काश्मीरमध्ये सैन्यासाठी धावली विशेष मालगाडी
लष्कराच्या हिवाळ्यातील साठवणुकीच्या वस्तू पाठविल्या जाणार : सफरचंद उत्पादकांनाही होणार मोठा फायदा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, श्रीनगर
काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याने पहिल्यांदाच हिवाळ्यातील साठवणुकीसाठी (विंटर स्टॉक) म्हणजेच त्यांच्या सीमावर्ती भागातील चौक्यांसाठी हिवाळ्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी मालगाडीचा वापर सुरू केला आहे. आतापर्यंत हिवाळ्यातील साठवणुकीची प्रक्रिया फक्त रस्ते किंवा हवाई मार्गाने केली जात होती.
भारतीय सैन्याची ही विशेष मालगाडी केवळ सैन्याच्या गरजा पूर्ण करत नाही तर काश्मीरमधील अडचणीत असलेल्या सफरचंद उत्पादकांनाही दिलासा देणार आहे. भूस्खलन आणि पुरामुळे काश्मीरमधील सफरचंद उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता, या मालगाडीद्वारे काश्मीरमधील सफरचंद उत्पादकांनाही त्यांचे सफरचंद पाठवता येतील.
भारतीय सैन्याची पहिली विशेष मालगाडी 12-13 सप्टेंबर रोजी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंकवरून बीडी बारी ते अनंतनाग अशी धावली. या मालगाडीद्वारे 753 मेट्रिक टन आगाऊ हिवाळी साठवणूक साहित्य लष्कराच्या तुकड्या आणि तळांवर नेण्यात आल्यामुळे हिमवृष्टी होणाऱ्या व डोंगराळ भागात सैन्याच्या हिवाळ्याच्या तयारीत मोठा बदल झाला आहे.
परतीच्या प्रवासात सफरचंदांची वाहतूक
परतीच्यावेळी हीच मालगाडी काश्मिरी सफरचंदांसह देशाच्या इतर भागात पोहोचवणार आहे. या मालगाडीचे दुहेरी फायदे होणार असल्यामुळे सैन्याची तयारी मजबूत होईल आणि त्याचवेळी काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही थेट फायदा होईल. आता काश्मीरमधील शेतकरी आपला माल देशाच्या अन्य भागात मालवाहतूक रेल्वेमधून पाठवू शकतील. या मालगाडीद्वारे भारतीय सैन्याच्या 14 व्या कॉर्प्स आणि 15 व्या कॉर्प्समध्ये हिवाळी साठवणूक केली जात आहे. 14 व्या कॉर्प्स म्हणजे लडाखचा परिसर आणि 15 व्या कॉर्प्स म्हणजे काश्मीर. भारतीय सैन्याच्या एलओसी आणि एलएसीमध्ये अनेक चौक्या असून त्यांच्याशी हिवाळ्यामध्ये पूर्ण संपर्क तुटत असल्यामुळे सैनिकांसाठी आवश्यक अन्यधान्य व इतर वस्तूंचा साठा हिमवृष्टी होण्यापूर्वी करावा लागतो.
हिवाळी साठा कसा केला जातो?
सैन्याच्या काही चौक्यांमध्ये सुमारे 4-5 महिने आपत्कालीन परिस्थितीत केवळ हवाई मार्गाने संपर्क साधता येतो. अशा चौक्यांसाठी हिवाळा सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक वस्तूंचा हिवाळी साठा केला जातो. या भागात भारत आणि चीन दोन्हीकडून शेकडो सैनिक एलएसीवर तैनात आहेत. त्याचप्रमाणे, एलओसीवर भारतीय सैन्य देखील तैनात असल्यामुळे हिवाळी साठा करावा लागतो.