For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहाव्या टप्प्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

06:24 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सहाव्या टप्प्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

58 मतदारसंघात मतदान : प्रतिकूल वातावरणातही 62 टक्क्यांवर मतदान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांसाठी शनिवारी सायंकाळी 6 वाजता मतदान संपले. पूर्वेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस व चक्रीवादाळाची छाया तर उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्मालाटेसारखे प्रतिकूल वातावरण असतानाही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार 58 जागांवर 57.7 टक्के मतदान झाले होते. त्यानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू राहिल्याने अंतिम आकडेवारी येण्यास विलंब झाला. तरीही या टप्प्यात 62 टक्क्यांवर मतदान होण्याचा अंदाज आहे. निवडणूक आयोगाकडून अंतिम टक्केवारी येत्या एक-दोन दिवसात जाहीर केली जाऊ शकते.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 58 मतदारसंघात मतदान झाले. निवडणूक आयोगाकडे सहा वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 78.19 टक्के मतदान झाले होते. तर सर्वात कमी जम्मू काश्मीरमध्ये 51.41 टक्के मतदान झाले. पहिल्या पाच टप्प्यात 429 जागांवर मतदान झाले. आता शेवटच्या 56 जागांसाठी शनिवार, 1 जून रोजी मतदान होणार आहे.

सहाव्या टप्प्यात 889 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये 797 पुऊष आणि 92 महिला उमेदवार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृष्ण पाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे नेतेही आहेत. तसेच तीन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, मनोहरलाल खट्टर आणि जगदंबिका पाल हेदेखील निवडणूक लढवत आहेत. याशिवाय मनोज तिवारी, मनेका गांधी, नवीन जिंदाल, बांसुरी स्वराज, संबित पात्रा, राज बब्बर, निरहुआ आदी बडे नेतेही आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.

बंगालमध्ये भाजप उमेदवारावर हल्ला

पश्चिम बंगालमधील झारग्राममधील भाजप उमेदवार प्रणंत तुडू यांच्यावर हल्ला करण्यात आला. दगड लागल्याने त्याचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. मतदारांना धमकावल्याची तक्रार मिळाल्यानंतर तुडू गडभेटा येथील एका बूथला भेट देण्यासाठी पोहोचले होते. याचदरम्यान प्रणंत तुडू यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. भाजपने टीएमसीवर हल्ल्याचा आरोप केला असून पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू होती. तसेच पश्चिम बंगालमधील अन्य एका घटनेत तमलूकमध्ये मतदानापूर्वी भाजप कार्यकर्त्यांसोबत झालेल्या झटापटीत टीएमसी समर्थक जखमी झाला. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश येथून भाजपचे उमेदवार आहेत.

काश्मीरमध्ये मतदारांच्या रांगा

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघात शनिवारी मतदान झाले. पाच वाजेपर्यंत येथे 51 टक्क्यांवर मतदान झाले होते. कलम 370 हटवल्यानंतर प्रथमच येथे निवडणूक होत असल्याने लोकांनी उत्स्फूर्तपणे आपला मताधिकार बजावला. ‘मी 32 वर्षांनी काश्मीरमध्ये मतदान केले आहे. मी अल्पसंख्याक समुदायाचा आहे, जो सहसा येथे येत नाही. पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या 10 वर्षांतील बदलांमुळे आम्हाला काश्मीरमध्ये येऊन मतदान करता आले,’ अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील काश्मिरी हिंदू वीर सराफ यांनी नोंदवली. येथील पीडीपीच्या उमेदवार मेहबूबा मुफ्ती यांनी मतदानादरम्यान आंदोलन केले. ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आणि मोबाईलचे आऊटगोइंग कॉल ब्लॉक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मतदान दृष्टिक्षेप...

काश्मीरमधील पहलगाममध्ये मतदानासाठी लांबच लांब रांगा

राहुल, प्रियांका, सोनिया गांधी यांनी दिल्लीत केले मतदान

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे रांची येथे मतदान

सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे सपत्नीक दिल्लीत मतदान

अनंतनाग राजौरी मतदारसंघात मतदानासाठी लांबच लांब रांगा

अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबीयांसह मतदानासाठी दाखल

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारांनी दिल्लीत बजावला हक्क

कपिल सिब्बल यांनी आपल्या पत्नीसमवेत बजावला अधिकार

सायंकाळी 5 वाजेपर्यंतचे मतदान...

बिहार : 52.24

हरियाणा : 55.93

जम्मू काश्मीर : 51.35

झारखंड : 61.41

दिल्ली : 53.73

ओडिशा : 59.60

उत्तर प्रदेश : 52.02

पश्चिम बंगाल : 77.99

एकूण टक्केवारी : 57.7 टक्के

Advertisement
Tags :

.