For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहाव्या टप्प्यातील विशेष मतदारसंघ

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
सहाव्या टप्प्यातील विशेष मतदारसंघ
Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रकट प्रचार गुरुवारी संपला आहे. उद्या शनिवारी मतदान होणार आहे. या टप्प्यातील काही मतदारसंघ विशेष लक्ष ठेवावे असे आहेत. केवळ प्रभावी उमेदवारांच्या दृष्टीकोनातूनच नव्हे, तर या मतदारसंघांची काही इतर वैशिष्ट्योही आहेत. काही मतदारसंघांसंबंधी अशा समजुती आहेत, की तेथे जो पक्ष किंवा आघाडी विजयी होते, तोच पक्ष किंवा तीच आघाडी देशातही सरकार स्थापन करते. तसेच काही मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्याही वैशिष्ट्यापूर्ण आहेत. त्यांचा हा आढावा...

Advertisement

दिल्ली

  • या मतदारसंघात यंदा भारतीय जनता पक्षाने दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांची युती झाली असून युतीच्या जागावाटपात ही जागा आम आदमी पक्षाला मिळाली आहे. या पक्षाने सोमनाथ भारती यांना उतरविले आहे. हा मतदारसंघात अनेक वेळा भारतीय जनता पक्ष विजयी झालेला दिसून येतो.
  • हा मतदारसंघ जो पक्ष जिंकतो त्याची दिल्लीत सत्ता येते अशी एक समजूत गेल्या काही निवडणुकांपासून निर्माण झाली आहे. कारण 1996, 1998 आणि 1999 या तीन निवडणुकांमध्ये येथे भारतीय जनता पक्षाचे विजयकुमार मल्होत्रा निवडणून आले होते. या तीनही निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्ष प्रणित सरकार स्थापन झाले होते. तथापि, प्रथम दोन सरकारे अल्पायुषी ठरली होती.
  • त्यानंतर 2004 आणि 2009 या दोन्ही निवडणुकांमध्ये येथे काँग्रेसचे अजय माकन विजयी झाले होते आणि दोन्हीवेळा काँग्रेसप्रणित सरकारे स्थापन झाली होती. नंतर 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मीनाक्षी लेखी विजयी झाल्या होत्या आणि या पक्षाचे सरकारही झाले होते.

उत्तर प्रदेश

Advertisement

  • हा मतदारसंघ 1952 पासून अस्तित्वात आहे. 1977 पर्यंत तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1977 मध्ये तो प्रथम जनता पक्षाकडे गेला. त्यानंतर मात्र, तो आलटून पालटून भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आदी पक्षांकडे गेलेला दिसतो. 2014 आणि 2019 या सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये येथे भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळविल्याचे दिसून येते.
  • यंदा येथे भारतीय जनता पक्षाने मनेका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये याच मतदारसंघातून मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते. यंदा वरुण गांधी यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. गेल्या वेळी मनेका गांधी यांना येथे 19 हजार मतांचे निसटते आधिक्क्य मिळाले होते. तरीही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
  • या मतदारसंघात साधारणत: 17 लाख मतदार असून अन्य मागासवर्गीय मतदारांची संख्या मोठी आहे. मुस्लीमही बऱ्यापैकी संख्येने आहेत. येथे मनेका गांधी लोकप्रिय असून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव मानणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे दिसते. परिणामी निवडणूक चुरशीची होईल, असे अनुमान आहे. मात्र, यावेळी समाजवादी पक्षाची काँग्रेसशी युती आहे.

बिहार

हा मतदारसंघ परिसीमनानंतर 2009 मध्ये अस्तित्वात आला. या मतदारसंघातील ही चौथी निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाने आपले तीन वेळचे खासदार डॉ. संजय जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. महागठबंधनच्या युतीत ही जागा काँग्रेसला मिळाल्याने काँग्रेसने मदन मोहन तिवारी यांना तिकिट दिले आहे. तथापि, जयस्वाल यांचे पारडे जड असल्याचे तज्ञांचे मत आहे.

हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून सलग तीन वेळा जयस्वाल हेच निवडून आले आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्क्य वाढत गेलेले दिसते. 2009 मध्ये 47 हजार, 2014 मध्ये 1 लाख 10 हजार आणि 2019 मध्ये 2 लाख 93 हजार असे त्यांचे मताधिक्क्य आहे. यंदा ते सलग चौथ्यांदा खासदार होण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने यश शक्य आहे.

या मतदारसंघात साधारणत: 18 लाख मतदार असून अन्य मागासवर्गीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या समाजांची मते निर्णायक ठरतात. ब्राम्हण आणि सवर्ण मतेही त्याखालोखाल आहेत. या मतदारसंघाच्या काही भागांमध्ये मुस्लीमांचा प्रभाव दिसून येतो. तथापि, राजकीय तज्ञांच्या मतानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव येथे निर्णायक ठरणार, असे दिसून येत आहे.

झारखंड

  • 1952 पासून अस्तित्वात असणारा हा मतदारसंघ 1991 पासून एक अपवाद वगळता सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकला आहे. त्यामुळे तो या पक्षासाठी सुरक्षित मानण्यात येतो. भारतीय जनता पक्षाने 2019 च्या निवडणुकीतील खासदार संजय सेठ यांनाच उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने त्यांच्या विरोधात यशस्विनी सहाय नामक महिलेला मैदानात उतरविलेले आहे.
  • 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये येथे भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झालेला होता. 2014 मध्ये या पक्षाचे राम तहल चौधरी यांनी यश प्राप्त केले होते. यावेळी त्यांना वगळून सेठ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा शहरी मतदारसंघ असून अन्य मागासवर्गीयांची संख्या येथे मोठी आहे. मागच्या वेळी तो भारतीय जनता पक्षाने 2.83 लाखाच्या आधिक्क्याने जिंकला होता.
  • या मतदारसंघात मतदार संख्या साधारणत: 22 लाख इतकी आहे. हा मतदारसंघ जो पक्ष जिंकतो याची केंद्रात सत्ता येते, अशी समजूत याही मतदारसंघसंबंधी आहे. कारण 1996. 1998, 1999 या तीन्ही निवडणुकांमध्ये तो भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. तर 2004 आणि 2009 मध्ये तो काँग्रेसचे जिंकला होता. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पुन्हा तो सत्ताधाऱ्यांनी जिंकला.

हरियाणा

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. 1996 पासूनच्या सात लोकसभा निवडणुकांमध्ये येथे पाच वेळा भारतीय जनता पक्ष तर दोन वेळा काँग्रेसला यश मिळाले आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठ्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केला होता. यावेळी या पक्षाने उमेदवारामध्ये परिवर्तन केलेले आहे.

खट्टर यांच्या विरोधात काँग्रेसने दिव्यांशू बुद्धीराजा यांना उतरविले आहे. तर जननायक जनता पक्षाने देवेंद्र काडियान यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे लढत तिरंगी आहे. या मतदारसंघात अन्य मागासवर्गीयांचे प्राबल्य असून त्याखालोखाल जाट मतदार असल्याचे दिसून येते. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाने या राज्यात सर्व 10 जागांवर विजय मिळविला होता. यंदा तो टिकविण्याचे आव्हान आहे.

या मतदारसंघात साधारणत: 22 लाख मतदार आहेत. मागची निवडणूक भारतीय जनता पक्षाचे संजय भाटिया यांनी 70 टक्के मते आणि 6 लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने जिंकली होती. तरीही यावेळी या पक्षाने येथे उमेदवार नवा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा मतदारसंघ या पक्षासाठी सुरक्षित मानला जातो. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला असावा, असे मत तज्ञ व्यक्त करतात.

ईशान्य दिल्ली मतदारसंघ

  • येथे मागच्या वेळचे खासदार मनोज तिवारी यांनाच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. गेल्यावेळची उमेदवारी टिकवून धरलेले ते दिल्लीतील या पक्षाचे एकमेव नेते ठरले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने कन्हय्या कुमार यांना उतरविले आहे. हा मतदारसंघ परिसीमनानंतर परिवर्तीत झाला आहे. ही या मतदारसंघातील परिसीमनानंतरची तिसरी लोकसभा निवडणूक आहे.
  • मागच्या दोन निवडणुकांमध्ये येथून भारतीय जनता पक्षाचे मनोज तिवारी प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले होते. 2009 मध्ये ही जागा काँग्रेसचे जयप्रकाश अग्रवाल यांनी जिंकली होती. 2014 आणि 2019 मध्ये देशातील वातावरणातच मोठे परिवर्तन झाले होते. त्याचा परिणाम या मतदारसंघावरही झाला होता. या मतदारसंघात दलित मतांची संख्या लक्षात घेण्यासारखी असल्याचे दिसते.
  • या मतदारसंघातील मतदारांची संख्या साधारणत: 22 लाख इतकी आहे. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाचे मनोज तिवारी साडेतीन लाखांच्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. यंदा काँग्रेसने उमेदवार बदलला असला तरी मनोज तिवारी यांचे पारडे जड असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. आम आदमी पक्षाशी युती असली तरी येथे काँग्रेसचे संघटन प्रभावी नसल्याचे दिसते.

जौनपूर मतदारसंघ

  • हा मतदारसंघ 1952 पासून अस्तित्वात आहे. प्रथम तो काँग्रेसचा गढ होता. मात्र, 1962 मध्ये येथे भारतीय जनसंघाचे ब्रम्हजीत सिंग यांनी काँग्रेसला मात दिलेली होती. 1977 मध्ये तो जनता पक्षाने जिंकला. त्यानंतर मात्र, आलटून पालटून येथे भारतीय जनता पक्ष आणि अन्य पक्षांचे उमेदवार विजयी होत राहिलेले आहेत. 1977 पासून येथे काँग्रेसचा एकदाही विजय झालेला नाही.
  • यावेळी या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने कृपाशंकर सिंग या काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेल्या नेत्याला उमेदवारी दिली आहे. ही निवड आश्चर्यकारक मानली जाते. समाजवादी पक्षाकडून बाबू सिंग कुशवाह, तर बहुजन समाज पक्षाकडून श्यामसिंग यादव यांना उतरविण्यात आले आहे. तिहेरी लढतीत कृपाशंकर सिंग यांचा लाभ होण्याची शक्यता काही तज्ञ व्यक्त करतात.
  • या मतदारसंघात रजपूत, अन्य मागासवर्गीय, आणि मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मतदारसंख्या साधारण 20 लाख आहे. गेल्यावेळी येथे बहुजन समाज पक्षाचे श्यामसिंग यादव विजयी झाले होते. मात्र, यावेळी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यात युती नसल्याने त्यांची अडचण झालेली आहे

गोपालगंज मतदारसंघ

भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल यांच्यात युती झाल्याने हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षासाठी सोडला आहे. संयुक्त जनता दलाने येथे अलोक कुमार यांना उमेदवारी दिली असून महागठबंधनकडून ही जागा व्हीआयपी या नव्या पक्षासाठी सोडण्यात आली आहे. या पक्षाने येथे प्रेमनाथ चंचल यांना उमेदवारी दिली असून निवडणूक चुरशीची होणे शक्य आहे.

2014 मध्ये या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे जनकराम हे उमेदवार जवळपास पावणेतीन लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. तथापि, युतीच्या जागावाटपात ही जागा संयुक्त जनता दलासाठी सोडण्यात आली. 2019 मध्ये येथून अलोककुमार हेच निवडून आले होते. यंदा संयुक्त जनता दलाने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ कुमार यांच्यासाठी सोपा दिसून येतो.

हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. स्वाभाविकच येथे या समाजांची संख्या मोठी आहे. अलोक कुमार यांच्या प्रमाणेच प्रेमनाथ चंचल यांचाही जनसंपर्क मोठा असल्याने आणि त्यांना महागठबंधनचे पाठबळ असल्याने ते जोरदार लढत देण्याची तयारी करीत आहेत. या मतदारसंघात मतदार संख्या साधारणत: 17 लाख इतकी असून अन्य मागासवर्गीयांचे प्रमाणही मोठे आहे.

जमशेदपूर मतदारसंघ

  • रांची प्रमाणे हा देखील शहरी आणि औद्योगिक मतदारसंघ आहे. 1957 मध्ये तो अस्तित्वात आला आहे. येथे गेल्या नऊ लोकसभा निवडणुकांपैकी सहा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. त्यांच्यामध्ये 2014 आणि 2019 च्या निवडणुकांचाही समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने येथे बिद्युत बरण महातो यांना उमेदवारी दिली असून त्यांना यावेळी येथून हॅटट्रिकची अपेक्षा आहे.
  • त्यांच्या विरोधात झारखंड मुक्ती मोर्चाने समीर मोहंती यांना उतरविले आहे. निवडणूक यावेळी चुरशीची होईल असे तज्ञांचे मत आहे. गेल्यावेळी महातो यांचा 3 लाखांहून अधिक मतांनी विजय झाला होता. तर 2014 च्या निवडणुकीत ते 99 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांचा मतदारसंघात प्रभाव असल्याने त्यांना निवडणूक सोपी जाईल अशी शक्यता तज्ञांना वाटते.
  • तथापि, झारखंड मुक्ती मोर्चाचे मोहंती हे देखील प्रभावी नेते आहेत. त्यामुळे त्यांनी यावेळी जोर लावला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचार प्रकरणी झालेली अटक मोहंती यांना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघावर तज्ञांचे लक्ष आहे. या मतदारसंघातील वातावरणाचा प्रभाव आसपासच्या तीन चार मतदारसंघांवर पडतो, असा आजवरचा अनुभव आहे.

गुरगाव मतदारसंघ

  • भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात राव इंद्रजित सिंग या प्रभावी नेत्याला उमेदवारी दिली आहे. सिंग यांनी हा मतदारसंघ सलग तीनवेळा जिंकला आहे. मात्र, 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय मिळविला होता. नंतर 2014 च्या निवडणुकीच्या आधी ते भारतीय जनता पक्षात आले. त्यानंतर त्यांनी दोन्ही निवडणुका मोठ्या मताधिक्क्याने जिंकण्याचा विक्रम केला आहे.
  • यावेळीही त्यांच्यासाठी निवडणूक सोपी असल्याचे बोलले जाते. त्यांच्या या मतदारसंघावर व्यक्तीगत प्रभाव असल्याने ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्या जिंकण्याची शक्यता अधिक असते, असे दिसून आले आहे. हा मतदारसंघ 2009 च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आला आहे. यंदाची निवडणूक तेथील चौथी आहे. काँग्रेसने येथे यावेळी राज बब्बर या माजी चित्रपट अभिनेत्याला उतरविले आहे.
  • येथे मतदारसंख्या 23 लाखांच्या आसपास असून हा प्रामुख्याने शहरी आणि आद्योगिक मतदारसंघ आहे. मात्र, तो 20 टक्के इतक्या प्रमाणात ग्रामीण असल्याने मिश्र मतदारसंघ असेही त्याचे स्वरुप मानले जाते. जाट मतदारांची संख्या येथे लक्षणीय असली तरी अन्य मागासवर्गीय मतदाराही मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लीम मतदारांची संख्या कमी आहे. हा महत्वाचा मतदारसंघ मानला जातो.
Advertisement
Tags :

.