ठाकरे शिवसेनेचे मावळे पक्षांतराच्या वाटेवर
मालवण - पेंडूर विभागात फूट
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील ठाकरे शिवसेना पक्ष पेंडूर विभागात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. गेले अनेक वर्षे ज्या मतदार संघातून शिवसेनेला जास्तीत जास्त मतदान दिले जाते. त्या पेंडूर विभागातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे ठाकरे शिवसेना पक्षाची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. अशी चर्चा आता विभागात जोरदार होऊ लागली आहे. अलीकडेच ठाकरे शिवसेना पक्षात झालेल्या पेंडूर विभागातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्त्या यामधे स्थानिक पातळीवर काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता करण्यात आल्या आहेत. असा आरोप पदाधिकारी कार्यकर्ते करत होते. गेले अनेक वर्षे पक्षाच्या कामापासून, कार्यक्रमापासून, बैठकापासून दूर राहिलेल्या लोकांना जर पदे दिली जात असतील तर हा पक्षात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यावर अन्याय आहे. याची दखल वरिष्ठांनी घ्यावी अन्यथा वेगळा विचार करावा लागेल अशी चर्चा होती. तसेच सध्या विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना पक्षाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचे पेंडूर विभागात लागलेले दौरे, बैठका, पक्षप्रवेश यामधे आपणाला जाणूनबुजून नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्याकडून डावलले जात आहे. आणि या विषयावरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आपापसात वाद निर्माण करून दिले जात आहेत. परंतु याबाबत वरिष्ठ पातळीवरूनही जर कोणतीही दखल घेतली जात नसेल तर पक्षात कार्यरत राहून काय उपयोग असा सवाल उपस्थित करत वरिष्ठांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यकर्ते पक्षांतर करण्याच्या तयारीत
गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या या सर्व कार्यपद्धतीला कंटाळलेल्या ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपण सन्मानपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अन्यथा भाजपा पक्षात प्रवेश करण्याबाबत तयारी सुरू केली आहे. अशी चर्चा विभागात गेले काही दिवस सुरू आहे. आणि या चर्चेला ठाकरे शिवसेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नेमकी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे शिवसेना पक्षात पेंडूर विभागात फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.