द. म.शि.मंडळाचा क्रीडा महोत्सव
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ व ज्योति स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त आश्रयाखाली आणि सह्याद्री आंतरराज्य बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था यांच्या सौजन्याने खेलोत्सव क्रीडा स्पर्धां मोठ्या उत्साहात पार पडल्या. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील हे होते. मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संचालक बाळाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व शाळांच्या क्रीडापटुनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळीच्या मुलींनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.डी. पाटील यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश पटवून देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. तर प्राचार्य आर .के .पाटील व संचालक श्री. पी. पी. बेळगावकर यांनी क्रीडा ज्योतीचा स्वीकार केला. सह्याद्री सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष एन.बी. खांडेकर यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व कबुतरे उडवून या स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले. शारीरिक शिक्षक जे .वाय .पाटील यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. प्राचार्य अनंतराव पाटील आणि सह्याद्री पतसंस्थेचे संचालक किरण पाटील यांच्या हस्ते स्पर्धांच्या फाईलचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वत्ते संचालक पी .पी. बेळगावकर यांनी खेळाडूंना खेळांचे महत्त्व सांगून खेळ हा खेळाडू वृत्तीने खेळला पाहिजे असे प्रतिपादन केले. इतर मान्यवरांची सुद्धा खेळाडूंना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात राजाभाऊ पाटील यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यानंतर क्रीडा स्पर्धांची सुऊवात झाली.या क्रीडा स्पर्धेमध्ये संस्थेच्या 35 शाळातून 1200 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी झालेल्या सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आनंदगड विद्यालय नंदगड शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला, सरस्वती हायस्कूल हंदीगणूर शाळेने द्वितीय क्रमांक तर गुऊवर्य शामराव देसाई हायस्कूल ईदलहोंड शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये शिवराज हायस्कूल, बेनकनहळ्ळी शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला संभाजी हायस्कूल, बैलूर शाळेने द्वितीय क्रमांक तर आनंदगड विद्यालय, नंदगड शाळेने तृतीय क्रमांक मिळविला. 4×100 मी. रीले मध्ये मुलांच्या विभागात शिवराज हायस्कूल, बेनकनहळ्ळीने प्रथम क्रमांक पटकाविला. कुद्रेमनी हायस्कूल कुद्रेमनी शाळेने द्वितीय क्रमांक तर मराठी विद्यानिकेतन शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींचे विभागात मराठी विद्यानिकेतन शाळेने प्रथम क्रमांक, रणकुंडी हायस्कूल शाळेने द्वितीय क्रमांक तर मलप्रभा हायस्कूल चापगाव शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये विविध हायस्कूलच्या खेळाडूंनी यश संपादन करून पदकांची लयलूट केली. या सर्व विजयी खेळाडूंना संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, संचालक बाळाराम पाटीला, माजी सचिव सुभाष ओऊळकर व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व शारीरिक शिक्षक आणि शिपाई यानी विशेष परिश्रम घेतले.