माजी सैनिकांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
विविध रेजिमेंटच्या 800 माजी सैनिकांचा सहभाग
बेळगाव : माजी सैनिकांच्या निवृत्तीनंतरच्या विविध समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री (एमएलआयआरसी) च्यावतीने रविवार दि. 15 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित केलेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात दक्षिण भारतातील विविध रेजिमेंटच्या आठशेहून अधिक माजी सैनिकांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उपस्थित माजी सैनिकांना मेळाव्यासंबंधी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर वीरमाता, वीरपत्नी आणि सेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
जायबंदी झालेल्या जवानांना वाहनांचे यावेळी वितरण करण्यात आले. लष्करात अनेक वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला दक्षिण भारतातील विविध रेजिमेंटमधून सेवानिवृत्त झालेल्या आठशेहून अधिक सैनिकांनी भाग घेतला. निवृत्तीनंतरच्या विविध समस्या एकाच छताखाली सोडविण्यासाठी विविध रेजिमेंटचे मदतकक्ष स्थापन करण्यात आले होते. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या महसूल आणि पोलीस खात्याच्यावतीनेही मदतकक्ष सुरू करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रामुख्याने माजी सैनिकांनी पेन्शनसंदर्भात आपल्या तक्रारी मांडल्या. तसेच आलेल्या इतर तक्रारींची नोंद करून घेत त्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होती.
माजी सैनिकांची देशभरातून उपस्थिती
सेवानिवृत्त माजी सैनिकांच्या विविध समस्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी या माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी लष्करासह जिल्हा प्रशासनाच्या महसूल व पोलीस खात्यालाही बोलावण्यात आले आहे. त्यांच्यासंबंधी काही प्रश्न असतील तर सोडविण्यास मदत होईल. मेळाव्याला दक्षिण भारतासह बेळगावशी ज्यांचा संबंध आहे, ते माजी सैनिक देशभरातून या ठिकाणी आले आहेत.
- जॉयदीप मुखर्जी, ब्रिगेडियर