अध्यात्मसाधना करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात
अध्याय सहावा
भगवंत म्हणाले, योगाभ्यास पूर्ण झालेला योगी मनावर ताबा मिळवून आत्म्याशी निगडित झालेला असतो. त्याची मन:शांती त्याला मोक्ष मिळवून देते आणि शेवटी तो माझ्यात येऊन मिसळतो, ह्या अर्थाचा असे आत्म्यास जोडूनि योगी आवरिला मने । मोक्षास भिडली शांति माझ्या ठाई चि मेळवी ।। 15 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार जागृत झालेली योग्याची कुंडलिनी शक्ती त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यामुळे ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्वस्थ होऊन ‘ते ब्रह्म मी आहे’ या भावनेने परब्रह्मरूपी लिंगाशी ऐक्य पावते. गगनी गगन लया जाये अशी जी काही स्थिती आहे, ती अनुभवाने प्राप्त होते. भगवंतांनी सांगितलेल्या अष्टांगयोगरूपी साधनाला ज्यानी त्यांचे शरीर अर्पण केले ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर त्यांच्याबरोबरचे होतात. जो हा अनुभव घेतो त्याला सर्व जग ब्रह्मव्याप्त असल्याची प्रचीती येत असल्याने त्याच्या दृष्टीने जगाचे अस्तित्व नाहीसे होते.
अर्जुनाने भगवंतांचे मनोगत मन लाऊन ऐकले आणि तो देवांना म्हणाला, देवा आपण सांगितलेल्या साधनाचा दृढनिश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात, हे मला समजले. योगाभ्यासाचे हे वर्णन नुसतं ऐकलं तरी चित्तात ज्ञान उत्पन्न होते तर मग अनुभवाने किती तल्लीनता होत असेल पण माझ्या दृष्टीने त्यात एक अडचण आहे. येथे एक लक्षात घेऊयात की, अर्जुन जेव्हा भगवंताना म्हणतो की, मला एक शंका आहे किंवा माझ्या दृष्टीने एक अडचण आहे तेव्हा ती अर्जुनाच्या मनातली शंका नसून आपल्यासारख्या सामान्य वाचकांच्या मनातली शंका असते. ती शंका बोलून दाखवताना अर्जुन म्हणाला, कृष्णा तू हा जो योग आता सांगितलास तो मला पटला, परंतु मला असं वाटतंय की, माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव आहे. त्यामुळे माझ्या अंगात जितकी योग्यता आहे, ती पुरेशी असेल तरच माझा अभ्यास सिद्धीला जाईल पण तसे होणार नसेल तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल ते कृपा करून सांग. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, अरे तू हे काय विचारतोस? अधिकाराशिवाय साधी साधी कर्मेसुद्धा करता येत नाहीत. ही तर सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. आता योग्यतेबाबत विचारशील तर ती प्राप्त करून घ्यायची गोष्ट आहे. ती मिळाल्यावरच जे करावे ते फलदायी होते पण योग्यता ही काही सहज बाजारात मिळणारी गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्न करायला नकोत का? परंतु मनुष्य ती मिळवण्याच्या कामी अत्यंत आळस करतो त्यामुळे योग्यता मिळवलेले पुरुष फार थोडे असतात ही बाब खरीच आहे. ह्यासाठी समोर दिसणाऱ्या वस्तूंची ओढ आवरून धरावी लागते. देहाच्या गरजा कमी कराव्या लागतात. हे लक्षात घेतलेस की, आवश्यक ती योग्यता तुलाही प्राप्त होईल. भगवंताचे हे बोलणे आपणही लक्षात ठेवण्यासारखे आहे. हे हवं, ते हवं असे म्हणत आपणही कित्येक अनावश्यक गोष्टी जमवत असतो. त्यासाठी आवश्यक असलेला पैसा मिळवण्यासाठी ढोरमेहनत करतो. त्या नादात मनुष्य जन्माला येऊन आत्मोद्धारासाठी जे करणे आवश्यक आहे तेच नेमके करायचे विसरतो. म्हणून भगवंत म्हणतात की अनावश्यक गरजा कमी करा म्हणजे, येतील कधीतरी उपयोगी म्हणून जमवलेल्या गोष्टीत जीव गुंतणार नाही. मग तोच जीव योगाभ्यासाच्या अनुष्ठानात आपोआपच गुंतत जाईल. देवांचा हा सल्ला आपण आवश्य लक्षात ठेवू.