कोकणी 'बाय'चा नादच खुळा!, स्पीड बाईक रायडिंग स्पर्धेत 'नेहा सोहनी' देशात पहिली
बाईक स्पर्धेत देशभरातील 500 तरुणांचा सहभाग, नेहा एकमेव महिला स्पर्धक
By : समीर शिगवण
रत्नागिरी : स्पर्धेच्या युगात आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे संगमेश्वर-साखरपा येथील ग्रामीण भागातील नेहा सोहनी या 27 वर्षीय तरुणीने सिद्ध करून दाखवले आहे. धोकादायक अशा स्पीड बाईक रायडिंग स्पर्धेत सहभाग घेत तिने देशात प्रथम क्रमांक पटकावत रत्नागिरी जिह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. विशेष म्हणजे या बाईक स्पर्धेत देशभरातील 500 तरुणांनी सहभाग दर्शवला होता. यामध्ये ती एकमेव महिला स्पर्धक होती. तिच्या या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
नेहा सोहनी ही मूळ संगमेश्वर-साखरपा येथील असून ती मुंबईत स्थायिक आहे. तिची घरची परिस्थिती तशी बेताचीच. तिने बीबीएम, त्यानंतर पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. मात्र नेहाच्या मनात काहीतरी वेगळे करण्याचा विचार होता. जेणेकरून आपला सर्वांना हेवा वाटेल आणि इतर महिला आपला आदर्श घेतील, असा चंग तिने बांधला होता. 2024 मध्ये स्पोर्टस् बाईक राईडच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेला नेहाने हजेरी लावली होती. याच स्पर्धेतून प्रेरणा घेत तिने मित्रांच्या मदतीने ती बाईक चालवायला शिकली. नेहाचे मित्र नदीम शाह आणि झहीर शाह या दोन सख्ख्या भावांनी तिला या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. ते रायडींग स्पर्धेत माहीर आहेत. नदीम आणि झहीर यांनी मोठमोठ्या स्पर्धेत भाग घेऊन अनेक पारितोषिके पटकावली आहेत. कार रेसिंग, बाईक रेसिंगमध्ये दोघा भावांचा मोठा हातखंडा आहे.
13 ते 15 एप्रिल 2025 मध्ये कॅस्ट्रोल कंपनीने ‘व्हॅली रन 2025’ ही स्पीड बाईक रायडिंग स्पर्धा अॅबे व्हॅली लोणावळा येथे आयोजित केली होती. यामध्ये देशभरातून 500 स्पर्धकांनी भाग घेतला होता. नेहानेही यात भाग घेतला होता. तिच्या बाईकची नदीम आणि झहीर यांनी उत्तम प्रकारे सजावट, देखभाल केली. स्पर्धेत सगळीकडे तिला पुरुषच दिसत होते. एवढ्या पुरुषांच्या स्पर्धेत ही महिला काय जिंकणार? असे बोलेले गेले.
परंतु नेहाने त्याकडे दुर्लक्ष करत स्पर्धा जिंकूनच आपण त्यांची तोंडे बंद करायची, असा निर्धार केला. त्यादृष्टीने तिने लक्ष केंद्रीत केले. स्पर्धा सुरू होताच तिने एकेकाला मागे टाकायला सुरुवात केली. धोकादायक आव्हानांचा सामना करत त्यातून मार्ग काढत ती पुढे गेली. अन् अखेर तिने ही स्पर्धा जिंकली. 500 पुरुषांमधून जिंकून देशात प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान तिने पटकावला.
आता ध्येय ‘फास्ट फिमेल ड्रॅग रेसर’चे : नेहा सोहनी
आजच्या पिढीला संदेश देताना नेहा म्हणाली, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी स्वप्नांच्या मागे धावण्यास कधीही घाबरू नका. या धोकादायक स्पर्धेसाठी मला घरच्यांनी पूर्ण सहकार्य केले. एवढ्या मोठ्या धोकादायक स्पर्धेत उतरणे, हे आई-वडिलांसाठी भीतीदायक होते. परंतु माझ्या निर्णयामुळे त्यांनी पाठिंबा देत परवानगी दिली आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकले. आता मला सगळ्यात फास्ट फिमेल ड्रॅग रेसरचे प्रथम पारितोषिक मिळवायचं आहे, असे तिने सांगितले.