For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ॲग्रीस्टॅक होत नसल्याने आचरा ग्रामसभेत महसूल अधिकारी धारेवर

12:25 PM Sep 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
ॲग्रीस्टॅक होत नसल्याने आचरा ग्रामसभेत महसूल अधिकारी धारेवर
Advertisement

पंचायत राज अभियान विशेष आचरा ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उपस्थिती चारशेपार

Advertisement

आचरा | प्रतिनिधी

आचरा गावात शेजमिनी या बहुतांशी कुळ वहिवाटीच्या असल्याने शेतकरी असलेल्या ग्रामस्थांचे ॲग्रीस्टॅक होत नसल्याने फार्मर आयडी मिळण्यापासून वंचित राहत असल्याच्या मुद्यावर आचरा ग्रामसभेत तीव्र नाराजी व्यक्त करत अँग्री स्टॅकची माहिती देण्यासाठी आलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ग्राम महसूल अधिकारी श्रीम. शिरसाट यांनी तातडीने याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवावा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यावेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी याबाबत ग्रामपंचायत ठरावाद्वारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधून वंचित ग्रामस्थांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबतआचरा ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना सरपंच फर्नांडिस यांनी पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडी, चंदू कदम यांसह इतर ग्रामपंचायत सदस्य ग्राममहसूल अधिकारी, प्राथमिक आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी यांसह बचतगट प्रतिनिधी, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.सुरुवातीला ग्रामपंचायत सभागृहात होणारी सभा चारशेच्या वर उपस्थिती गेल्याने ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ग्रामपंचायत लगतच्या हाॅटेलच्या मोकळ्या जागेत घेण्यात आली. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.सभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी कासले यांनी सभेपुढील विषय स्पष्ट केले. यात ॲग्रीस्टॅक बाबत ग्राम महसूल अधिकारी मौसमी शिरसाट या माहिती देत असताना ग्रामस्थांनी आचरा गावातील जमिनी कुळ वहिवाटीच्या असल्याने बहुतांशी असलेल्या कुळांचे अग्रीस्टॅक होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून ग्राम महसूल अधिकारी श्रीम. शिरसाट यांना स्पष्टीकरण देण्याची मागणी केली . मात्र उपस्थित ग्राम महसूल अधिकारी योग्य माहिती सभेला देऊ शकल्या नसल्याने ग्रामस्थांनी अधिका-यांना पाचारण करण्याची मागणी उपस्थितांमधून लावून धरण्यात आली.
आचरे गावात खुद्द भोगवटा तसेच ज्यांच्या नावावर घरभाटाची ठराविक गुंठे जागा आहे त्याच जमीनधारकांचे ॲग्री स्टॅक होत आहे. बाकी उर्वरित जागेची तसेच ई -पीक नोंदणीही कसवटदार शेतकऱ्यांच्या नावे होत नसल्याने शेती विमा, ई - पीक,ॲग्री स्टॅक या गोष्टींपासून आचरेगावचे कसवटदार शेतकरी कुळे वंचित राहणार असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित करुन ग्राममहसूल अधिकारी श्रीमती शिरसाट यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले मात्र त्यांच्याकडून समर्पक उत्तर मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामसभेत हा विषय अजेंड्यावर होता तर. याबाबत येथील समस्यांबाबत जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन का मागविले नव्हते. येथील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कोण भरून देणार असे प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी ग्राममहसूल अधिका-यांना धारेवर धरले. याबाबत योग्य ती माहिती देण्यासाठी सक्षम अधिका-यांना बोलविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा बघत शेवटी सरपंच फर्नांडिस यांनी ग्राममहसूल अधिकारी शिरसाट यांना वरिष्ठांना योग्य तो अहवाल पाठवून याबाबतचा निर्णय तातडीने ग्रामपंचायत ला कळविण्याच्या सुचना केली. तसेच सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी याबाबत ग्रामपंचायत ठरावाद्वारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधून वंचित ग्रामस्थांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.