For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

06:33 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

कृषी अवजारे, खते, बी-बियाणे, वाहनांची सविस्तर माहिती : प्रदर्शनाची उद्या सांगता

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल आयोजित ‘बेळगाव कृषी उत्सव-2024’ प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बेळगावमध्ये प्रथमच भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात आले असून यामध्ये कृषी अवजारे, सोलार पंप, शेतीसाठीची वाहने, खते, बी-बियाणे, रोपे यांचा समावेश असल्याने बेळगाव जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत आहेत.

Advertisement

बेळगावच्या क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सोमवार दि. 11 मार्चपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत शेतकऱ्यांना प्रदर्शनाला भेट देता येईल. प्रदर्शनामध्ये एकूण 200 स्टॉल मांडण्यात आले आहेत. यापैकी 120 स्टॉल शेती अवजारे, मशिनरी, सिंचन यांची माहिती देणारे आहेत. 20 स्टॉल हे ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित आहेत. दुचाकी, चारचाकी इलेक्ट्रिक वाहने, कृषी वाहने यांचा यामध्ये सहभाग आहे.

सेंद्रिय शेतीविषयी माहिती

अनुदानाच्या दरात शेतकऱ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी केवळ बेळगावच नाही तर धारवाड, कोल्हापूर, सांगली, गोवा, सिंधुदुर्ग येथूनही शेतकरी व इतर विक्रेते दाखल झाले आहेत. शनिवारी सायंकाळी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी यांनी युवकांना शेतीविषयी प्रेरित केले. त्याचबरोबर बैलूर मठाचे निजागुणानंद स्वामी यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सेंद्रिय शेतीविषयी माहिती दिली.

धारवाड विद्यापीठाकडून तृणधान्याविषयी शेतकऱ्यांची कार्यशाळा

धारवाड विद्यापीठाकडून तृणधान्याविषयी शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी बेळगावचे माजी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, महापौर सविता कांबळे यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी खाद्यपदार्थ तसेच गृहोपयोगी साहित्याचे स्टॉलही मांडण्यात आले आहेत. शनिवारी सरकारी सुटी असल्याने दुपारनंतर प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी व फलोत्पादन खाते, कृषी विद्यापीठ धारवाड व रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव कृषी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. बेळगावमधील शेतकऱ्यांना आधुनिक अवजारे तसेच शेतीची नवीन पद्धत समजावी यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. फूलशेती, फळशेती कशा पद्धतीने करावी, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जात आहे.

प्रदर्शनाचे शेवटचे दोन दिवस

सोमवार दि. 11 रोजी या प्रदर्शनाची सांगता होणार आहे. कृषीविषयक अवजारे, खते, बियाणे यांची माहिती मिळविण्यासाठी प्रदर्शन महत्त्वाचे ठरत आहे. याबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.