धामणे, देसूर, नंदिहळ्ळी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर /धामणे
गुरूवर्य संभाजीराव भिडे गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडची धामणे, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, सुळगा (ये.) येथे दि. 3 रोजी देवदेवतांच्या जयघोषात सुरूवात झाली आहे. धामणे विभाग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे कलमेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीचे पूजन करून आरती करण्यात आली. ध्वज व शस्त्र पूजनानंतर प्रेरणा मंत्र म्हटले. त्यानंतर हर हर महादेवच्या जयघोषात दुर्गामाता दौडला सुरूवात झाली. दौडचे ठिकठिकाणी आरती ओवाळून स्वागत केले. दौडची शनिवार दि. 12 पर्यंत दररोज पहाटे 5.30 वा. वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरूवात होणार आहे. आजच्या दौडमध्ये धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी येथील युवक व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येथील बसवाण्णा मंदिर आवारात ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली.
देसूर
गावातील प्रत्येक गल्लीत दौड फिरून येथील विठ्ठल मंदिर आवारात पोहोचल्यानंतर ध्येयमंत्र होवून दौडची सांगता झाली. दौड दररोज 12 तारखेपर्यंत चालणार आहे. गावातील युवक, युवती, वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नंदिहळ्ळी
दुर्गामाता मंदिरात दुर्गामातेचे पूजन करून आरती झाल्यानंतर प्रेरणा मंत्राने दौडची सुरूवात झाली. प्रत्येक गल्लीत दौडचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली.
राजहंसगड
दौडला राजहंसगड गावातील श्री सिद्धेश्वर मंदिरात देवाची व शस्त्र पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणा मंत्र होऊन दौडला सुरूवात झाली. दौड गावभर फिरून पुन्हा सिद्धेश्वर मंदिर आवारात पोहोचली. गावात दौडचे उत्साही स्वागत करण्यात आले. सिद्धेश्वर मंदिर आवारात ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली.
सुळगा (ये.)
सुळगा येथील सिद्धेश्वर मंदिरमध्ये शिवमूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून प्रेरणा मंत्राने गडावरून दौडला सुरूवात झाली. दौड सुळगा-येळ्ळूर गावात फिरून गावातील शिवमूर्तीच्या आवारात पोहोचली. गल्लोगल्ली दौडचे स्वागत करण्यात आले. यानंतर शिवमूर्तीसमोर ध्येयमंत्र झाल्यानंतर दौडची सांगता झाली.
तारिहाळ
तारिहाळ येथे शिवमूर्तीचे पूजन करून दौडला सुरूवात झाली. दौडचे सुहासिनींनी आरती ओवाळून ध्वजाचे पूजन केले. दौड रामलिंगेश्वर मंदिर आवारात पोहोचल्यानंतर ध्येयमंत्र झाले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात येवून दौडची सांगता झाली. दौड दररोज नवरात्रोत्सवापर्यंत चालणार आहे.