पॉक्सो प्रकरणांचा तपास विशेष पोलीस करणार
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा तपास आता पोलिसांची एक खास टीम करणार आहे. केरळ सरकारने याकरता एका विशेष शाखा स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या स्पेशल युनिटमध्ये एकूण 304 नव्या पदांची निर्मिती केली जाणार आहे. यात 4 उपपोलीस अधीक्षक, आणि 40 उपनिरीक्षक, सामील आहेत. ही टीम केवळ पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत नोंद गुन्ह्यांचा तपास करणार आहे. अशा प्रकरणांचा वेगाने आणि योग्य तपास व्हावा, जेणेकरून पीडितांना लवकर न्याय मिळू शकेल, असा सरकारचा उद्देश आहे. राज्य गृह विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाने केलेल्या शिफारसीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. विशेष पोलिसांच्या माध्यमातून मुलांचे लैंगिक शोषण रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच गुन्हेगारांना मोठी शिक्षा मिळवून देण्याच्या दिशेने पावले उचलली जाणार आहेत. केरळ सरकारने याप्रकरणी घेतलेला पुढाकार अन्य राज्यांसाठी देखील अनुकरणीय ठरण्याची शक्यता आहे.