बस चालक-मालक व कर्मचारी आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आचरा प्रतिनिधी
गणेश चतुर्थी हा आपला गावचा मोठा सण, या सणाला मुंबईकर, यजमानी आपल्या गावच्या घरी येतात. आपण गावकरीसुद्धा, बाप्पा प्रमाणेच आपल्या मुंबईकर यजमानी पाहुण्यांचीसुद्धा आतुरतेने वाट पाहत असतो. या पाहुण्यांच्या प्रवासाची वाहुतुकीची सोय आणि सेवा आपले तीन आसनी, सहा आसनी रिक्षा चालक तसेच खासगी बस चालक अगदी कसोशीने करत असतात. या 15 दिवसात तहान भूक विसरून आपला घरचा सण विसरून ते या सणाचा आनंद घेण्याकरता इतरांसाठी सारथ्य करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी समजून आचरा येथील डॉ. स्वरा भोगटे, स्वप्निल भोगटे, डॉ. सिद्धेश सकपाळ यांनी तीन आसनी, सहा आसनी रिक्षा चालक आणि खासगी बस सेवा चालक व कर्मचारी बांधवासाठी मोफत मधुमेह तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते याला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यात 52 तीन आसनी, सहा आसनी रिक्षा चालक आणि खासगी बस सेवा चालक व कर्मचारी बांधवानी याचा लाभ घेतला.
यावेळी शिबिराच्या उद्घाटनाला आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, माजी सरपंच मा. मंगेश टेमकर, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मा डॉ. कपिल मेस्त्री, तीन आसनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा सचिन परब, जिल्हा सहा आसनी संघटनेचे खजिनदार मा. विजय सावंत, तीन आसनी व सहा आसनी कार्यकारिणीचे सभासद , आमचे फार्मासिस्ट मित्र श्री मांगिरीश सांबारी व श्री. विदयानंद परब आदी उपस्थित होते.