हजार खर्च करून रुपया मिळाला नाय...
विहे / सुनील साळुंखे :
ई पीक पाहणीस शासनाची मुदतवाढ मिळाली. मात्र शेतात गेले तर मोबाईल अॅप चालत नाही. तर हजार-बाराशे रुपये खर्च करून एक रुपया मिळाला नाही. शेतात हजारो रुपये घालायचे आणि शासनाच्या शे-पाचशे रुपयांसाठी कुठे झंझटी करत बसा, अशा प्रतिक्रिया येत असून शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
'माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा' या महसूल व वन विभागाच्या आवाहनाबाबत शेतकरी वर्ग अनुत्साही आहे. अतिपावसाने कडधान्य कुजली असून संपूर्ण पिके वाया गेली आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी न केल्यामुळे शेतात तण असून शेताच्या शेतपडी निर्माण झाल्या आहे, पहिला पेरा केलेल्या शेतकऱ्यांना पोटापुरते धान्य मिळाले असते; मात्र पावसाने ऐन वेळी दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत
ई पीक नोंदणीची मुदत १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर आहे. पुन्हा शासनाने सहा दिवस मुदत वाढविली असून २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी पिकांची नोंदणी प्रक्रिया अवघड वाटत आहे. पैसेही येत नसल्याने प्रत्येकाकडे मोबाईल व ई पीकपाणी अॅप असूनसुद्धा पीक नोंदणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन केले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील वाड्यावस्तीवर उत्साह दिसत नाही.
शेतकऱ्यांच्या मते ई पीक नोंदणी केली तरी दुष्काळ जाहीर केला तर शासनाकडून तुटपुंजी मदत मिळते. त्यात अनेक शेतकरी बांधवांकडे ई पीक नोंदणी करण्यास लायक मोठा मोबाईल नाही. कोणाला सांगितले तर त्याचा मोबाईल त्या शेतावर घेऊन जाऊन तेथे फोटो काढावा लागत आहे. त्यामध्ये नोंदणी केलेले क्षेत्र एकाच्या नावावर नोंद झाले तर इतरांना नोंदणी करता येत नाही. सर्वच शेतकऱ्यांनी शेतात काही ना काही पीक पेरा केला आहे. मात्र शासनाची मोबाईलवरून नोंदणीची प्रक्रिया शेतकऱ्यांना अवघड वाटत असल्यामुळे बळीराजाने या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
दोन वर्षांपूर्वी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी मोबाईलवरून मिटींग घेऊन सूचना केल्या. गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकऱ्यांना सांगितले. याबाबत त्यावेळीही लोकांची योजनेबद्दल उदासीनता दिसत होती. काहींनी नोंदणी केली मात्र अनेक शेतकऱ्यांचे पैसे मंजूर होऊनही मिळाले नाहीत. चालू वर्षी पाऊस काळ जास्त झाल्यामुळे अनेकांनी शेताची पेरणी न करता शेती पाडून ठेवली आहे. पेरणी केलेल्या शेतात जादा पावसामुळे उगवण झाली नसून घातलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.
शासनाने ओला दुष्काळ संदर्भात काही घोषणा केलीच, तर नुकसानग्रस्त खरिपाचे पीक आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंद असणे गरजेचे आहे. पीक नोंद नसल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना २० सप्टेंबर पर्यंत सहा दिवस वाढवून दिले आहेत. आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. या तारखेनंतर ई पीक पाहणी मोबाइल अॅप बंद होईल व नंतर पीक नोंदणी होणार नाही, असे आवाहन शासनाने करूनही शेतकरी याबाबत उत्साही दिसत नाही.
- कुणीच अर्ज भरला नाही
गेल्या वर्षी अनुदान मंजूर झाले म्हणून तहसील कार्यालयात ऑपिडेट घातले. स्टॅम्प व सहीला मिळून हजार रुपये गेले. एक रुपया मिळाला नाही. शेतात हजारो रुपये घालायचे आणि शासनाच्या शे-पाचशे रुपयांसाठी कुठे झंझटी करत बसायच्या. मोबाईल नाही त्यांनी काय करायचे. गेल्या वर्षी आले त्यांना तुटपुंजे पैसे आले. चालू वर्षी मी नव्हे कुणीच अर्ज भरला नाही. अनेकांना कळत नसल्यामुळे भरणारही नाही.
- विजय थोरात, शेतकरी, शेडगेवाडी
- अनुदानाला मुकावे लागेल
शासनाने नोंदणी अॅप देऊन वारंवार आवाहन करून शेतकरी योजनेबद्दल उदासीन असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान होऊनही ७/१२ मधील पीक पेरा कोरा आहे. यामुळे कोणतेच अनुदान मिळणार नसून अनुदानाला मुकावे लागणार आहे.
- गेल्या वर्षीचे पैसे मिळाले नाहीत
शासनाने योजना जाहीर केली आहे. पण शेतात गेले तर अॅप चालत नाही. गावात चळवळ राबवूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांना ई पीक पाहणी प्रक्रिया समजण्यास अवघड जात आहे. गेल्या वर्षी केलेल्या ई पीक पाहणीचे पैसे काही शेतकऱ्यांना मिळाले. मात्र अनेकांना मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.
- मंगेश थोरात, विहे