखील लहानपणापासूनच या मर्दानी खेळाची गोडी लागली. मुलीची कुस्ती खेळाबद्दलची आवड लक्षात आल्यानंतर वडीलांनी देखील तीला पाठींबा दिला. मुरगुड येथे दादासाहेब लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सरावाला तिने सुरुवात केली. कठोर मेहनत करण्याची तयारी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने शालेय कुस्ती स्पर्धेत देखील चमकदार कामगिरी केली. कोरोनाच्या काळातही ती थांबली नाही.

हिंदकेसरी संतोषआबा वेताळ यांच्या सैदापूर येथील कुस्ती सुंकुलात तिने आपला नियमित सराव सुरू ठेवला. सध्या ती आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल श्रीगोंदा येथे सराव करीत आहे. राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत उत्तर भारतातील दिल्ली हरियाणाच्या महिला कुस्तीगीर मल्लांशी लढताना ती कधीच डगमगली नाही. वरीष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिने रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दोन वेळा कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. मिनी ऑलम्पिक कुस्ती स्पर्धेत तिने सोनेरी कामगिरी केली आहे. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग दोन वेळा 68 किलो वजन गटात तिने सुवर्णपदक जिंकले आहे. ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा दुहेरी पराक्रम तिने केला आहे.

खुल्या गटातील महिला महाराष्ट्र केसरी किताब हासील करण्याचा तिचा इरादा आहे. गादीच्या आखाड्यावर दमदार कामगिरी करणारी वेदांतिका यात्रा, जत्रेतील मोठमोठ्या कुस्ती मैदानात देखील तेवढ्याच तडफेने लढते. महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी, राष्ट्रीय मल्ल, सोनाली मंडलिक, संजना बागडी, ऋतिका हुडा, निशा दाहीया (हरीयाना) आदी दिग्गज मल्लांना तिने पराभवाची धूळ चारली आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशीलदादा कदम, हिंदकेसरी संतोषआबा वेताळ, महाराष्ट्र चॅम्पियन धनाजी काका पाटील प्रा. अमोल साठे, रमेश थोरात ,यांचे प्रोत्साहन मिळत असल्याचे वेदांतिकाने आवर्जून सांगितले.

दोनवेळा सांगली महापौर केसरी

राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत पदकाचा रतीब घालणाऱ्या वेदांतीकाने  मोठमोठ्या कुस्ती मैदानात देखील आपल्या दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. राज्यातील अव्वल महिला मल्लाबरोबरच हरियाणा दिल्लीच्या महिला मल्लांना देखील तिने पराभवाचे पाणी पाजले आहे. दोन वेळा सांगली महापौर केसरी किताब जिंकण्याचा पराक्रम तिने केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचायचे आहे.

हनुमंतराव फंड प्रतीक सातव यांच्या मार्गदर्शनाखाली माझा सराव सुरू आहे. शारीरिक कसरती आणि नवनवीन डावपेचांचा सराव प्रशिक्षक करून घेत असतात. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पदके माझ्याकडे असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचे माझी ध्येय आहे. मला माझ्या कुटुंबाची देखील भक्कम साथ आहे.व्यायामात सातत्य ठेवून प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चित आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईन.

- वेदांतिका पवार

Advertisement
Tags :

.