बसंत पंचमीसाठी प्रयागराजमध्ये खास सुविधा
2 ते 5 फेब्रुवारीपर्यंत विशेष नियमावली, प्रयागराजच्या 8 रेल्वेस्थानकांवर नवीन व्यवस्था, सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
वृत्तसंस्था/ प्रयागराज
महाकुंभमेळयामध्ये मौनी अमावस्येवेळी झालेली दुर्घटना लक्षात घेऊन उत्तर प्रदेश आणि प्रयागराज प्रशासनाने रविवार 2 फेब्रुवारी रोजी बसंत पंचमीच्या अमृत स्नानासाठी नवीन गाईडलाईन दिल्या आहेत. 2 ते 5 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालेल. या दरम्यान महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याच दरम्यान स्वतंत्र नियमावली जारी केली असून त्यांचे भाविकांनी शिस्तबद्धतेने पालन करावे आणि महाकुंभ सोहळ्याचा आनंद घ्यावा, दुर्घटना टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रयागराजच्या सर्व 8 ही रेल्वेस्थानकांवरुन भाविकांना संगमाकडे येण्याकरता खास सुविधा केल्याचेही सांगण्यात आले आहे.
उत्तर मध्य रेल्वेचे प्रशासन व प्रसिद्धी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी आणि भाविकांना येण्याजाण्यास सुलक्ष व्हावे, याकरता या सुविधा व नियमावलीची आखणी केली आहे. ज्या योगे भाविकांना आध्यात्मिक आनंद घेता यावा आणि संभाव्य दुर्घटना टाळली जावी, अशा सुविधा दिल्या आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठीही या योजना उपयुक्त ठरणार आहेत. रेल्वे स्थानकावर याकरता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. येथील आश्रय स्थळावरुनच संगमाकडे जाण्याची सुविधा दिली जाणार आहे. चोवीस तास ही सुविधा सुरु राहणार आहे. याच सुविधेच्या माध्यमातून भाविकांनी अमृतस्नानासाठी प्रस्थान ठेवावे. यासाठी केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.