For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहित कंग्राळीचा प्रेक्षणीय विजय

10:13 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोहित कंग्राळीचा प्रेक्षणीय विजय
Advertisement

बेळगाव : खणगाव खुर्द येथे खणगाव कुस्तीगीर संघटना आयोजित गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रमुगा कुस्तीत कंग्राळीच्या रोहित पाटीलने वरुण अथणीमठला 12 व्या मिनिटाला हप्ते डावावरती चीत करुन उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली. खणगाव येथे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आयोजित केलेल्या पहिल्या क्रमांकाची कुस्ती बेळगावचा आघाडीचा मल्ल रोहित पाटील (कंग्राळी) व ज्युनियर कर्नाटक कुमार वरुण अथणीमठ ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला रोहित पाटीलने एकेरी पट काढून वरुणला खाली घेत एकचाक डावावरती चीत करण्याचा प्रयत्न केला. पण वरुणने त्यातून सुटका करुन घेतली. सातव्या मिनिटाला वरुणने पायाला चाट मारुन रोहितवर कब्जा मिळविला. पण रोहितने त्यातून रितसर सुटका करुन घेतली. 12 व्या मिनिटाला रोहितने एकेरी पट काढून वरुणला खाली घेतले. पण वरुणने सुटका करुन जात असताना रोहितने दोन्ही हाताचे हप्ते भरुन हप्ते डावावरती चीत करत उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.

Advertisement

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत दयानंद शिरगाव व निखिल कंग्राळी या कुस्तीत चौथ्या मिनिटाला निखिलने एकेरी पट काढून दयानंदला खाली घेत मानेवरती घुटना ठेऊन चीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून दयानंदने सुटका करुन घेतली. आठव्या मिनिटाला दयानंदने पायाला आखडी लावत निखिलला चीत करण्याचा प्रयत्न केला. पण निखिलने सावधपणे त्यातून सुटका करुन घेतली. ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंझली. शेवटी वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेशने (लहान कंग्राळी) मारुती मुधोळचा घिस्सा डावावरती पराभव केला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती रोहित कडोलीने शुभम मुतगाचा एकचाक डावावरती विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्ती करण खादरवाडीने प्रज्वल कंग्राळीचा एकलांगी डावावरती विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्ती किसन कंग्राळीने नितेश राजस्थानचा आकडी डावावरती पराभव केला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत साहिल कंग्राळीने किरण खादरवाडीचा घिस्सा डावावरती पराभव केला. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत केशव सांबराने प्रज्वल कडोलीचा डंकी डावावरती पराभव केला. त्याशिवाय लहान-मोठ्या कुस्त्यांमधून स्थानिक मल्लांनी विजय संपादन केले. आखाड्याचे पंच म्हणून नवीन मुतगे, गणपत बन्नोशी, मारुती पाटील, बसवाणी सुतार, वामन पाटील, मारुती अय्याप्पा पाटील यांनी काम पाहिले. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी खणगाव देवस्थान पंच कमिटी त्याचप्रमाणे जिर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Tags :

.