Solapur : सोलापुरात भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; दोघे जखमी
सोलापुरात रिक्षा–दुचाकी भीषण अपघात
सोलापूर : भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या रिक्षाने दुचाकीला समोरून धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रिक्षा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
२४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बीएमआयटी कॉलेजसमोर ही घटना घडली. फिर्यादी चैतन्य आनंद केशपागा (वय २१, रा. मोदीखाना, सोलापूर) हा त्याचा मित्र अस्फर शेख यांच्यासह दुचाकी (एमएच १३-ईझेड ०१५४) वरून घरी परत जाताना समोरून येणाऱ्या रिक्षाच्या (एमएच १३-सीटी २५२९) अज्ञात चालकाने भरधाव वेगात व
निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात फिर्यादी व त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले असून, दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपघातानंतर मदत न करता रिक्षा चालक रिक्षासह घटनास्थळावरून पसार झाला.याप्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार रिक्षा चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.