For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्षवेधी पॅरिस ऑलिम्पिक

06:55 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
लक्षवेधी पॅरिस ऑलिम्पिक
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

जगभरातील अलौकिक क्रीडा गुणवत्तेच्या गेल्या 15 दिवसातील प्रदर्शनानंतर नेत्रदीपक आणि चित्तथरारक समारोप सोहळ्याने पॅरिस ऑलिम्पिकवर पडदा पडला आणि स्पर्धेचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी ऑलिम्पिकचा ध्वज लॉस एंजलिसकडे सोपविण्यात आला. दोन आठवड्यांपूर्वी सीन नदीवर झालेल्या नावीन्यपूर्ण आणि न-भूतो अशा उद्घाटन सोहळ्यात फ्रान्सच्या स्थापत्यकलेचे आणि देशाच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडले होते. सोमवारी समारोपाची सायंकाळही अशीच मंत्रमुग्ध करणारी होती. समारोप सोहळ्याची सुरुवात ‘मार्सी पॅरिस’ने झाली. या फ्रेंच शब्दाचा अर्थ ‘आभारी’ असा आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक चार सुवर्णपदके जिंकणारा फ्रान्सचा जलतरणपटू लेऑन मारशॉने मैदानात प्रवेश केला आणि 15 दिवस एका फुग्यात तेवत असणारी ऑलिम्पिक ज्योत शांत करण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या 205 देशांच्या ध्वजवाहकांनी भव्य स्टेडियममध्ये कोरलेल्या जगाच्या नकाशावर प्रदक्षिणा घातली. यानंतर जगभरातील खेळाडूंनी अलविदा पॅरिस म्हणत निरोप घेतला.

26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. फ्रान्सने या स्पर्धेचे अतिशय नेटके व दिमाखदार आयोजनाने साऱ्या जगाचे लक्ष वेधले. वैभवशाली फ्रान्सच्या पंरपरेचे दर्शन जगाला घडले. अगदी शेवटच्या दिवशी अमेरिकेने पदकतालिकेत बाजी मारत 40 सुवर्णासह ऑलिम्पिकमध्ये आपणच किंग असल्याचे दाखवून दिले. आशियातील महासत्ता असलेला चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, यजमान फ्रान्स, ग्रेट ब्रिटनसह अन्य छोट्या मोठ्या देशांनी देखील आपली ताकद यादरम्यान दाखवून दिली. 150 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला मात्र सहा पदकांवर समाधान मानावे लागले. स्पर्धेदरम्यान सीन नदीतील प्रदूषणाचा मुद्दा, पराग्वेच्या जलतरणपटूची हकालपट्टी, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटची अपात्रता, अल्जेरियन बॉक्सरचा महिला की पुरुष वाद चांगलेच गाजले. पॅरिस ऑलिम्पिकमधील अशाच काही लक्षवेधी घटनांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...

Advertisement

  1. पिस्तूल क्वीन मनू भाकर - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीमध्ये पहिले पदक मिळाले. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर मनूने मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. सरबज्योत सिंग हा तिच्यासोबत या संघात होता. 22 वर्षीय मनूच्या अप्रतिम कामगिरीने पदकतालिकेत भारताची शान वाढवली.
  2. पुरुष हॉकी संघ - भारतीय हॉकी संघाने स्पेनला नमवत कांस्यपदक जिंकण्याची किमया केली. सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने हे यश मिळवले. हॉकीमध्ये भारताचे हे आजवरचे एकूण 13 वे पदक ठरले आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने आतापर्यंत हॉकीत 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्यपदके मिळवली आहेत.
  3. भारतीय हॉकीची वॉल पीआर श्रीजेश निवृत्त - भारतीय हॉकी संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्त झाला. श्रीजेशच्या निवृत्तीनंतर भारतीय हॉकीमधील एक महान पर्वाची सांगता झाली.
  4. नीरजचा रौप्यवेध - दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने हंगामातील सर्वोत्तम 89.45 स्कोअर केला व मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचे बाकीचे थ्रो फाऊल होते. भारताचे प्रतिनिधित्व करत 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारा नीरज केवळ चौथा खेळाडू ठरला आहे.
  5. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा अचूक नेम - भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेने स्वप्नवत कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये त्याने कांस्यपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा तो महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला.
  6. कुस्तीत अमन सेहरावतला कांस्य - कुस्तीपटू अमन सेहरावतने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलेवाहिले कांस्यपदक मिळवून दिले. सेहरावतने पुरुषांच्या फ्रीस्टाईल 57 किलो वजनी गटाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझचा पराभव केला. विशेष म्हणजे, 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंनी भारताला पदक मिळवून दिले आहे. अमनने हा वारसा कायम ठेवत यंदाच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची भारतीय कुस्तीची महान पंरपरा कायम ठेवली आहे.
  7. मासिक पाळी अन् अशक्तपणा, तरीही मीराबाई लढली - भारताच्या मीराबाई चानूकडून वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकण्याची अपेक्षा होती, परंतु मीराबाईने भारतीय चाहत्यांना निराश केले. मीराबाईला क्लीन अँड जर्कच्या शेवटच्या प्रयत्नात 114 किलो वजन उचलता आले नाही आणि त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. स्पर्धेदरम्यान तिच्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता, असे असतानाही मीराबाईने प्रयत्न केले पण तिला यश आले नाही.
  8. विनेश फोगाटची अपात्रता - ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे कारण सांगत तिला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने तिच्यावर कारवाई केली. आता, क्रीडा लवादाकडे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
  9. बॅडमिंटनपटू लक्ष्य लढला पण हरला - यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत जबरदस्त खेळानंतरही त्याला पराभव स्वीकारावा लागला. सेमीफायनलमधील पराभवानंतर लक्ष्य कांस्यपदक जिंकेल असे वाटत होते, पण आघाडीनंतरही त्याला हार मानावी लागली. उजव्या हाताला दुखापत झालेली असतानाही 22 वर्षीय लक्ष्यने मलेशियन ली झियाला विजयासाठी चांगलेच झुंजवले. 12 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये एकही पदक मिळालेले नाही. यापूर्वी पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत पदके जिंकली होती. यंदा मात्र पदकाविना भारताचे बॅडमिंटनमधील आव्हान समाप्त झाले.
  10. पीव्ही सिंधू, सात्विक-चिरागही रिकाम्या हाताने माघारी - बॅडमिंटनमध्ये दिग्गज पीव्ही सिंधू, दुहेरीत सात्विक-चिराग यांनी सुरुवातीला दर्जेदार खेळ केला पण नंतरच्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या दिग्गज खेळाडूकडून भारताला पदकांची आशा होती पण निराशाजनक कामगिरीमुळे भारताला बॅडमिंटनमध्ये एकही पदक मिळाले नाही.
  11. बॉक्सिंगमध्ये अपयश - भारताची स्टार बॉक्सर लवलिना बोर्गोहेनला महिलांच्या 75 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. या सामन्यात भारतीय बॉक्सरने चांगली कामगिरी केली, मात्र चीनच्या बॉक्सरचे आव्हान तिला महागात पडले, यामुळे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्यापासून लवलिना चुकली. लवलिनासह इतर बॉक्सरची कामगिरी सुमार ठरली.
  12. तिरंदाजीत पदकांचा दुष्काळ कायम - ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीच्या पराभवासह तिरंदाजीत भारताचे आव्हान देखील संपुष्टात आले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताला एकही पदक जिंकता आले नाही. युवा तिरंदाजांनी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली खरी पण कोरियन, चिनी तिरंदाजासमोर त्यांचा टिकाव लागला नाही.
  13. अॅथलेटिक्समध्ये सुमार कामगिरी - यंदाच्या स्पर्धेत नीरज चोप्रा वगळता अॅथलेटिक्समध्ये एकही पदक भारताला जिंकता आले नाही. गोळाफेक, लांब उडी, महिला व पुरुष रिले, चालण्याच्या शर्यती, पॅरा जंप याशिवाय इतर स्पर्धेत भारताच्या खेळाडूंची कामगिरी दिसूनच आली नाही. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत स्टीपलचेसमध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने आपला करिष्मा दाखवला खरा पण अंतिम लढतीत तोही अपयशी ठरला. नीरज वगळता अॅथलेटिक्समध्ये भारताची पाटी कोरीच राहिली.
  14. टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक कामगिरी - मनिका बात्रा, श्रीजा अकुला, अर्चना कामथ या युवा महिला टेबल टेनिसपटूंनी यंदाची स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली. भलेही भारतीय खेळाडूंना पदक जिंकण्यात अपयश आले असेल पण आपल्या दर्जेदार कामगिरीने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली, हे विशेष. पुरुष खेळाडू मात्र यंदाच्या स्पर्धेत अपयशी ठरले.
  15. साऊथ इंडियन हिरोसारखा आला, नेम धरला अन् पदक घेऊन गेला - 51 वर्षीय तुर्की नेमबाज युसूफ डिकेक कोणत्याही स्पेशल सामानाशिवाय मैदानावर उतरला आणि मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत रौप्य पदक जिंकले. सहसा, जेव्हा एखादा खेळाडू या इव्हेंटमध्ये मैदानात उतरतो, तेव्हा तो त्याच्या डोळ्यांवर आणि कानात सुरक्षा गियर घालतो. या अॅक्सेसरीजमुळे त्याला स्पर्धेदरम्यान लक्ष केंद्रित करण्यास आणि अचूक लक्ष्य ठेवण्यास मदत होते. मात्र तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेकने प्रेक्षकांना चकित केले. त्याने सुरक्षेसाठी कोणतेही किट वापरले नाही.
  16. सात महिन्याची गर्भवती असताना तलवारबाजी - ऑलिम्पिकमधील तलवारबाजी स्पर्धेत भाग घेतल्यानंतर इजिप्शियन तलवारबाज नादा हाफेझने ती 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. नादा हाफेज पॅरिस ऑलिम्पिकच्या तलवारबाजी स्पर्धेत राउंड ऑफ 16 पर्यंत पोहोचली होती, पण या फेरीत तिचा पराभव झाला.
  17. गोल्डनस्लॅम-सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कारेजचा 7-6 (7-3) 7-6 (7-2) असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. जोकोविचने कारकिर्दीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. जोकोविच करिअर गोल्डन स्लॅम जिंकणारा अर्थात चार ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक एकेरी सुवर्णपदक जिंकणारा केवळ पाचवा एकेरी खेळाडू ठरला आहे.
  18. पराग्वेची जलतरणपटूची हकालपट्टी - केवळ दिसायला प्रचंड सुंदर असल्याने पराग्वेच्या एका महिला स्विमरला ऑलिम्पिकमधून मायदेशी पाठवण्यात आले. लुआना अलोन्सो असे तरुण पॅराग्वेयन महिला स्विमरचे नाव आहे.
  19. पुरुष म्हणून हिणवलं, तिनेच गोल्ड जिंकले - अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. खलीफचा विजय हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. कारण ती बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी आफ्रिका आणि अरब जगतातील पहिली महिला ठरली. विशेष म्हणजे, मागील काही दिवसापासून इमाने खलिफ लिंग विवादामुळे खूप चर्चेत होती. तिच्यावर बायोलॉजिकल पुरुष असल्याचा आरोपही करण्यात आला होता. पण हे सारे वादविवाद मागे टाकत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
  20. बॅडमिंटन कोर्टवर थेट गर्लफ्रेंडला प्रपोज - पॅरिसला ‘प्रेमाचं शहर’ असे म्हटले जाते. अनेकजण खास या शहरात येऊन आपल्या जोडीदाराकडे प्रेम व्यक्त करतात. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये असेच एक दृष्य पहायला मिळाले. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती चीनची बॅडमिंटनपटू हुआंग किओंगला तिचा प्रियकर लियू यू चेनने प्रपोज केलं, जे चर्चेचा विषय ठरले.
  21. बांधकाम कामगाराचा मुलगा ते ऑलिम्पिक सुवर्ण - अर्शद नदीमचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आले आहे. अर्शदचे वडील बांधकाम मजूर असून घरात वडीलच कमावते असल्यामुळे अर्शदला सुरुवातीपासून संघर्षात दिवस काढावे लागले आहेत. पण या संघर्षाच्या जोरावर पाकिस्तानच्या 6.3 फुटांची उंची असलेल्या या खेळाडूने आपल्या आयुष्यातील सर्व संघर्ष पणाला लावत भाला फेकला आणि 92.97 मीटरचा थ्रो करत यंदाच्या ऑलिम्पिकमधील सर्वोच्च विक्रम नोंदविला.
  22. स्पर्धेत अनेक नवे विक्रम-पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्ट सिमोन बायल्स, अमेरिकन जलतरणपटू केटी लेडेकी, फ्रान्सचा युवा स्विमर लिओन मर्चंड, पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम, अॅथलेटिक्समध्ये अमेरिकन, जमैकन, केनियन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीसह नव्या विक्रमांची नोंद केली. याशिवाय, कुस्ती, वेटलिफ्टिंग, ज्युदो, अश्वारोहणामध्ये युरोपियन खेळाडूंनी आपला ठसा उमटवला. रोईंग, तलवारबाजी, आर्टिस्टीक स्विमींग यासारख्या खेळांमध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले.

सरते शेवटी...

तीन आठवडे चाललेल्या या स्पर्धेत भारताच्या 117 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने अपेक्षेपेक्षा कमी अशी सहा पदके पटकावली आणि यंदा तर सुवर्णपदकानेही हुलकावणी दिल्यामुळे भारताचा क्रमांक 71 पर्यंत खाली घसरला. कुस्तीमध्ये विनेश फोगटच्या वजनावरून घोळ झाला नसता, तर आणखी रौप्यपदक मिळाले असते. आणि नीरज चोप्राला पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडून अनपेक्षित स्पर्धा उभी राहिली नसती, तर भारताला सुवर्णपदकासह दोन आकडी पदकसंख्या गाठता आली असती आणि भारताचा क्रमांक पहिल्या पन्नासात तरी लागला असता. ही झाली तांत्रिक बाजू. स्पर्धेदरम्यान विनेश फोगट, बॅडमिंटनपटू व इतर खेळांना मिळणाऱ्या सोयी सुविधा यांचा विषयही चांगलाच चर्चेत आला. पदकतालिकेत अमेरिका, चीन यांनी प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवला  आहे. लोकसंख्येने अगदी लाखात असलेल्या आफ्रिकन देशांनीही भारताला कधीच मागे टाकले आहे. युक्रेनसारख्या युद्धग्रस्त देशानेही पदकामध्ये आपल्यापेक्षा सरस कामगिरी केली. चीन आज इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही महासत्ता आहे. कारण कितीतरी क्रीडा प्रकारांमध्ये या देशाची गुंतवणूक आणि गुणवत्ता आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपिय देशांमध्ये वर्षानुवर्षे रुजलेली आणि जोपासलेली क्रीडा संस्कृती आहे. जपान-कोरिया हे देश वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांती पहिल्या जगातले देश म्हणून वावरतात. सरतेशेवटी लिहताना इतके सांगावेसे वाटते की, 117 मधील सहा भारतीयांनी पदक मिळवले. ते देखील नेमबाजी, हॉकी, भालाफेक व कुस्ती क्रीडा प्रकारात. अलीकडील काळात भारताने दर्जेदार अशी कामगिरी केली आहे पण ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेत आजही आपण कोसो दूर आहोत. आगामी काळात भारताला मोठे यश संपादन करायचे असेल तर भारतीय खेळाडूंना आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे. आजघडीला जागतिक स्तरावर स्पर्धा मोठी आहे, यादृष्टीने भारताने देखील सातत्यपूर्ण कामगिरीवर भर द्यायला हवा, हे मात्र नक्की.

Advertisement
Tags :

.