कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेला गती देणार
महापालिकेकडून 28 महिन्यात पाच हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचे स्पष्ट
बेळगाव : बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली आहे. संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मागील 28 महिन्यात 5 हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण महापालिकेने केले असल्याचे स्पष्ट केले आहे. लहान मुले तसेच मोठ्या व्यक्तींवर कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने हा उपक्रम हाती घेतला होता. भविष्यात या उपक्रमाला मनपाकडून गती दिली जाणार आहे. सध्य शहरात 20 हजारहून अधिक भटकी कुत्री आहेत. 2007 पासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येत आहे. काहीवेळा निधीचा अभाव असल्याने ही मोहीम थांबविली जाते. बऱ्याचवेळा प्राणीदया संघटनेच्या हस्तक्षेपामुळे कारवाई आटोपती घ्यावी लागते. परंतु यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे.
बेंगळुरातील कंपनीला ठेका
मागील सहा महिन्यात अनेक लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना निर्बंध घालण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. यासाठी महानगपालिकेने निर्बिजीकरण मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली आहे. बेंगळूर येथील एका कंपनीला निर्बिजीकरणाचा ठेका देण्यात आला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, निर्बिजीकरण करण्यासाठी ठेका दिलेल्या कंपनीचे कंत्राट लवकरच संपत आहे. त्यावेळी या संदर्भात नव्या निविदा काढल्या जाणार आहेत. पुढील अडीच वर्षासाठी निविदा काढल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हल्ल्याचे प्रमाण वाढतेच
कुत्र्यांचे निर्बिजीकरण महापालिकेकडून केले जात असले तरी हल्ल्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न यापुढेही तसाच राहण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांचा जीव मात्र धोक्यात सापडल्याचे जाणवत आहे.