महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उद्योगांच्या चाकाला गती; जिल्ह्याची प्रगती!

11:40 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

औद्योगिक धोरण 2020-25, दोनशेहून अधिक कारखान्यांना सबसिडी : डीआयसीच्या माध्यमातून अंमलबजावणी

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

औद्योगिक क्षेत्र वाढले तरच शहरासह राज्याची प्रगती होईल, या उद्देशाने कर्नाटक राज्य सरकारने औद्योगिक धोरण 2020-25 ची अंमलबजावणी सुरू ठेवली आहे. या योजनेमुळे बेळगाव जिल्ह्यातील केवळ एका वर्षात 200 हून अधिक उद्योगांना अनुदान तसेच कर्जामध्ये सवलत मिळाली आहे. यामुळे अनेक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आपल्या व्यवसायाचे विस्तारीकरण करणे सोयीचे ठरत आहे.

बेळगाव जिल्ह्यात शहरातील उद्यमबाग, अनगोळ, मजगाव, मच्छे, नावगे, काकती-होनगा, ऑटोनगर या औद्योगिक वसाहतींसह कणगला येथे औद्योगिक वसाहत वसविण्यात आली आहे. बेळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक लहान उद्योग असून त्यांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी निधीची गरज असते. औद्योगिक धोरणामुळे चांगला व्यवसाय करणाऱ्या उद्योगांना अनुदान तसेच इतर सुविधाही दिल्या जात असल्याने ही योजना उद्योजकांसाठी महत्त्वाची ठरत आहे.

कर्नाटक राज्य सरकारने उद्योग वाढविण्यासाठी 2020-25 औद्योगिक धोरण जाहीर केले. या धोरणांतर्गत लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांवर भर देण्यात आला. लघुउद्योगांना आपले कार्यक्षेत्र वाढवायचे असेल त्यासाठी उद्योगाच्या क्षमतेनुसार व त्यांनी मागील वर्षभरात भरलेल्या जीएसटीनुसार उद्योगांना अनुदान दिले जाते. हे अनुदान इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट व पॉवर सबसिडी यांच्या रुपाने दिले जाते.

उद्योगांनुसार यामध्ये प्रतवारी करण्यात आली आहे. यामध्ये 10 टक्क्यांपासून 30 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. यासाठी मागील काही वर्षात उद्योग कशा पद्धतीने चालविला आहे, याची शहानिशा बँकांकडून केली जाते. बँकांनी मंजुरी दिल्यानंतरच डीआयसीकडून उद्योगांना अनुदान मंजूर केले जाते.

2020-21 मध्ये तत्कालिन उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा, याबरोबरच लहान उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करता यावा, यासाठी विविध उपाययोजना या औद्योगिक धोरणात करण्यात आल्या. राज्यातील जिल्ह्यांचे तीन भागात वर्गीकरण करण्यात आले. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनुदान देण्यात येत आहे. पाच लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज तसेच अनुदान औद्योगिक धोरणानुसार देण्यात येत आहे.

कुठे संपर्क साधावा?

उद्योगांना मदत करण्यासाठी उद्यमबाग येथे जिल्हा औद्योगिक केंद्र (डीआयसी) कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत पीएमईजीपी तसेच औद्योगिक धोरणांतर्गत अनुदान दिले जाते. बँकांनी उद्योगाला मंजुरी दिल्यास त्यानंतर त्या उद्योगांना अनुदान दिले जाते. लहान उद्योगांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाते. त्यामुळे कोणत्याही अडचणीसाठी उद्योजकांनी उद्यमबाग येथील डीआयसी कार्यालयाला संपर्क साधावा.

प्रतिक्रिया :- सत्यनारायण भट (सहसंचालक जिल्हा उद्योग केंद्र)

लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना हातभार लागावा यासाठी कर्नाटक राज्य सरकारकडून औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. औद्योगिक धोरण 2020-25 अंतर्गत उद्योगांचे नूतनीकरण, आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्यासाठी अनुदान दिले जाते. उद्योग कसा चालविला जातो, यावर हे अनुदान निश्चित केले जाते. मागील आर्थिक वर्षात बेळगाव जिल्ह्यातील 200 उद्योगांनी अनुदान मिळविले आहे.

 

जिल्ह्यात अनुदान मिळविलेल्या उद्योगांची संख्या

विद्युत अनुदान- 8

गुंतवणूक अनुदान- 181

व्याज अनुदान- 6

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article