For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिमग्यातील 'शिरवळ्या' !!

12:45 PM Mar 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
शिमग्यातील  शिरवळ्या
Advertisement

सौ. मंगल नाईक - जोशी

Advertisement

'घरीदारी होळी, खाऊ पुरणपोळी' हे अवघ्या महाराष्ट्रासाठी लागू पडतं, हे बरोबरच! पण तळकोकणात विशेषत: सिंधुदुर्गातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीत मानानं मिरवणारं, काळ्या-पांढऱ्या धाग्यासारखं छान दिसणारं एक मिष्टान्न खास शिमगोत्सवात खवय्यांच्या पोटास ऊब देतं. या स्वादिष्ट पदार्थास 'शिरवळ्या' म्हणतात. सिंधुदुर्गातील होळी काही एक दिवसाची नाही. अनेक दिवस चालणाऱ्या या 'शिमगोत्सवात' शिरवळ्यांना आजही मानाचे स्थान आहे. शिरवळ्या बनविण्याचा व्याप मोठा, त्यामुळे कष्टही जास्त असतात. पण तो तयार झाल्यावर मात्र अपार समाधान आणि आनंदाचीच अनुभुती मिळते.शिरवळ्याची पाती खोबऱ्याच्या रसात घालून खवय्ये चमच्याने मटकावतात. खोबऱ्याच्या गोड रसात भिजलेल्या या चविष्ट शिरवळ्या खाणारा माणुस तृप्तीचेच ढेकर देतो.

शिरवळ्या हा तंतूसारखा दिसणारा एक नाजूक पदार्थ. त्यामुळे तो हळुवार हाताळावा लागतो. त्यांचा स्पर्श कोमल आहे, स्वभाव चिकट आहे, आकार लांबट आणि तंतूमय आहे, आणि जिभेसाठी तो रूचकर आणि स्वादिष्ट आहे. तांदूळ आणि नाचणीच्या पिठापासून शिरवळ्या बनविल्या जातात. सिंधुदुर्गातील शेतकरी प्रामुख्यानं तांदूळ, नाचणी पिकवतात. नारळ हे इथलं महत्त्वाचं बागायती पीक असून शिरवळ्यांसाठी या खाद्यपिकाचा वापर होतो. पण खरंच, शिरवळ्यांचा शोध लावणाऱ्याचं कौतुक करण्यास शब्दसुद्धा अपुरे पडतील!

Advertisement

शिरवळ्या बनविणे हे गृहिणींचे कलाकौशल्यच असते. शिरवळ्यांचा थाट मांडण्यासाठी आधी त्यांना उत्तम नियोजन करावं लागतं. सगळ्यात आधी तांदूळ किंवा नाचणी दळून बारीक पीठ, केळीची पानं, शिरवळ्या गाळणारा 'शेवगा' (संच) आणि हाताला दोन तीन माणसं सिद्ध ठेवावी लागतात. शेवगा लाकडी किंवा पितळी असतो. शिरवळ्या हा प्रकार भरपूर वेळ घेणारा आणि निगुतीनं करण्याजोगा खाद्यप्रकार आहे. दळून आणलेलं पीठ चाळून गरजेपुरतं एका मोठ्या खोलगट भांड्यात घेतलं जातं. त्यात चवीपुरतं मीठ टाकून उकळतं पाणी घालून कालथन्यानं आवश्यकतेनुसार भिजवलं जातं. त्यानंतर त्याचे लांबट गोळे बनवून ते पुन्हा उकळत्या पाण्यात टाकतात. याला ग्रामीण भागात 'मुटली' म्हणतात. पाण्यात उकळल्यावर काढून ते शेवग्याच्या सोऱ्यात टाकून लांब दोरासारख्या शिरवळ्यांची पाती केळीच्या पानावर घेतात.

या शिरवळ्या नुसत्या खाल्ल्या तरी रूचकर लागतात. पण रसात भिजवल्या तर त्यांची लज्जत अधिकच वाढते. रसासाठी नारळाच्या ओल्या खोबऱ्याचं त्यात जिरं टाकून वाटण केलं जातं. या वाटणाचं येईल तेवढं दूध काढलं जातं. या दूधात जितकं गोड हवंय तेवढा गुळ घातला जातो. वेलचीपूड, चवीनुसार मीठ आणि हळदपूड घालून छान एकजीव केल्यावर हा अवीट गोडीचा गंधीत रस तयार होतो. शिरवळ्या खाण्यास देण्याचीही पद्धत आहे. एका मोठ्या थाळीत केळीच्या छोट्याशा पानाच्या तुकड्यावर शिरवळ्यांची पाती ठेवतात. त्याच्या बाजूला मोठी वाटी/पातेले/वाडगे यापैकी काहीही ठेवून त्यात रस भरतात. थाळीत छोटा चमचा ठेवून अतिथी किवा खवय्यास खाण्यास देतात.

पूर्वी ज्या घरी शिरवळ्या असत, तिथे मोठा थाट आणि माणसांचाही लवाजमा असे. क्वचित शिरवळ्या बनत पण मोठ्या प्रमाणात बनत. त्यामुळे मदतीलाही माणसे लागत. घरचे, पै पाहुणे, शेजारीपाजारी सगळ्यांचाच यथेच्छ पाहुणचार होई. शेवग्याच्या सोऱ्यात 'मुटलं' टाकलं की वरून दाबावं लागतं. याला ताकद लागते. त्यामुळे शक्यतो घरातील पुरुषमंडळी हे काम करत. पूर्वी लाकडी शेवगा वापरीत. ज्याच्याकडे नसे तो शेजाऱ्याकडून आणून शिरवळ्या गाळत असे. पण या थाटात खाण्याच्या इच्छेपेक्षाही किंबहुना जास्त एक मौज होती. गावात तर अशा घरात त्यादिवशी 'अवाटच' गोळा होई. पण सगळ्यांना देण्यात त्या माऊलींना आनंद मिळायचा. ''कित्तीजणांच्या मुखास लागलं.." या एका भावनेनं त्या समाधानी होत. सिंधुदुर्गातील गावांमध्ये हे चित्र हमखास शिमगोत्सवात तर दिसत असे.

पण शिरवळ्या बनविण्यापासून ते खाण्यापर्यंतच्या प्रक्रियेत अनेकांना मायेनं सामावून घेणारी पिढी मागे गेली. त्यावेळेस शिरवळ्या हा गुपचूप आपलं आपण करून खाण्यासारखा पदार्थ नव्हता. त्याची वार्ता अवाटभर पसरे. म्हणूनच तो कुठल्याही घरात कधी कमी प्रमाणात झाला नाही. दुसरीकडे आजही शिरवळ्या बनतात. उलट पूर्वी केवळ शिमगोत्सव, गणपतीच्या दिवसात पंक्तीत दिसणाऱ्या शिरवळ्या आता कधीही लहर येईल तेव्हा बनतात. शेवग्याऐवजी चकलीच्या साच्यातून छोटी-छोटी पाती गाळतात. त्यांचा यथेच्छ आस्वाद घेतला जातो. पण या घराचं त्या घराला कळत म्हणून नाही!! तर, याही शिमगोत्सवात कोकणातील खवय्ये शिरवळ्यांना त्यांचा मान देणार.. एकदा तरी घरात 'शिरवळ्या' गाळणार!!

Advertisement
Tags :

.