For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

"सोळावं वरीस धोक्याचं", गोंधळलेल्या स्थितीत स्वभान हवे

03:27 PM Apr 09, 2026 IST | अनुजा कुडतरकर
 सोळावं वरीस धोक्याचं   गोंधळलेल्या स्थितीत स्वभान हवे
Advertisement

अवंतिका ठाकरे यांचा खास लेख

Advertisement

- सावंतवाडी

"सोळावं वरीस धोक्याचं", हे 'सवाल माझा ऐका' या चित्रपटातील जगदीश खेबुडकर लिखित वसंत पवार यांचे सुमधुर संगीत व सुलोचनाताई चव्हाण यांनी गायलेलं गीत ऐकण्याची संधी मिळाली, त्याच वेळी मला आजच्या आमच्या पिढीच्या वेगळ्या तळमळीची तसेच तगमगीची जाणीव झाली.मी २२ वर्षांची. २२ व्या वर्षीचं आयुष्य म्हणजे एक गोंधळलेलं परंतु सुंदर चक्रव्यूह आहे. या वयात आम्ही सर्व काहीतरी करत आहोत. कुणी नोकरी करत आहे, कुणाचं मास्टर्स सुरू आहे, कुणी लग्नाच्या तयारीत आहे.मी सुद्धा मास्टर्स करत आहे पण हे सर्व सुरू असतांना, मी मात्र स्वतःला रोज एकच प्रश्न विचारते - "माझं खरं चाललंय तरी काय?"

Advertisement

आमच्या पिढीची बातच काही और आहे. एकीकडे तंत्रज्ञानाची प्रगती, सम्पूर्ण विश्वाचे जवळ येणे, संचार माध्यमांची भरमार व त्यातच मोठेपण मिळवलेला सोशल मीडिया. जशा नोकरी - व्यवसायाच्या संधी, अभ्यासाच्या संधी आमच्यापुढे जागतिक स्तरावर उपलब्ध आहेत, त्याच वेळी समाज माध्यमांचा भडीमार सुद्धा त्याच्या महत्त्वासह आम्ही जपत आहोत. नाही म्हटलं तरी, थोडी गोंधळलेली स्थितीच आहे.

कधी वाटतं आम्ही खूप मागे आहोत. कधी वाटतं आमचं बरोबर चाललंय. कधी वाटतं आम्ही चुकीच्या रस्त्यावर चालतोय. सतत स्वतःला सिद्ध करायची धडपड. लोकभावनेचे दडपण. लोकं काय म्हणतील ? इकडं सोशल मीडियावर "योग्य" दिसणं. आणि या सगळ्यात आमच्यातील खरा "मी" कुठेतरी हरवत चालला, असे वाटते. कदाचित या गोंधळलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत की नाही, हे समजणे अवघड आहे. पण, थोड्याथोडक्या कारणास्तव जेंव्हा तरुणाई आत्महत्येसारखा पर्याय निवडते त्यावेळी मन हेलावून जातं."वाचन संस्कृती पासून दूर गेली", असा आरोप असणारी पिढी आवडते ते वाचते - शिकवेल ते वाचते- समजेल ते वाचते, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल. याच काळात माझ्याही वाचनात एक पुस्तक आलं - The Subtle Art of Not Giving...".हे पुस्तक म्हणजे माझ्यासारख्या तरुणाईला दाखवलेला 'आरसा' आहे. या पुस्तकाच्या शब्दांनी मला अंतर्मुख व्हायला भाग पाडलं.हा लेख म्हणजे त्या बदललेल्या दृष्टिकोनाची एक पायरी आहे. जिथे मी 'परफेक्ट' होणं सोडलं आणि 'पिसफुल' होणं स्वीकारलं. जिथे मी सर्वांचे मन जिंकणं थांबवलं आणि स्वतःला जिंकणं ठरवलं. आणि जिथे 'सगळंच मिळविणे' थांबवून जे आहे त्यातच समाधानी राहून, पुढे जाण्याची सुरुवात केली.

मित्रांनो, आपल्या तरुणाईला आनंदी जगणं शिकवणारे १० मार्गदर्शक तत्वे आपणाशी 'शेअर' करू इच्छिते. हे विचार, ही शिकवण, निव्वळ वरील पुस्तकातून नाही तर माझ्या आतल्या गोंधळातून, त्यातून आलेल्या अनुभवातून उमजले आहेत. ते विचार मुद्द्यासह पुढील प्रमाणे आहेत....

१. सगळं महत्त्वाचं वाटतं पण तसं नसतं :-
मित्रांनो, आपण इतक्या गोष्टी मनाला लावून घेतो की थोडी जरी कुणी टीका केली (ती अयोग्य असू शकते), आपली काहीही चूक नसतांना कुणी काही बोलले, अथवा कुणी मेसेज बघितला आणि साधा रिप्लाय दिला नाही. अशा सगळ्या लहानसहान गोष्टींना महत्त्व देऊन आपण आपला ताण (टेन्शन) वाढवतो. आपली सगळी ऊर्जा, या अशाच गोष्टीमध्ये नेहमी खर्च करतो. पण, यात आपलं काहीच भले होत नाही.
म्हणूनच स्वतःला विचारा की, मी हा सर्व ताण घेते खरे, पण खरंच यातून मला काही मिळते ? जर उत्तर नकारार्थी असेल तर लगेच निर्णय घ्या - "जे माझ्या आयुष्याशी अर्थपूर्ण जोडलेलं नसेल तिथे मी माझं मन आणि वेळ दोन्हीही खर्च करणार नाही."

२. स्वतःला दुय्यम लेखणे :-

मित्रांनो, आपण नेहमीच (स्वार्थ बुद्धीने नव्हे) स्वतःबद्दल विचार करणे सोडून दुसऱ्याच्या मनाचा विचार करतो. सर्वांना "नाही" म्हणणे कठीण जाते. त्रास होत असला तरी व्यक्त व्हायचे नाही. "इट्स ओके" म्हणायचं आणि पुढे जायचं. काही वेळानंतर असा क्षण येतो की, आपणच स्वतःला ओळखेनासे होतो. आपले मत, भावना, इच्छा आकांक्षा कुठेच उरत नाहीत.

जी गोष्ट आपल्याला पटत नाही, जे आपल्याला करावेसे वाटत नाही, जे आपल्यासाठी योग्य नाही, त्यास "नाही" म्हणायला शिकलं पाहिजे. मित्रांना किंवा इतरांना बरे वाटते, मग मला कितीही सहन करावे लागले तरी चालेल, माझ्या मनाला त्रास झाला तरी चालेल असे "पीपल प्लिझिंग" वागणे बंद करावयास हवे. "नाही" म्हणणे सुरुवातीला खूप विचित्र वाटतं, समोरची व्यक्ती दुखावेल असे वाटतं, पण मग आतून खूप मोकळं झाल्यासारखं वाटायला लागतं.

३. स्वतःला दोष देणे :-

बरेचदा आपण चुकलो, असे आपणास वाटते. आपण आपले दुःखही लपून ठेवतो, कारण ते व्यक्त केलं तर समाज, मित्र-मैत्रिणी आपल्याला 'विक' म्हणतील, अशी भीती वाटते. परंतु, स्वतःच्या भावना व्यक्त करणे आणि स्वतःच मत व्यक्त करणे, ही दुर्बलता नसून स्वतःची स्वतःसाठी जबाबदारी आहे. म्हणूनच वेदनांना मोकळं करणं हा सुद्धा मोठा 'सेल्फ रिस्पेक्ट'आहे.

४. सर्वसामान्य असणे म्हणजे अपयश नव्हे :

आपण 'स्वत्व' सोडून इतरांसारखे व्हायला जातो. मार्क्स, दिसणे, वागणे यातून सुरू झालेली शर्यत इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत ? किती लाईकस् आहेत ? किंवा लोकांना मी किती आवडते ? यावरून आपण आपल्या योग्यतेचे मोजमाप करतो. परंतु हे सर्व करत असतांना मी मनापासून खुष आहे का ? मी याबाबतीत मनातून स्वतःशी खरं वागते का ?हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. म्हणूनच ज्या दिवशी इतरांसाठी जगण्याचे थांबवून, स्वतःवर प्रेम करायला लागाल, स्वतःवर परिश्रम घ्यायला लागाल, आपल्यात सकारात्मक बदल कराल, त्या दिवशी तुमचं जीवन परिवर्तन होईल. 'खास' बनण्यासाठी काहीतरी 'खास' करायचं हाच मोठा दबाव असतो. पण सगळेच 'खास' असतील तर सामान्य कोण ? मला असं वाटतं की साध्या-सोप्या गोष्टीत सुद्धा आनंद शोधणे, हेच खूप 'खास' आहे. स्वतःत लहान-मोठे चांगले बदल घडवून आणणे हे सुद्धा 'खास' आहे. म्हणूनच खास होण्याच्या शर्यतीत धावण्यापेक्षा सामान्यपणे 'खास' होणे महत्त्वाचे आहे.

५. आपण अमर नाही :

"आपण अमर नाही", हे सत्य आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे. जगण्याचा वेळ मर्यादित आहे. मग असा वेळ आपण इतरांचा विचार करत, ते काही म्हणतील, याबाबतीत चिंता करीत का वाया घालवावे ? हे जेव्हा आपल्या लक्षात येईल त्यावेळी आपण अनावश्यक गोष्टींवर कमी वेळ देऊ व आपले आयुष्य जास्तीत जास्त भरभरून जगू शकू. आपल्या आवडीच्या गोष्टी आपण पूर्ण करू शकू. समाजासाठी काहीतरी भरीव करू शकू. त्यामुळे मर्यादित जीवन लक्षात ठेवून किंवा आपण अमर नाहीत हे सत्य ध्यानात घेऊन आपले वागणे बदलले तर निश्चितच आपला प्रवास सुख समाधानाच्या दिशेने सुरू होतो.

६. कधी कधी निर्णय घेणे हाच एक निर्णय असतो :-
आपण नेहमी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. परंतु कधीतरी आयुष्य एखादा असा झटका देते की आपल्या लक्षात येतं, 'आपण जेवढं नियोजन करतो, तेवढंच आयुष्यात उलट होत जातं'. तेव्हा आपण ठरवले पाहिजे की, आयुष्याच्या प्रवाहानुसार चालायचे, फार निर्णय घेत बसायचे नाही, फार दूरचे ठरवायचे सुद्धा नाही. कुठलीही गोष्ट आधीपासून न ठरवता लोकं जेव्हा विचारतील, "पुढचं काय ?" तेव्हा म्हणायचं, "तेव्हाचं तेव्हा बघू". कधी कधी सगळ्या गोष्टी ठरवणं निर्णय घेणे गरजेचं नसतं. आपण थोडा वेळ दिल्यास, काही गोष्टी स्वतःहून उलगडतात . त्यामुळे अपेक्षांचे ओझे जरा कमी होते, स्वतःच्या व आपल्याकडून इतरांच्या.

७. समर्पणाच्या बांधिलकीतूनच स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमलतो :-
आपण नेहमी पर्याय शोधतो. "पर्याय ठेवा, म्हणजे काही गमावण्याची भीती नाही", अशी आपली विचारसरणी असते. आपल्याला नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात, पण बरेचदा कुठलीही गोष्ट आपण पूर्ण करत नाही, त्यात प्राविण्य मिळविण्यापूर्वीच 'क्विट' करतो. कधी चित्रकला, कधी मेहंदी, कधी नृत्य,कधी कॉम्प्युटर कोर्स, कधी क्रिकेट, कधी बॅडमिंटन, कधी टायपिंग, या व अशा अनेक गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करतो, पण त्या कधीच पूर्ण शिकत नाही, त्यात प्राविण्य मिळवत नाही. आपण यात बदल करणे आवश्यक आहे, एका गोष्टीशी पूर्ण बांधिलकी ठेवली तरच ती आपण पूर्ण करू शकतो, त्यात प्राविण्य मिळवू शकतो, ज्यामुळे आपलं मन देखील सामर्थ्यवान होतं. या पुस्तकातही वाचलं कमिटमेंट ब्रिंग्स क्लॅरिटी. ईट सेट्स यु फ्री - Commitment brings clarity. It sets you free.

८. "मला सगळं समजतं", हाच मोठा अडथळा असतो :-

अनेकदा आपल्याला असं वाटतं की, "मला सगळंच समजतं" आणि "माझंच बरोबर आहे". बऱ्याच बाबतीमध्ये आपण हा हेका धरतो आणि त्यामुळे आपलं बरंच नुकसान होतं. आपल्या सवंगड्यांशिवाय आपल्यापेक्षा जेष्ठ, अनुभवी व त्या त्या विषयातील तज्ञांचं ऐकणं जास्त महत्त्वाचं असतं. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधने देखील अत्यंत महत्त्वाचं असतं करण तेच आपले खरे हितचिंतक असतात.
जर आपण "मलाच सगळं समजतं", या भावनेत राहिलो तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास ,
आत्मविकास कधीच होऊ शकणार नाही. म्हणून माझं ठाम मत आहे की, "मला सगळं समजतं" हेच खरे आपल्या यशातील पहिला अडथळा आहे.

९. दुःख व्यक्त करायला शिका :-

आपल्या सर्वांना एक वाईट सवय असते, ती म्हणजे, 'नेहमी दुःख मनात लपवून ठेवणे'. आपला असा समज असतो की, मनात गोष्टी दाबून ठेवल्या तर आपण हळूहळू विसरून जाऊ. पण असं कधीच होत नसतं. आपण स्वतःच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत-करत स्वतःला कुठेतरी हरवतो. मग हळूहळू आपल्याला जाणीव होते की ज्यांच्यामुळे आपण दुःखी आहोत, ते तर आनंदाने जगत आहे. आपण मात्र त्रासात आहोत, कुढत बसलेलो आहोत.
आपण मन मोकळं करायला शिकायला हवं. नेहमी एक प्रयत्न आपण केलाच पाहिजे की, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला दुःख होतेय, त्या व्यक्तीला त्रास न होता, आपण आपलं मत त्याच्यासमोर व्यक्त करायला शिकाले पाहिजे. आपल्या आयुष्यात अनेक दुःख असतात, आपण नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण अजूनही दुःखात जगतो. जर आपण आपले दुःख स्वीकारले व अत्यंत जवळच्या व्यक्तीकडे किंवा कुटुंबियांकडे व्यक्त केले तर आपण आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो. दुःखातून, चिंतेतून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो.

१०. सतत आनंद शोधण्याच्या नादात खरं समाधान हातातून निसटतं :-
आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात असं होतं की, पहिले वाटतं की दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले की आयुष्य चांगलं. मग बारावीतील चांगले मार्क्स, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन, चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की असं वाटतं की, " व्वा, आता मी सेट झालो आणि समाधानी सुद्धा". पण, मनुष्यवृत्ती आहे, "जे आहे त्यात आपण कधीच समाधानी राहू शकत नाही". एक मिळाले की दुसरं आणि दुसरं मिळालं की तिसरं. यामुळे असे होते की सतत आनंद शोधता शोधता आपण कधीच समाधान प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण आतून समाधान बाळगतो, तेव्हा जीवनाचा खरा आनंद प्राप्त होतो, आणि हे एकमेव सत्य आहे.

आपल्यासमोर व्यक्त केलेल्या वरील 10 बाबी पुस्तकात नव्हत्या. या माझ्या मनात, माझ्या थोड्याथोडक्या अनुभवात व माझ्या विविध प्रश्नांमध्ये होत्या. The Subtle Art of Not Giving.... हे पुस्तक म्हणजे एक आरसा होता, आत्मचिंतानाचा. पण ते विचार माझ्या आत आधीपासूनच होते. मला फक्त ते शब्द, ती व्यक्त व्हायची जागा आणि स्वतःच्या मनाला ऐकण्याची, समजण्याची उर्मी हवी होती. माझ्या आयुष्याची सुरुवात आहे, मी अजूनही परिपूर्ण नाही पण आता मी परिपूर्ण होण्याची स्वतःला जबरदस्ती देखील करत नाही. मी अजूनही शिकते, चुकते आणि शोधते. आता मला घाई नाही कारण मी शिकले आहे, "सगळं समजणं आवश्यक नाही, सगळं ज्ञान असणे आवश्यक नाही, पण स्वतःशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे." माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना आवाहन आहे की स्वतःशी, कुटुंबियांशी व अपेक्षित श्रमाशी प्रामाणिक राहा, बाकी सबकुछ ठीक हो जायेगा !!

Advertisement
Tags :

.