शानभाग, भंडारी शाळांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
बेळगाव : एसकेई सोसायटी संचलित व्ही. एम. शानभाग मराठी शाळा आणि एम. आर. भंडारी कन्नड शाळा यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ठळकवाडी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक विवेक पाटील तर अध्यक्षस्थानी सोसायटीच्या स्पोर्ट्स अॅकॅडमीचे चेअरमन आनंद सराफ होते. मान्यवरांच्याहस्ते क्रीडा ध्वजारोहण झाले. विद्यार्थ्यांनी पथसंचलनाद्वारे पाहुण्यांना मानवंदना दिली. विवेक पाटील यांचा परिचय टी. सी. पाटील यांनी तर आनंद सराफ यांचा परिचय उषा शानभाग यांनी करुन दिला. संगीता देशपांडे व उषा शानभाग यांच्या हस्ते पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापकांचे स्वागत विद्यार्थिनी संस्कृती निकमने पुष्प देवून केले. एम. व्ही. शानभाग शाळेचा विद्यार्थी सोहम बसुर्तेकर व एम. आर. भंडारी शाळेचा विद्यार्थी प्रवीण जुट्टपण्णावर यांनी क्रीडाज्योत पाहुण्याहंकडे सुपूर्द केली.
अंजली जाधवने खेळाडूंना शपथ देवविली. आनंद सराफ यांनी विद्यार्थी जीवनात अभ्यासाबरोबर खेळही अत्यंत महत्वाचे आहे. निरोगी व सुदृढ शरीराचे महत्त्व पटवून देत निरोगी व्यक्ती देश विकासात मोलाची भर घालत देशाला सर्वोच्च स्थानी पोहचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दैनंदिन अभ्यासाबरोबर चांगल्या सवयी आत्मसात केल्यास यश निश्चित मिळते, असे सांगितले. सूत्रसंचालन सुदीप चौगुले यांनी केले. आभार जे. के. कदम यांनी मानले. यावेळी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक पिराजी खनगावकर, सदाशिव वैजनाथपठ, मुख्याध्यापिका गायत्री शिंदे, सावित्री नायक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षक रामनिंग परीट व प्रविण पाटील यांचे सहकार्य लाभले.