तामिळनाडूच्या सरकारी शाळेत अध्यात्मिक वर्ग
वक्त्याने पाप, पुण्य, मंदिरावर दिले भाषण: मुख्याध्यापकाची बदल : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या दोन शासकीय शाळांमध्ये अध्यात्मिक वर्गावरून वाद निर्माण झाला आहे. 5 सप्टेंबर रोजी चेन्नईतील दोन शाळा सैदापेट हायस्कूल आणि अशोक नगर गर्ल्स हायस्कूलमध्ये एक स्पिरिच्युअल अवेकनिंग क्लास आयोजित करण्यात आला होता. परमपोरुल फौंडेशनकडून एक वक्ता शाळेत आला आणि त्याने जात, वर्ग, पुण्य, पाप, मंदिराच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांना संबोधित केले. मागील कर्मांची शिक्षा या जन्मात मिळते असे या वक्त्याने म्हटले हेते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ समोर येताच डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने सरकारला हस्तक्षेप करावा लागला आहे. शिक्षण मंत्रालयाने अशोक नगर गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची बदली केली आहे. तर आमच्या शिक्षण व्यवस्थेत केवळ विज्ञानाची गरज आहे. याच्यामुळेच विद्यार्थ्यांच विकास होणार असल्याचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूच्या सरकारी शाळेत परमपोरुल फौंडेशनचे वक्ते महाविष्णू यांना आमंत्रित करण्यात आले होते. या जीवनात आम्हाला जे काही लाभले, ते मागील जन्मांचे फलित आहे. आमच्या देशात गुरुकुल व्यवस्था होती, जी जात आणि लिंगाच्या आधारावर शिक्षणाची अनुमती देत होती. इंग्रजांनी ती संपुष्टात आणली. आमच्या संस्कृतीत असे श्लोक आहेत जे आगीचा वर्षाव करू शकतात आणि आजार बरे करू शकतात. हे सर्व आमच्या पूर्वजांकडून शास्त्रांच्या स्वरुपात लिहिण्यात आले होते, परंतु इंग्रजांनी ते सर्व नष्ट केल्याचा दावा महाविष्णू यांनी केला होता.
या अध्यात्मिक वर्गाचा व्हिडिओ समोर येताच विरोध सुरू झाला. शिक्षणमंत्री अंबिल महेश यांनी शुक्रवारी शाळेला भेट देत या कार्यक्रमाची अनुमती कुणी दिली याची चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. समिती स्थापन करण्यात आली असून अहवालाच्या आधारावर 2 दिवसांमध्ये कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री स्टॅलि यांनीही अध्यात्मिक क्लासवर टीका केली आहे. आमच्या शालेय व्यवस्थेत विज्ञानावर आधारित अभ्यासक्रम शिकविला जातो. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे शिक्षण घ्यावे. शिक्षक देखील नवनव्या कल्पनांसोबत विद्यार्थ्यांच्या विकासात योगदान देऊ शकतात. शालेय विद्यार्थी हेच तामिळनाडूचे भविष्य असल्याचे उद्गार स्टॅलिन यांनी काढले आहेत