राकसकोप येथे दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर/किणये
राकसकोप गावात गुरुवारी दुर्गामाता दौड काढण्यात आली. परिसरातील तरुणाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पांढरा कुर्ता, डोक्यावर गांधी टोपी तसेच भगवे फेटे तरुणांनी परिधान केले होते. गावात ठिकठिकाणी भगवे ध्वज व पताका लावण्यात आल्या होत्या. यामुळे वातावरण भगवेमय बनले होते. राकसकोप येथील दुर्गामाता उत्सव मंडळ येथून दौडला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी दुर्गामाता मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दुर्गामाता उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे शस्त्रपूजन केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष कार्यकर्त्यांनी केला. दौडच्या निमित्ताने आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. कंग्राळी गल्ली मार्गे मेन रोड, पाटील गल्ली, पंचराशी गल्ली, विठ्ठल गल्ली, नागराज गल्ली, चव्हाट गल्ली या ठिकाणी दौड झाली. शिवाजी महाराज चौकात दौडची सांगता झाली. सांगता प्रसंगी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन पंच कमिटीचे अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष भावकू मासेकर आदींच्या हस्ते केले. दौडमध्ये बेळगुंदी, राकसकोप, बोकमूर, सोनोली, यळेबैल, बिजगर्णी व कावळेवाडी येथील तरुण व तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.