कार्यालयीन कामात गतीमानता आणा
कोल्हापूर :
शासनाच्या योजना तसेच जनतेच्या हिताचे घेण्यात आलेले निर्णय, शासकीय लाभ गाव पातळीपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी कार्यालयातील कामकाजात गतिमानता आणत चांगले वातावरण निर्माण करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. प्रत्येक शासकीय योजना, शासकीय लाभ लोकांपर्यंत पोहोचवत असताना कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ करून नागरिकांकडून येत असलेल्या सूचनांचाही विचार करा. त्या अधिक चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रत्येक कार्यालयाने नियोजन करा असे निर्देशही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हास्तरावरील यंत्रणेची बैठक घेऊन पुढील शंभर दिवसांचे नियोजन करण्याबाबच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिह्यातील जिल्हास्तरावर सर्व अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांची याबाबत बैठक घेतली. यावेळी बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त महापालिका आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व विभाग प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते तर तालुकास्तरावरून संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यात लोककेंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणारी कामगिरी यात कोल्हापूर जिह्यातून चांगला सहभाग असावा असे निर्देश देत प्रत्येक विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.अ ाधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम सविस्तर सांगितला. आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, नागरिकांसाठी किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, असेही त्यांनी सांगितले.
गुंतवणुकीसाठी उद्योजकांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. तालुका, गाव पातळीवर भेटी, शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्याच पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
तक्रारी व अर्ज याबाबतची नोंदवही ठेवून त्याबाबतचा दैनंदिन आढावा घ्यावा. प्रत्येक कार्यालयात आपले सेवा सरकार या संकेतस्थळाचा क्यूआर कोड दर्शनी भागात लावावा. सात कलमी कार्यक्रमाबाबत प्रत्येक कार्यालयाने दैनंदिन अहवाल नोंदवावा. अंमलबजावणीचे अगोदरचे छायाचित्र व नंतरचे छायाचित्र अशा प्रकारे फलनिष्पत्ती अहवाल तयार करून तो जिल्हा कार्यालयाला सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले.
- उद्यापासून कार्यालयीन स्वच्छतेला प्रारंभ
प्रत्येक शासकीय कार्यालयात येणाऱ्या शुक्रवारपासून दोन तास स्वच्छतेसाठी या उपक्रमांतर्गत शुक्रवारी सायंकाळी एक तास कार्यालयीन स्वच्छतेसाठी देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सोमवारी सकाळी एक तास कार्यालय परिसरातील स्वच्छतेसाठी देण्यात येणार आहे.
- 15 एप्रिलपूर्वी अहवाल व आढावा होणार
सात कलमी कार्यक्रमाबाबतच्या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबतचा अहवाल व आढावा 15 एप्रिल पुर्वी घेतला जाईल, असे अमोल येडगे यांनी या बैठकीत सांगितले.