For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘राजकीय रॅलीं’चा धडका सुरू

06:20 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘राजकीय रॅलीं’चा धडका सुरू
Advertisement

काँग्रेसच्या ‘भारत जोडो-2’ला प्रारंभ : भाजपकडून आज ‘विजय संकल्प’ला चालना

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

राज्यात काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी राजकीय रॅलींचा धडाका सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाने बुधवारी ‘भारत जोडो-2’ पदयात्रा सुरू केली, तर भाजपने गुरुवारपासून ‘सेवा संकल्प-विजय संकल्प’ यात्रा आयोजित केली आहे. आगामी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत तसेच विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून दोन्ही पक्षांनी मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे.

Advertisement

पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप बूथ स्तरावर आपली पक्षसंघटना मजबूत करण्याचा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने बुधवारी शिमोगा जिल्ह्याच्या शिकारीपूर येथे ‘भारत जोडो-2’ची सुरुवात केली. विशेष म्हणजे, शिकारीपूर हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचा मतदारसंघ आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू केली होती. ही यात्रा 30 सप्टेंबर 2022 रोजी गुंड्लुपेठमार्गे कर्नाटकात दाखल झाली होती. त्या घटनेची आठवण म्हणून राज्य काँग्रेसने आता ‘भारत जोडो-2’ सुरू केली आहे.

ही पदयात्रा 29 जिल्ह्यांमध्ये आयोजित केली आहे. गुरुवारी शिकारीपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत मंत्री यतींद्र सिद्धरामया, बसवंतप्पा आणि मधू बंगारप्पा यांच्यासह अनेक नेते, तसेच काँग्रेसचे सर्व आमदार आणि शिमोगा जिल्ह्यातील नेते सहभागी झाले. ही 84 विधानसभा मतदारसंघांतून मार्गस्थ होणार असून, प्रत्येक मतदारसंघात 10 कि. मी. मार्गक्रमण होणार आहे. तसेच दररोज आणि जाहीर सभा आयोजित केली जाईल, असे हरिप्रसाद यांनी सांगितले.

केंद्राच्या योजना भाजप घरोघरी पोहोचविणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या समर्पित जनसेवेचा टप्पा पूर्ण झाल्यानिमित्त, राज्य भाजप गुरुवारपासून सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘सेवा संकल्प’ अभियान सुरू करत आहे. याच्या माध्यमातून राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष कार्यकर्त्यांना सक्रिय केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आणि राज्य सरकारच्या अपयशाबाबत जनजागृती करणे हा ‘विजय संकल्प’ यात्रेचा उद्देश आहे.

रक्तदान, संवाद कार्यक्रम

कोलार जिल्ह्यातील करडुमले येथील गणेश मंदिरातून या यात्रेचा शुभारंभ करणार आहे. राज्य सरकारचे अपयश, भ्रष्टाचार, शेतकरी, गरीब आणि महिलांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष याबद्दल जनतेला माहिती देण्यासाठी आणि बूथ स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपने विजय संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच शेतकरी, महिला आणि कामगारांशी संवाद आयोजित केले जातील. या ‘सेवा संकल्प विजय यात्रे’त भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी व व्ही. सोमण्णा यांच्यासह पक्षाचे नेते, आमदार आणि खासदारांचा समावेश असेल.

Advertisement
Tags :

.