निमित्त कन्नड सक्तीविरोधी आंदोलनाचे : बाळसे नव्या उमेदीचे
परवानगी नाकारली तरी मराठी मनात मिळविले स्थान : म. ए. समितीच्या लढ्याला नवी दिशा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा झंझावात रोखण्यासाठी प्रशासनाने महामोर्चाला परवानगी तर नाकारली, परंतु मागील दहा दिवसांमध्ये शहरात गल्लोगल्ली झालेल्या जागृतीमुळे मराठी भाषिकांमध्ये नवी उमेद जागी झाली. केवळ निवडणुका आल्या की म. ए. समिती जागृत होते, असे बोलणाऱ्यांना ही एक चपराक आहे. कन्नड सक्तीविरोधी मोर्चासाठी शहरासह ग्रामीण भागात मिळालेले बळ आता म. ए. समितीला टिकवून ठेवून भगवा झेंडा पुन्हा डौलाने मिरवायची संधी चालून आली आहे.
मध्यंतरी मरगळलेल्या लढ्याला आता पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. ज्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षेला भेदणेही अशक्य आहे अशा गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात जाऊन सुरक्षा यंत्रणेला भेदून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्याने हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर चर्चिला गेला. यामुळे म. ए. समितीला किती फायदा झाला हा भाग वेगळा असला तरी सीमाप्रश्नाची चळवळ आजही तितक्याच त्वेषाने जिवंत आहे हे महाराष्ट्रासह दिल्ली सरकारलाही दिसून आले.
महामोर्चाच्या निमित्ताने म. ए. समितीने पहिल्यांदाच गल्लोगल्ली जागृती फेरी काढली. यापूर्वी केवळ निवडणुकांच्या कालावधीतच गल्लोगल्ली प्रचार केला जात होता. म. ए. समितीची ज्या मूळ 17 गल्ल्यांवर भिस्त होती त्या गल्ल्यांमध्ये महामोर्चाची जोरदार जागृती झाली. यामुळे म. ए. समिती लढ्यात सक्रिय असल्याचे सर्वसामान्य नागरिकांना दिसून आले. राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला असलेले कार्यकर्तेही आपसूकच यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेसाठी एकत्र येऊ लागले.
प्रशासनाकडून मोर्चाला आडकाठी घालत परवानगी नाकारण्यात आली. परंतु मराठी भाषिकांच्या मनामनात रूजवलेले भाषिक अस्मितेचे बीज लढ्याच्या पुढील दिशेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाचा दबाव असतानाही शेकडोंच्या संख्येने मराठी भाषिकांची उपस्थिती होती. जर मोर्चाला परवानगी दिली असती तर हजारोंचा जनसमुदाय रस्त्यांवर दिसला असता. जागृतीमुळे म. ए. समिती पुन्हा ग्रामीण भागात सक्रिय झाल्याचे दिसून आले.
पुढील दिशेला नक्कीच फायदा होणार
कोणतीही आर्थिक महासत्ता पाठीशी नसतानाही राष्ट्रीय पक्षांच्या तोडीस तोड म. ए. समितीचा भाषेचा लढा सुरू आहे. आता मिळालेल्या यशाचा लढ्याच्या पुढील दिशेला नक्कीच फायदा होणार आहे. व्यापारी, विक्रेते, उद्योsजक यांना कन्नड सक्तीच्या झालेल्या त्रासामुळे ते स्वत: पुढे येऊ शकले नसले तरी म. ए. समितीच्या पाठीशी असल्याचे मोर्चातून दिसून आले. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर म. ए. समितीने भर दिल्यास पुन्हा नव्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यास वेळ लागणार नाही.