लोकमान्य सोसायटीच्या सांगेलीतील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी -
सर्व इच्छित गोष्टी मिळवण्याचे साधन आपले शरीर आहे. हेच शरीर जर निरोगी असेल तर तुम्ही जगातील सर्व इच्छित गोष्टी मिळवू शकता. आणि शरीर जर आजाराने त्रस्त असेल तर तुमच्याकडे सर्व काही असून नसल्यासारखेच आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेऊन निरोगी आयुष्याकडे वाटचाल केली पाहिजे . लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आरोग्य शिबिर आयोजित करून खूप चांगला उपक्रम राबविला आहे असे प्रतिपादन भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडीचे उपप्राचार्य डॉ.ललितकुमार विटलानी यांनी येथे केले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी यांच्या सहकार्याने सांगेली ग्रामपंचायतीच्या आवारात बुधवार 18 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य शिबिराचे उद्घाटन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. एन पांडव तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. एन .पांडव, व्यासपीठावर , भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ललितकुमार विटलानी, सांगेलीचे सरपंच लऊ भिंगारे, ग्रामपंचायत सदस्य सागर सांगेलकर, श्रीम.शितल राऊळ, मुख्याध्यापक श्री चिले आदी उपस्थित होते. या शिबिरात जनरल फिजिशियन डॉ. ललितकुमार विटलानी, हृदयरोग तज्ञ डॉ.नंददीप चोडणकर, डोळे, नाक, कान ,घसा तज्ञ डॉ. विशाल पाटील, बालरोग तज्ञ डॉ. रवी गोळघाटे, डॉ. माऊली हापरे, डॉक्टर मोहसीन मुजावर, डॉ. ज्ञानेश्वर भवर, डॉ. हर्षल जगनाडे, यांनी शिबिरात रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात जवळपास 150 नागरिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्स, सांगेलीच्या आशास्वयंसेविका , यांचे लोकमान्य सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी एन पांडव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही संस्था स्थापन झाल्यापासून विविध उपक्रम आणि आरोग्य शिबिर राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहे. 30 ऑगस्ट 1995 रोजी या सोसायटीची स्थापना झाली असून यंदा 30 वर्षे पूर्ण होत आहेत. 213 शाखा आणि दहा हजार कोटींच्या दिशेने वाटचाल करणारी ही संस्था सावंतवाडी शहरात गेली 17 वर्षे सेवा देत आहे. याचाच एक भाग म्हणून सांगेली येथे आरोग्य शिबिर आयोजित करून ग्रामीण भागात आरोग्याचा दिप लोकमान्य सोसायटीने तेवत ठेवला आहे. आरोग्य शिबिराला लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडी शाखेचे सीनियर मॅनेजर महेश तानावडे, मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर, ब्रांच मॅनेजर अरविंद परब, सीएसआर प्रतिनिधी गौरी जुवेकर, सांगेलीचे आरोग्यसेवक मंगेश परब, आशा स्वयंसेविका अश्विनी वंजारी, प्रियंका राऊळ, संजना डोईफोडे, भाईसाहेब आयुर्वेद महाविद्यालयाचे लिपिक राजू सावंत,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन मयूर पिंगुळकर यांनी केले तसेच आभार मानले.