स्पेनच्या नदालचे विजयाने पुनरागमन
वृत्तसंस्था/ रोम
येथे सुरु झालेल्या एटीपी टूरवरील इटालीयन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू 37 वर्षीय राफेल नदालने शानदार विजयाने आपले पुनरागमन केले आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या नदालने या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात बेल्जियमच्या बर्गजचा पराभव केला. महिलांच्या विभागात स्वायटेक, गॉफ यांनी विजयी सलामी दिली.
या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात राफेल नदालने बेल्जियमच्या बर्गजचा 4-6, 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. नदालची त्याच्या टेनिस कारकीर्दीतील कदाचीत ही शेवटची स्पर्धा असल्याने त्याचा खेळ पाहण्यासाठी टेनिस शौकिनांनी खूपच गर्दी केली होती. 2024 च्या टेनिस हंगामामध्ये वारंवार दुखापतीमुळे नदालला अनेक स्पर्धा हुकल्या आहेत. नदालचा या चालू वर्षीच्या टेनिस हंगामातील हा 10 वा सामना आहे. नदालने इटालीयन खुली टेनिस स्पर्धा विक्रमी 10 वेळेला जिंकली आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या अन्य सामन्यात सर्बियाच्या मेजेडोव्हिकने अॅलेक्सि पॉपीरीनचा 6-3, 6-2, थियागो सिबोथने फ्रान्सच्या बॅरेरीचा 6-4, 6-2, डॉम्निक कॉफेरने व्हेवासोरीचा 6-4, 6-3 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली.
महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने अमेरिकेच्या पेराचा 6-0, 6-2, अमेरिकेच्या कोको गॉफने मॅग्डेलेना फ्रेचचा 6-3, 6-3, जपानच्या नाओमी ओसाकाने मार्टा कोस्ट्युकचा 6-3, 6-2 तसेच जर्मनीच्या केर्बरने कुडेर मेटोव्हाचा 6-3, 6-0 असा पराभव केला.