राज्य मंत्रिमंडळाची आज विशेष बैठक
अंतर्गत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेंगळूर
विविध खात्यांमधील पदे भरतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी अनुसूचित जातींच्या अंतर्गत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकारची कसरत सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत अंतर्गत आरक्षणासंदर्भात विस्तृत चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाची 2026 सालातील नववी मंत्रिमंडळ बैठक गुरुवार 26 मार्च रोजी बोलावण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी 7 वाजता विधानसौधमध्ये होणार असल्याचे सरकारच्या अप्पर सचिवांनी कळविले आहे.
राज्य सरकारने तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून अंतर्गत आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्ती नागमोहनदास यांच्या अहवालाच्या आधारे निश्चित करण्यात आलेल्या अंतर्गत आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन आठवड्यांपर्वी याबाबत आश्वासन दिले होते.
अंतर्गत आरक्षणासंदर्भात सरकार सर्व संबंधित समुदायांच्या हिताचा विचार करेल. मंत्रिमंडळ बैठकीत साधक-बाधक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाईल. त्यानंतर सर्वांना न्याय देणारे सूत्र तयार केले जाईल, असे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले आहे. अंतर्गत आरक्षणाशिवाय जुनी आरक्षण पद्धतीच जारी ठेवावी, अशी मागणी करत अनुसूचित जातीतील उजव्या गटातील संघटनेने बेंगळुरातील फ्रीडम पार्कवर आंदोलन छेडले आहे. बुधवारी मंत्री एम. बी. पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. याप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर देखील उपस्थित होत्या.