For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेनचा धमाका, 16 वर्षांनंतर जगज्जेते

06:58 AM Jul 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्पेनचा धमाका  16 वर्षांनंतर जगज्जेते
Advertisement

अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर 1-0 ने मात, अतिरिक्त वेळेत फेरान टोरेसकडून गोल

Advertisement

वृत्तसंस्था, ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा खेळ इतका जबरदस्त झाला की, खुद्द लायोनेल मेस्सीकडेही त्यांच्या खेळावर काहीच तोड नव्हता. सामना संपला तेव्हा स्पेनने विजेतेपदाचा चषक उंचावला, तर मेस्सीवर आपले अश्रू आवरत मैदानाबाहेर पडण्याचा प्रसंग ओढवला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात फेरान टोरेसने केलेल्या गोलमुळे स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव केला आणि दुसऱ्यांदा फुटबॉल विश्वाच्या शिखरावर झेप घेतली.

निर्धारित वेळेच्या अखेरीस अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसला धोकादायक पद्धतीने खेळाडूला रोखल्याबद्दल रेड कार्ड देऊन मैदानाबाहेर पाठवण्यात आले आणि अर्जेंटिनाचा संघ 10 खेळाडूंवर आला. त्यावेळी तणाव निर्माण झाला होता. सामना संपल्याची शिट्टी वाजल्यानंतरही पुन्हा तणाव वाढला. यावेळी अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लायेनेल स्कालोनीं हस्तक्षेप करताना आणि दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसले.

Advertisement

अखेरीस स्पेनने मेस्सीला सलग दुसरे विजेतेपद मिळवण्यापासून रोखले. मेस्सीने हा आपला शेवटचा विश्वचषक असल्याचे संकेत दिले होते. सामन्याच्या उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या टोरेसने पेनल्टी बॉक्समध्ये उसळी घेतलेल्या चेंडूवर झेप घेतली आणि 106 व्या मिनिटाला डाव्या पायाने ‘क्रॉसबार’च्या अगदी खालच्या बाजूने चेंडू फटकावत गोल केला. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवणारी स्पेनची अभेद्य बचावफळी पुन्हा एकदा यशस्वी ठरली.

आम्ही सामना हरलो आणि आम्ही ते मान्य करतो, असे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक स्कालोनी म्हणाले. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही आतापर्यंत केलेल्या कामगिरीला विसरून जाऊ. त्यामुळे मी माझे सहकारी, माझे खेळाडू आणि देशाचे आभार मानू इच्छितो. मी त्यांना एवढेच सांगू शकतो की, आम्ही पूर्ण जिद्दीने आणि मनापासून खेळलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

स्पेनने अखेरच्या क्षणी आलेले आव्हानही परतवून लावले. सामना संपण्याच्या शिट्टीला अवघी चार मिनिटे बाकी असताना मेस्सीने कॉर्नर किक घेतली. चेंडू उसळी घेऊन बदली खेळाडू ज्युलियानो सिमियोनकडे गेला, पण त्याने तो ‘क्रॉसबार’च्या वरून बाहेर मारला आणि त्यानंतर अविश्वासाने डोक्यावर हात ठेवला.

सामन्यानंतर झालेल्या बाचाबाचीनंतर स्पेनच्या संघाने माजी विजेत्यांचा (अर्जेंटिनाचा) सन्मानही केला. उपविजेतेपदाची पदके स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे जाणाऱ्या अर्जेंटिनाच्या संघासाठी स्पेनच्या खेळाडूंनी एका प्रकारची सन्मानार्थ रांग तयार केली, ज्यातून अर्जेंटिनाचे खेळाडू चालत गेले. ही पदके राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

सामन्याच्या उत्तरार्धातील स्टॉपेज टाईममध्ये फर्नांडेझला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले आणि अर्जेंटिनाला एका खेळाडूच्या कमतरतेसह सामना पूर्ण करावा लागला. एका धडकेमुळे स्पेनचा बचावपटू पाऊ कुबारसी हवेत गिरकी घेत खाली पडला. या घटनेसाठी फर्नांडेझला दोषी ठरवून त्वरित कार्ड दाखवण्यात आले.

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आणि 48 संघांचा समावेश असलेल्या या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या विश्वचषक स्पर्धेतील हा 104 वा आणि अंतिम सामना होता. मागील कोणत्याही विश्वचषकापेक्षा यात सामन्यांची संख्या अधिक असल्याने इतर सर्व आवृत्त्यांच्या तुलनेत यात सर्वाधिक गोल झाले यात काहीच नवल नव्हते. एकूण 300 हून अधिक गोल नोंदविले गेले. मात्र स्पेनचा सहभाग असलेल्या सामन्यांमध्ये चित्र वेगळे होते. स्पेनची रणनीती साधी आणि अचूक होती. जास्तीत जास्त वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवायचा आणि प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्याची कोणतीही संधी मिळू द्यायची नाही, अशी पद्धत त्यांनी वापरली.

स्पेनची ऐतिहासिक कामगिरी

हे विजेतेपद आणि 2023 मध्ये स्पेनने जिंकलेला महिलांचा विश्वचषक यामुळे पुऊष आणि महिला अशा दोन्ही गटांतील जगज्जेतेपदे एकाच वेळी आपल्या नावावर करणारा तो पहिला युरोपियन देश ठरला आहे. माद्रिदच्या रस्त्यांवर असंख्य लोक बाहेर पडले आणि त्यांनी रविवारी मिळवलेला हा विजय सोमवारी पहाटेपर्यंत साजरा केला. गोलफरकावरून हा सामना अटीतटीचा वाटत असला, तरी प्रत्यक्षात एकाच संघाचे वर्चस्व होते. ‘खरे सांगायचे, तर मला अभिमान वाटतो’, असे स्पेनचे प्रशिक्षक लुईस दे ला फुएन्ते म्हणाले. 65 व्या वर्षी विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचे नेतृत्व करणारे ते आता सर्वांत वयस्कर प्रशिक्षक ठरले आहेत.

अर्जेंटिनाच्या गोलरक्षकामुळे वाचले अनेक गोल

अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ याने गोल करण्याचे 12 प्रयत्न विफल ठरविले. हा विश्वचषक अंतिम सामन्यातील एक विक्रम ठरला आणि त्यामुळेच 2022 च्या विजेत्यांना सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची आशा जिवंत ठेवता आली. ‘दिबूची कामगिरी विलक्षण होती’, असे द ला फुएन्ते’ यांनी अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाचा उल्लेख त्याच्या टोपणनावाने करताना म्हटले.

सलग 38 सामन्यांत स्पेन अपराजित

स्पेनचा संघ आता सलग 38 सामन्यांत (29 विजय, 9 बरोबरी) अपराजित राहिला आहे. युरोपमधील कोणत्याही पुऊष संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. याआधी इटलीने ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर, 2021 या काळात 37 सामन्यांत (28 विजय, 9 बरोबरी) अपराजित राहण्याचा विक्रम केला होता, जो स्पेनने मोडीत काढला.

स्पेनला रोखणे मेस्सीलाही जमले नाही

सामन्यात गोल करण्याच्या पहिल्या 20 संधी स्पेनने निर्माण केल्या, त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी धडपडणाऱ्या अर्जेंटिनाला अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात आपला पहिला प्रयत्न करता आला. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळात स्पेनला कोणीही हरवू शकलेले नाही. खुद्द मेस्सीलाही ते जमले नाही. या स्पर्धेत सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारून विजय मिळवण्याचे कौशल्य दाखविलेल्या अर्जेंटिनाच्या संघाकडे यावेळी मात्र कोणतेही उत्तर नव्हते.

आमचे यश आमच्याच कामगिरीवर अवलंबून होते. आम्ही नेहमीच आमच्या शैलीतील फुटबॉल खेळतो आणि तेच आम्ही पुन्हा एकदा करून दाखवले

- फेरान टोरेस, स्पेन

Advertisement
Tags :

.