भाड्यापेक्षा जास्त खर्च नखांवर...
आपल्या अवती भोवती अनेक छंदिष्ट लोक असतात याची हे आपल्याला माहीत आहे. अनेकांना अनेक अद्भूत प्रकारचे छंद असतात. अशा व्यक्ती आपल्या छंदांवर प्रचंड रक्कम खर्च करण्यास सज्ज असतात. ते असे छंद का सांभाळतात आणि त्यांना अशा छंदांमधून नेमका कोणता आनंद मिळतो, हे सर्वसामान्य माणसांना कधीही कळू शकत नाही. मात्र, ही माणसे आपल्या छंदांशी अतिशय प्रामाणिक आणि एकनिष्ठ असल्याचे मात्र आपल्याला दिसून येते.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात वास्तव्यास असलेल्या रायन नावाच्या युवकाला युवतींसारखी नखे ठेवण्याचा छंद आहे. त्याने पाच इंच लांबीची हाताच्या बोटांची नखे राखली आहेत. आता लांब नखे वाढविण्याचा छंद अनेकांना असतो. कित्येकांनी तर कित्येक फूट लांबीची नखे राखलेली असतात. तेव्हा केवळ पाच इंच नखांचे एवढे काय कौतुक असा विचार निश्चितपणे आपल्या मनात येईल. पण रायन याने वाढविलेल्या नखांचे वैशिष्ट्या तो या नखांच्या सौंदर्यावर जितका खर्च करतो, त्यात आहे. ही नखे योग्यरित्या ‘सेट’ करण्यासाठी रायन याला नेहमी पार्लरमध्ये जावे लागते. तेथे तो नखे योग्य त्या प्रकारे तासून आणि रंगवून घेतो. यासाठी याला प्रत्येकवेळी तब्बल 75 हजार रुपये खर्च करावे लागतात. अमेरिकेच्या जीवनशैलीच्या तुलनेही ही रक्कम अफाट आहे. तो ज्या घरात राहतो, त्या घराचे मासिक भाडेही या खर्चापेक्षा पुष्कळच कमी आहे. तो आपल्या नखांना जेम्स, थ्रीडी शैली आणि ग्लिटर (चमकदार द्रव्य) लावून सजवितो. त्याच्या हाताच्या सर्व बोटांची नखे अशी पाच इंच लांबीची आहेत. त्याला त्यांची अतिशय निगा राखावी लागते. या नखांमुळे त्याला अनेक बंधनांचे पालन करावे लागते. मात्र, केवळ हा छंद जोपासायचा, म्हणून त्याने ही बंधने स्वीकारली आहेत.