For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Oct 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

दक्षिण आफ्रिकेचं तुफान...डी कॉक !

Advertisement

क्विंटन डी कॉक...प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी धास्ती घ्यावी असा तुफानी फलंदाज अन् ए. बी. डिव्हिलियर्सनंतर (2011) विश्वचषकात सलग दोन शतकांची नोंद करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकी खेळाडू...त्या संघाला आपला ‘चोकर्स’ हा बट्टा पुसून विश्वचषकावर प्रथमच आपलं नाव कोरायचं असेल, तर डी कॉकची बॅट तलवारीसारखी चालणं अत्यंत गरजेचं...

दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाला पुरतं नेस्तनाबूत करणाऱ्या सामन्यातील तो एक क्षण..क्विंटन डी कॉक नुसता हाणामारीच्या मूडमध्ये आला होता. त्यानं वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचा एक चेंडू उचलून षटकार मारण्याच्या इराद्यानं ‘फाइन लेग’ला खेचला, पण चेंडू हवा तसा फटकावता आला नाही अन् सीमारेषेच्या जवळ पकडता येईल अशा पद्धतीनं उडाला. मिशेल मार्श ‘डीप स्क्वेअर-लेग’मधून धावल्यानंतर डी कॉकनं श्वास रोखून धरला. पण मार्श गडबडला आणि चेंडू सीमारेषेवरून जाऊन षटकाराची नोंद झाली...

Advertisement

अशा प्रकारे बाद होता होता बचावलेला दुसरा एखादा फलंदाज असता, तर त्या फटक्यापासून उर्वरित डावात दूर राहण्याची खूणगांठ त्यानं बांधली असती...पण तसं करेल तो डी कॉक कसला ?...हेझलवूडच्या पुढच्या चंडूवर त्यानं नेमका तोच फटका हाणला आणि मार्शनं यावेळी तो पकडण्याचा प्रयत्न देखील केला नाही. कारण तो एक हमखास षटकार होता...दक्षिण आफ्रिकेचा तुफानी यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक म्हणजे नेमकं काय रसायन आहे त्याचा हा दाखला...

दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक फलंदाजी करू शकणाऱ्या यष्टिरक्षकांच्या बाबतीत मोठी परंपरा घालून दिलीय ती मार्क बाऊचरनं. ऑस्ट्रेलियाच्या एडम गिलख्रिस्टच्या धर्तीचा तो खेळाडू. तोच वारसा चालविणारा डी कॉक हा बाऊचरपेक्षा जास्त स्फोटक. त्याचमुळं कधी त्याची बॅट चालेल अन् तो कधी पॅव्हेलियनमध्ये परतेल हे सांगता येणं कठीण असलं, तरी ज्या दिवशी सूर मिळेल त्या दिवशी प्रतिस्पर्ध्यांचा मारा, मग तो कितीही दर्जेदार असो, पुरता फोडण्याचा कार्यक्रम हा ठरलेला...श्रीलंकेच्या नि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी याची प्रचिती फार चांगल्या प्रकारे घेतलीय...

क्विंटन डी कॉक खरा प्रकाशात आला तो दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघातून. ऑस्ट्रेलियात 2012 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला...त्या वर्षाच्या उत्तरार्धात ‘चॅम्पियन्स लीग टी20’मध्ये ‘लायन्स’कडून खेळताना त्यानं चमकदार खेळी करून ‘मुंबई इंडियन्स’वर मात करण्याकामी मोलाचा हातभार लावला. ही कामगिरी त्याला दोन महिन्यांनंतर न्यूझीलंडविऊद्धच्या ‘टी20’ मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची दारं उघडी करून गेली. त्यावेळी आणखी एक तडाखेबंद फलंदाज ए. बी. डिव्हिलियर्सला विश्रांती हवी होती हे त्यामागचं आणखी एक कारण...

तथापि, डी कॉकसाठी आंतरराष्ट्रीय यश लवकर चालून आलं नाही...एका वर्षानंतर जेव्हा त्यानं भारताविऊद्ध सलग तीन एकदिवसीय शतकं फटकावली तेव्हा त्याच्या प्रचंड प्रतिभेची दखल घेण्यास सुऊवात झाली. तरीही एका पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दोन शतकं झळकावून आपली स्थिती मजबूत करेपर्यंत तो उर्वरित वर्षभर संघाच्या आंत-बाहेर होत राहिला...

घोट्याच्या दुखापतीतून वेळीच सावरूनही डी कॉकसाठी 2015 चा विश्वचषक फारसा संस्मरणीय ठरू शकला नाही...त्यावेळी त्यानं कसोटीत पदार्पण करून खरं तर जवळपास दोन वर्षं झाली होती. पण कसोटी संघातील आपली जागा देखील त्याला पक्की बनवता आली नव्हती. ती कसर त्यानं 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग पाच डावांत अर्धशतकाची नोंद करणारा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा खेळाडू ठरून भरून काढली. या मालिकेची होबार्ट इथं त्यानं इतिश्री केली ती विजयी शतकानं...

त्या वर्षी डी कॉकनं केवळ कसोटीच नव्हे, तर मर्यादित षटकांचं क्रिकेटही दणाणून सोडताना घरच्या मैदानावर इंग्लंडविऊद्ध दोन शतकं झळकावली अन् दक्षिण आफ्रिकेचा ‘टी20’ विश्वचषकातील सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज ठरण्याचा मान मिळविला...त्यानं सेंच्युरियनवर आपली सर्वांत संस्मरणीय एकदिवसीय खेळी करत ऑस्ट्रेलियाला आडवं केलं ते याच वर्षाच्या उत्तरार्धात...

क्विंटन डी कॉकची फलंदाजी पुढं बहरत गेली आणि डिव्हिलियर्ससारख्या काही दिग्गजांच्या निवृत्तीमुळे तो संघाचा आणखी महत्त्वाचा भाग बनला. त्याशिवाय त्याच्या धडाकेबाज फलंदाजीनं ‘फ्रँचायझी क्रिकेट’च्या जगतात कमालीची लोकप्रियता मिळविली. 2021 पर्यंत तो ‘आयपीएल’मध्ये चार वेगवेगळ्या संघातर्फे खेळला अन् ‘मुंबई इंडियन्स’च्या दोन विजेतेपदांत त्याचं योगदान राहिलं. 2022 पासून ‘लखनौ’च्या संघातर्फे खेळणाऱ्या आणि जगभरातील विविध लीगमध्ये खेळणाऱ्या संघाशी करारबद्ध होण्यास पसंती दिलेल्या डी कॉकनं डिसेंबर, 2021 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली...आता एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम ठोकण्यास तो सज्ज होण्यामागे एक कारण लपलंय ते याच ‘टी20’ लीगच्या मोहिनीचं अन् ते उघडपणे मान्य करण्यापासून तो कचरतही नाही !

धडाकेबाज शतकं...

  • 178 (2016)... ऑस्ट्रेलियाविऊद्ध डी कॉकनं 113 चेंडूंत धावांची ही बरसात केली. या खेळीत समावेश राहिला तो 16 चौकार नि 11 षटकारांचा...
  • नाबाद 168 (2017)... बांगलादेशविऊद्धच्या मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील या खेळीत त्यानं 21 चौकार आणि दोन षटकार खेचले...
  • 135 (2016)...इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत डी कॉकनं 117 चेंडूंत या धावा काढताना 16 चौकार व चार षटकार फटकावले...
  • नाबाद 138 (2016)...इंग्लंडविऊद्धच्याच या झंझावाती खेळीत त्यानं 96 चेंडूंत 12 चौकार आणि 6 षटकारांचा पाऊस पाडला...
  • 135 (2013)...डी कॉकनं दमदार भारतीय माऱ्याविऊद्ध आपला दर्जा दाखविताना 121 चेंडूंत या धावा काढल्या...
  • 109 (2023)... सध्याच्या विश्वचकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं लागोपाठ दुसऱ्या शतकाची नोंद करताना 106 चेंडूंत लगावले आठ चौकार नि पाच षटकार...
  • 100 (2023)...त्यापूर्वी डी कॉकनं श्रीलंकेला झोडपून काढलं. त्याचं हे स्पर्धेतील पहिलं शतकं नोंदवलं गेलं अवघ्या 84 चेंडूंत अन् त्यात 12 चौकार तसंच तीन षटकारांचा अंतर्भाव राहिला....

विश्वचषकात खुणावणारे विक्रम...

  • डी कॉकनं पहिल्या दोन सामन्यांत दाखविलेला धडाका पुढं कायम ठेवला, तर एका विश्वचषकात सर्वाधिक धावा काढण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम (2003 च्या विश्वचषकात 673 धावा) तो मागं टाकू शकतो...दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं आतापर्यंत तीन डावांत जमविल्याहेत त्या 229 धावा...
  • एका विश्वचषक सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम आहे तो भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर (2019 च्या स्पर्धेत तब्बल पाच शतकं). डी कॉकनं दोन शतकं फटकावली आहेतच...
  • एका विश्वचषकात सर्वाधिक धावा जमविणाऱ्या यष्टिरक्षकाचा मान श्रीलंकेच्या कुमार संगकाराकडे जातो. 2015 साली त्यानं चार शतकांसह 541 धावा काढल्या होत्या. डी कॉकला एकदिवसीय कारकिर्दीवर पडदा टाकण्यापूर्वी हा मान हिरावून घेणं आवडेल...

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ठसा...

  • प्रकार      सामने      डाव          नाबाद      धावा         सर्वाधिक                    सरासरी  शतकं      अर्धशतकं
  • कसोटी   54              91              6                 3000        141            38.82     6                 22
  • वनडे        148           148           7                 6405        178           45.43      19              30
  • टी20         80             79             9                 2277       100            32.53       1                  14
  • आयपीएल                 96              96              6                 2907       140           32.3          2                 20

विश्वचषकानंतर ‘वनडे’ला अलविदा...

  • आधुनिक काळातील क्रिकेटमधील सर्वांत आक्रमक सलामीवीरांपैकी एक असलेला क्विंटन डी कॉक सध्या चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय सामन्यांतून निवृत्त होणार असून विश्वचषकासाठीच्या संघाच्या घोषणेदवेळीच ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिके’नं त्याचा हा निर्णय जाहीर केला होता...
  • डावखुऱ्या डी कॉकनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं ते 2013 मध्ये. तेव्हापासून आतापर्यंत तो 148 सामने खेळलाय...फलंदाजीतील तगड्या कौशल्याच्या व्यतिरिक्त त्यानं यष्टिरक्षणातील आपली क्षमता देखील दाखवलेली असून 194 झेल घेतलेत, तर 17 जणांना यष्टिचित केलंय...
  • या 30 वर्षीय क्रिकेटपटूला 2015 व 2019 च्या विश्वचषकांत मिळून 17 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीनं 450 धावा काढता आल्या होत्या. मात्र यावेळी तीन सामन्यांतूनच त्यानं त्याच्या अर्धी धावसंख्या उभारून दाखविलीय...
  • डी कॉकनं आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्वही सांभाळलं. त्यापैकी चार सामन्यांत संघानं विजय मिळवला, तर तीन लढतींत पराभवाचा सामना करावा लागला...

दक्षिण आफ्रिकेचे सर्वाधिक शतकं झळकविणारे सलामीवीर...

  • हशिम आमला : 27
  • क्विंटन डी कॉक : 19
  • हर्शल गिब्स : 18
  • गॅरी कर्स्टन : 13
  • ग्रॅमी स्मिथ : 10

खेळ जुनाच ओळख नवी... : ‘जुजुत्सू’

‘जुजुत्सू’ वा ‘जू-जित्सू’, ज्याचे नाव सामान्यत: ‘जिउ-जित्सू’ असेही लिहिले जाते, हा जपानमध्ये विकसित केलेला ‘मार्शल आर्ट’चा एक भाग...मुळात हा एखाद्याने शस्त्रs न वापरता सशस्त्र प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याचा प्रकार. ‘जु’ म्हणजे सौम्य, मऊ, लवचिक, तर ‘जुत्सू’ म्हणजे कला किंवा तंत्र...त्याचे मूळ पार 16 व्या शतकापर्यंत जाते. हा खेळ शक्तीवर नव्हे, तर कौशल्य आणि चातुर्य यावर अवलंबून असतो...

  • ‘जुजुत्सू’चे अनेक प्रकार आहेत ज्यात एक खेळ म्हणून स्पर्धा घेतली जातेय. त्यापैकी एक म्हणजे ‘जेजेआयएफ रुल्स स्पोर्ट जू-जित्सू’. त्याचे आयोजन ‘जु-जित्सू आंतरराष्ट्रीय महासंघा’द्वारे केले जाते आणि जागतिक स्पर्धांचा देखील तो एक भाग आहे.
  • खेळ म्हणून ‘जुजुत्सू’चे तीन प्रकार आहेत. त्यापैकी ‘डुओ’ किंवा स्वसंरक्षण प्रात्यक्षिकात आक्रमणकर्ता आणि बचावकर्ता हे दोघेही एकाच संघाचे असतात आणि ते स्वसंरक्षणाचे तंत्र प्रदर्शित करतात...
  • फायटिंग सिस्टम’ किंवा ‘फ्रीफाइटिंग’मध्ये स्पर्धक नियमांनुसार आक्रमण करतात, एकमेकांना पकडतात आणि एकमेकांना नमविण्याचा प्रयत्न करतात...
  • जपानी अथवा ‘ने वाझा’ (ग्रॅपलिंग) पद्धतीमध्ये स्पर्धक उभे राहून एकेमकांना नमविण्याचा प्रयत्न करतात. यात आघात करण्याची परवानगी नसते...
  • जकार्ता, इंडोनेशिया इथं 2018 मध्ये झालेल्या स्पर्धेतून या क्रीडाप्रकारानं आशियाई खेळांमध्ये पदार्पण केलं. त्या वेळी पुऊषांच्या स्पर्धेत सहा वजनी गटांचा समावेश होता, तर महिलांच्या स्पर्धेत 48-49 किलो आणि 62-63 किलो असे फक्त दोन वजनी गट होते. यंदा हांगझाऊ, चीन इथं झालेल्या आशियाई खेळांत पुऊष आणि महिलांच्या स्पर्धा प्रत्येकी चार वजनी गटांमध्ये आयोजित करण्यात आल्या...
  • यंदाच्या आशियाई खेळांतून भारताने ‘जुजुत्सू’मध्येही पाऊल ठेवले. मात्र, भारतीय खेळाडूंपैकी एकालाही पदक मिळविता आले नाही. भारतीय संघात आठ पुऊष आणि आठ महिलांना चार वजनी गटांकरिता निवडण्यात आले होते...

- राजू प्रभू

ऊसाला जेव्हा भाले फुटतात...!

‘जेव्हलिन क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणऱ्या मेरठच्या अन्नू राणीच्या संघर्षाची कहाणी अगदी चित्रपटापेक्षा कमी नाही. गावातल्या पायवाटेवर खेळणारी आणि ऊसापासून भाले बनवून सराव करणारी अन्नू एक दिवस वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल खेळ आणि एशियन गेम्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल, असे क्वचितच कोणालाही वाटले नसेल. पण, उत्तर प्रदेशच्या अन्नूने भालाफेक क्रीडा प्रकारात हे करुन दाखवले आहे. चीनमधील हांगझाऊ येथे अलीकडेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नू राणीने सुवर्णपदक जिंकून भारतासाठी इतिहास रचला आहे. तिने 62.92 मीटर भालाफेक करत ऐतिहासिक असे सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकता आले आहे. 1951 मध्ये आशियाई स्पर्धेत महिलांच्या भालाफेक क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला. यानंतर 72 वर्षाच्या इतिहासात भारतीय महिला भालाफेकपटूला जे मिळवता आलं नाही असे यश तिने मिळवले आहे.

 संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर यश

28 ऑगस्ट 1992 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जवळच्या बहादुरपूर या गावात  जन्माला आलेली अन्नू राणी ही तिच्या तीन बहिणी आणि दोन भावांमध्ये सर्वात लहान आहे. अन्नूचे वडील हे शेतकरी असून तिचा तिचा मोठा भाऊ उपेंद्र कुमार हा देखील अॅथलिट आहे. विद्यापीठ स्तरावर 1000, 4000 व 5000 मी शर्यतीत त्याने यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, आपल्या मोठ्या भावापासून प्रेरणा घेत भालाफेक क्रीडा प्रकारात उतरलेल्या अन्नूचा संघर्ष हा निश्चितच कौतुकास्पद असा आहे. पहाटे चार वाजता अन्नू गावातील रस्त्यांवर धावायला जायची. शेतकरी असणारे अन्नूचे वडील अमरदीप सिंग यांना तिचा भालाफेकमध्ये असणारा रस सुरुवातीला पसंत नव्हता. तरीदेखील त्यांना चुकवून ती सराव करत असे. भाऊ उपेंद्र तिला ऊसापासून भाला बनवून देई व पुढे शेतात ती तासनतास सराव करत असे.

भालाफेकमध्ये असणारी तिची आवड व रस पाहता तिच्या भावाने मेरठजवळ असणाऱ्या गुरुकुल प्रभात आश्रमामध्ये तिला दाखल केले. आठवड्यातून तीन दिवस ती या आश्रमाच्या मैदानावर सराव करत असे. अगदी सुरुवातीच्या काळात स्पर्धेसाठी जाताना तिच्याकडे पैसेही नसायचे पण हार न मानता कमालीच्या जिद्दीच्या जोरावर तिने यशाला गवसणी घातली. 2014 मध्ये राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय विक्रमासह तिने 58.83 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुढे 2014 मध्ये झालेल्या इंचेऑन आशियाई गेम्समध्ये तिने कांस्यपदक पटकावले. यानंतर 2021 मध्ये पतियाळा येथे झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 63.24 मी भाला फेकला. ही तिची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. यानंतर अन्नूने मागे वळून पाहिले नाही. यंदाच्या एशियन गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना अन्नू राणीने महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. 72 वर्षांच्या स्पर्धा इतिहासात भालाफेकीत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

प्रशिक्षक बलजीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ती पतियाळा येथील राष्ट्रीय अकादमीत सराव करते. सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय अकादमीत तिला काशीनाथ नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नूच्या खेळात अमुलाग्र असा बदल झाला. दरम्यान, पुढील वर्षी पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा होत असून या दृष्टीने तिचा सराव सुरु आहे.

उत्तर प्रदेश सरकारकडून गौरव

दरम्यान, आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने आपल्या सुवर्णविजेत्या खेळाडूंना डीएसपी पदावरील नोकरी व तीन कोटी रुपयांची घोषणा केली आहे. आपल्या सुरुवातीच्या कठीण आणि संघर्षमय दिवसांची आठवण करुन देताना अन्नू म्हणते की, आजपर्यंतच्या प्रवासात खूप टीकेला सामोरे जावे लागले. मोठा संघर्ष करावा लागला. गावातील लोक विचारत की खेळात करिअर करुन तुला काय फायदा होईल. आज या सर्व टीकाकारांना उत्तर मिळाले असल्याचे ती सांगते.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण हेच लक्ष्य

पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य जिंकल्यानंतर यंदाच्या आशियाई स्पर्धेत अन्नूने सुवर्ण जिंकण्याची किमया केली आहे. आता, पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवत या स्पर्धेत सुवर्ण मिळवणे हेच आपले लक्ष्य असल्याचे ती सांगते. ऊसापासून भालाफेकीचा सराव करत नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्नूने आपला ठसा उमटवताना अॅथलेटिक्स क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

भालाफेकमधील अन्नूचा प्रवास

  • 2016 - दक्षिण आशियाई स्पर्धेत कांस्य
  • 2019 - दोहा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य
  • 2022 - बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य
  • 2023 - हाँगझाऊ एशियन गेम्समध्ये सुवर्ण
  • 2020 - टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली महिला भालाफेकपटू.

विनायक भोसले, कोल्हापूर.

Advertisement
Tags :

.