वंदे भारतला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
111 प्रवाशांनी केला बेळगाव-पुणे वेगवान प्रवास : मात्र हुबळीतून 11 तर धारवाड येथून 26 प्रवाशांचे बुकिंग
बेळगाव : हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसची पहिली फेरी बुधवारी झाली. बेळगावच्या प्रवाशांनी पहिल्याच फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बेळगावमधून 111 प्रवाशांनी वंदे भारतचे बुकिंग करत प्रवास केला. यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त करत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तरच पुढील काळात एक्स्प्रेस नियमित होण्याची आशा व्यक्त केली. मागील आठवड्यात चाचणी झाल्यानंतर सोमवार दि. 16 रोजी पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. एरव्ही साडेआठ ते नऊ तास लागणाऱ्या प्रवासाला आता वंदे भारतमुळे अवघ्या साडेसहा तासांमध्ये पोहोचता येणार आहे. हुबळीवरून आठवड्यातून तीन दिवस तर पुणे येथून आठवड्यातून तीन दिवस वंदे भारत सेवा दिली जाणार आहे. उद्घाटन सोमवारी झाले असले तरी प्रवाशांना प्रवासासाठी ही एक्स्प्रेस बुधवारपासून दाखल झाली.
नियोजित वेळेनुसार प्रवास
हुबळी-पुणे हे अंतर वंदे भारत वेळेत पूर्ण करते की नाही? असा प्रश्न प्रवाशांच्या मनात होता. पहाटे 5 वाजता हुबळी येथून निघालेली वंदे भारत 10 मिनिटे उशिराने म्हणजे 7 वाजून 15 मिनिटांनी बेळगावमध्ये आली. पुढील प्रवासात मात्र एक्स्प्रेसने वेग घेतल्याने पुणे येथे दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली. दिलेल्या वेळेनुसार अवघ्या साडेसहा तासात प्रवाशांना पुण्यापर्यंतचा प्रवास करता आला.
हुबळी-धारवाडपेक्षा बेळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद
प्रवाशांच्या मागणीनुसारच पुणे-बेळगाव अशी वंदे भारत सुरू होणार होती. परंतु अंतर कमी असल्याने ही एक्स्प्रेस हुबळीपर्यंत वाढविण्यात आली. तसे पाहता हुबळी-धारवाड ही मोठी शहरे असल्याने वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळणे आवश्यक होते. परंतु बुधवारी हुबळी येथून 11 तर धारवाड येथून 26 प्रवाशांनी बुकिंग केल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापेक्षा तीनपट अधिक प्रवासी बेळगावमधून पुण्याच्या दिशेने गेले. यामुळे बेंगळूर-धारवाड वंदे भारत बेळगावपर्यंत आल्यास या एक्स्प्रेसलाही उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.