करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाने आत्मिक समाधान : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली भावना
: देवीला साडी अर्पण, अभिषेक, कुंकुमार्चनचा केला विधी
कोल्हापूर प्रतिनिधी
महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी दुपारी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. देवीच्या गाभाऱ्यात जाऊन सर्वप्रथम त्यांनी देवीला साडी, हार व फळे अर्पण केली. गाभाऱ्यातच विराजमान होऊन अंबाबाईच्या चांदीच्या चरणांवर अभिषेक केला. कुंकुमार्चनाचा विधीही केला. यानंतर त्यांच्या उपस्थितीत देवीची एकारती, पंचारती, दुपारती केली. राष्ट्रपतींची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनाही देवीचे दर्शन घेऊन धार्मिक विधी केले. मंदिरात शंखतिर्थ झाल्यानंतर राष्ट्रपतींनी मंदिराबाहेर प्रयाण केले.
तत्पूर्वी राष्ट्रपतींना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे व सचिव शिवराज नाईकवाडे यांनी अंबाबाई मंदिरांचे अंतरंग, काळापाषाणातील शिल्पकला व किरणोत्सवाची माहिती दिली. या माहितीवर प्रभावित झालेल्या राष्ट्रपती मंदिराचे अंतरंग व झुंबर पाहून छान वाटले, असे म्हणाल्या. आज सोमवती अमावस्या असल्याने देवीचे दर्शन घेताना समाधानही वाटले असे सांगताना मंदिराची रचना खूप चांगली अशी भावना व्यक्त केली. आपल्याकडील बंद लिफाफ्यातून दानही मंदिरातील दानपेटीत टाकले.
दरम्यान, विमानतळावऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अतिविशेष सुरक्षेखालील वाहनांच्या ताफ्याने थेट अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ आल्या. त्यांच्यासोबत राज्यपाल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, सोवळ नेसलेले राष्ट्रपतींचे भाऊ व राष्ट्रपतींची कन्या यांच्यासह विशेष शासकीय अधिकारीही होते. राजशिष्टाचार म्हणून राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मंदिराच्या दक्षिण दरवाजापासून अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यापर्यंत रेडकार्पेट अंथरले होते. त्या रेडकार्पेटवर आल्यानंतर देवस्थान समिती प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे स्वागत केले.
अंबाबाईची दुपारची स्वर्ण अलंकार पूजा सुऊ असताना रेडकार्पेटवऊन राष्ट्रपती मुर्मू या गाभाऱ्यापर्यंत गेल्या. प्रत्यक्ष गाभाऱ्यात गेल्यानंतर लाकडी आसनावर आसनस्त झाल्या. अंबाबाईच्या चांदीच्या चरणांवर अभिषेक कऊन कुंकुमार्चनाचा विधी त्यांनी केला. देवस्थान समितीचे पुरोहित पंकज दादर्णे व प्रमोद उपाध्ये यांनी वेदोक्त मंत्रोपचारात पौराहित्य केले. गाभाऱ्या बाहेर आल्यानंतर त्यांनी मंदिरातील महाकाली व महासरस्वतीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा अंबाबाईची साडी, अंबाबाईचे फ्रेम, कॅलेंडर, शाल, लाडू प्रसाद देऊन सत्कार केला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांनी सत्कार स्वीकारला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नर्लेकर, अंबाबाई खजिना हवालदार महेश खांडेकर व रोशन नाईक निवास चव्हाण आदी उपस्थित होते.
सकाळी 10 ते 2 वाजेपर्यत मंदिर परिसर निमर्नुष्य, दुकाने बंद
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंदिराप्रवेशपासून ते त्यांचे बाहेर प्रयाण होईपर्यंतच्या कालावधीत मंदिरात अतिविशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. अंबाबाई मंदिराभोवतीचा जूना राजवाडा परिसर, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर या परिसरातील सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवले होती. इतकेच नव्हे तर मंदिराभोवतालचा सारा परिसरही निर्मणुष्य केला होता. त्यामुळे अक्षरक्ष: कर्फ्यु सारखी स्थिती निर्माण झाली होती.