सांगरूळ परिसरात देखावे पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी! ऐतिहासिक व चालू घडामोडीवर सजीव देखाव्यावर भर
सांगरूळ / वार्ताहर
येथील गणेशोत्सव मंडळाचे स्टेजसिनचे सजीव देखावे पाहण्यासाठी सांगरूळ सह परिसरातील रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.चालू वर्षी गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक व चालू घडामोडीवर आधारित देखाव्यावर अधिक भर दिला होता .कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राजकीय सामाजिक शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी गावात उपस्थिती लावली . स्टेज सिनचे कार्यक्रम नियोजनबद्ध व शांततेत व संयमाने सादर करण्यात आलेत .
सांगरूळ (ता. करवीर) येथे गणेश उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .चालू वर्षी गावातील २३ गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये सात गणेशोत्सव मंडळांनी स्टेजसीन सादर केले .इतर मंडळांनी रोडसिन तसेच महाप्रसादाचे नियोजन केले होते .
ध्वनिफीत स्वतः लिखित व दिग्दर्शित
सांगरूळ येथील गणेश उत्सव मंडळातील कार्यकर्ते स्टेजसिन व रोडसिन कार्यक्रमाची ध्वनीफीतीचे स्वतः लेखन करून स्टुडिओमध्ये योग्य त्या आवाजासाठी कलाकारांचा वापर करून ध्वनिफीत तयार केली जाते . अधिक करून तयार कॅसेटचा वापर टाळला जातो . संपूर्ण कार्यक्रमांमध्ये सर्वच मंडळे एकमेकाला सहकार्याची भूमिका घेत कार्यक्रम शांततेने पार पडतात .हे येथील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. आपला कार्यक्रम उठावदार व्हावा यासाठी गेली महिनाभर मंडळांचे कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील होते .