दुसऱ्या दिवशीही दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
सर्वत्र चैतन्यमय वातावरण : जल्लोषात स्वागत, तरूणाईमध्ये उत्साह : मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांची उपस्थिती
बेळगाव : तरुणांमध्ये देशप्रेम जागविण्यासाठी दुर्गामाता दौडला दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी धारकरी-शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेवाचा जयघोष’ करीत हजारो तरुण-तरुणी व बालक सहभागी झाले. दुसऱ्या दिवशीच्या दौडला मिलिटरी महादेव मंदिर जवळील शिवतीर्थापासून प्रारंभ झाला. मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार मेजर प्रतापराव पाटील व पंडित एस. के. पाठक यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. आरती करून दौडला चालना देण्यात आली. यावेळी विशेष करून मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान उपस्थित होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्रोत्सवात दररोज पहाटे निघणाऱ्या श्री दुर्गामाता दौडमुळे शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. शिवतीर्थांपासून सुरू झालेली दौड पुढे काँग्रेस रोड, शिवतीर्थपासून प्रारंभ होऊन काँग्रेस रोड, ग्लोब थिएटर रोड, इंडिपेंडेंट रोड, हायस्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, हाय स्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट, तेलगू कॉलनी, के. टी. पुजारी दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक मार्गे जत्तीमठ येथील श्री दुर्गामाता मंदिरामध्ये सांगता करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी कॅम्प परिसरात काढलेल्या दौडचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. शिवरायांच्या अखंड गजराने परिसर दुमदुमून गेला होता. दौड मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून ध्वजाचे पूजन केले. यावेळी भगवे फेटे, भगव्या पताका, भगवे झेंडे यामुळे वातावरणही भगवेमय झाले होते. तसेच पांढऱ्या टोप्या, पांढरे वस्त्र, आणि धारकऱ्यांच्या उत्साहामुळे दौडमध्ये चैतन्य निर्माण होत आहे. जत्तीमठ येथील श्री दुर्गामाता मंदिरात शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख आनंद चौगुले यांच्या हस्ते ध्वज उतरवून दुसऱ्या दिवशीच्या दौडची सांगता झाली. यावेळी हिरामणी मुचंडीकर यांनी मनोगत व्यक्त करताना, रायगड येथील सुवर्ण सिंहासनासाठी निधी संकलनाचे आवाहन केले.
तरुणींचा प्रतिसाद
दौडमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणींचा सहभाग वाढू लागला आहे. पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी होणाऱ्या तरुणींचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. यासह बालक व वयोवृद्धांची दौडमध्ये सहभागी होण्याची जिद्द दिसून येत आहे.
मुस्लीम बांधवांकडून दौडचे स्वागत
कॅम्प येथील मुस्लीम बांधवांकडून सामाजिक सलोखा राखत मार्गस्थ झालेल्या दौडचे स्वागत केले. साजिद शेख व मुस्लीम बांधवांनी हार घालून भगव्या ध्वजाचे स्वागत केले. तसेच पारंपारिक सामाजिक सलोखा जपत डॉ. राहिला शेख यांनी देखील पूजन केले. यावेळी इब्राहिम शेख, अराफत शेख, महादेव मिरजकर, प्रकाश माळवे, शाहिद सनदी उपस्थित होते.
उद्याचा दौडचा मार्ग
नाथ पै सर्कल येथील अंबाबाई मंदिरापासून प्रारंभ होणार आहे. लक्ष्मी रोड, कारवार गल्ली, लक्ष्मी रोड, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरीनगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवाण्णा गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमाळ बोळ, खडेबाजार, महात्मा फुले रोड, मीरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, एम. एफ. रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवाण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथे सांगता होणार आहे.