For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीत स्पेनचा ‘फ्लॅमेंको’ !

06:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीत स्पेनचा ‘फ्लॅमेंको’
Advertisement

नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी अन् दुसऱ्या दशकाच्या आरंभी जागतिक फुटबॉलमध्ये जबरदस्त दबदबा राहिला तो स्पेनचा...कासिलास, टोरेस, फाब्रिगास, विला, शावी हर्नांडेझ, शाबी, इनेस्टा अशी ती तुफानी पलटण मैदानावर उतरण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणणारी...त्या तुलनेत यंदाच्या ‘युरो’मध्ये उतरलेल्या स्पॅनिश संघात तशा प्रकरची भारी नावं नव्हतीच. तरीही जर्मन भूमीवर दर्शन घडलं ते स्पेनचं राष्ट्रीय नृत्य असलेल्या ‘फ्लॅमेंको’चंच अन् त्यापुढं भलेभले दिग्गज गारद झाले...

Advertisement

‘तो’ युवा संघ यजमान जर्मनीच्या विमानतळावर उतरला तेव्हा ‘त्यांच्या’कडून अपेक्षा फारशा नव्हत्याच...शिवाय फुटबॉलवेडे रसिक शोधत होते ते ‘त्या’तील प्रसिद्ध खेळाडूंचे चेहरे...परंतु सहा आठवड्यांच्या कालावधीनंतर कर्णधार आल्वारो मोराटाचा चमू ‘युरोपियन चषक’ घेऊन स्पेनच्या दिशेनं कधी पळाला ते भल्या भल्या जागतिक विश्लेषकांना देखील कळलं नाही, समजलं नाही...आणि मग अचानक साऱ्या विश्वाला त्या ‘टीम’च्या क्षमतेची कल्पना आली...

यमाल नि निको विल्यम्स (22 वर्षं 2 दिवस वयाचा हा खेळाडू ‘युरो’ चषकाच्या अंतिम सामन्यात गोल नोंदविणारा दुसऱ्या क्रमांकाचा तरुण खेळाडू ठरला. शिवाय त्या लढतीचा ‘सामनावीर’ पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला तो त्यालाच) या युवा खेळाडूंचा ‘पर्फेक्ट’ ताळमेळ अन् त्यांना मिळालेली अनुभवी रोद्री नि इतरांची साथ यांनी स्पेनला अभूतपूर्व यश मिळवून दिलंय...विशेष म्हणजे वरील खेळाडूंना त्यापूर्वी एखाद्या प्रमुख चषकाचं दर्शन कधीही घडलेलं नव्हतं. रविवारी झालेल्या ‘युरो 2024’च्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर 2-1 अशी मात केल्यानं त्यांची स्वप्नं अक्षरश: क्षणार्धात पूर्ण झाली. स्पर्धेतील सर्वांत मोठी बाब म्हणजे स्पेननं नाव कमावलं ते आक्रमक शैलीनं खेळणारा संघ म्हणून व त्यामुळं सुटका झाली ती गेल्या 10 वर्षांतील ‘टिकी-टाका’ पद्धतीतून (मोठ्या प्रमाणात छोटे पासेस पुरविणं)...

Advertisement

सामन्याच्या 47 व्या मिनिटाला स्पेनचा पहिला गोल नोंदविणारा विल्यम्स म्हणाला, ‘मला आशा आहे की, येऊ घातलेल्या दिवसांत सध्याच्या शैलीत बदल होणार नाही आणि विश्वचषक स्पर्धेत सुद्धा यश मिळविण्याची क्षमता संघात दडलीय’...स्पॅनिश खेळाडूंच्या, त्या राष्ट्रातील फुटबॉलवेड्या रसिकांच्या उत्साहानं अवकाशात झेप घेतलीय आणि त्यात काहीही वावगं नाही. कारण स्पेननं सर्व सात सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं ते पेनल्टी शूटआऊटचा आधार न घेता. त्यांनी युरोपियन स्पर्धेतील विक्रमी 15 गोलांची नोंदही केली. स्पेननं गटात क्रोएशिया अन् इटलीचा फडशा पाडला, तर अंतिम सामन्याला धडक देण्यापूर्वी धूळ चारली ती जर्मनी नि फ्रान्सला...

रोद्री म्हणतो, ‘आम्ही नवीन इतिहास लिहिलाय. कारण स्पनेनं पराभव केला तो चार जगज्जेत्यांचा’...विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या मध्यंतरानंतरच्या 45 मिनिटांत दुखापतीमुळं रोद्रीला खेळणं जमलं नाही. पण या ‘स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून निवड झाली ती त्याचीच...गेली तब्बल 12 वर्षं स्पेन आतूरतेनं एखाद्या प्रमुख स्पर्धेच्या जेतेपदाची वाट पाहत होता अन् ती इच्छा शेवटी पूर्ण झालीय. आंद्रे इनेस्टा आणि शावी हर्नांडेझ या विश्वविख्यात फुटबॉलपटूंच्या चमूनं 2008 अन् 2012 मध्ये झालेल्या ‘युरो’ स्पर्धा जिंकल्या होत्या व 2010 सालच्या विश्वचषकावरही ताबा मिळविला होता...

रोद्रीनं म्हटलंय की, निवृत्त झालेल्या महान खेळाडूंनी आम्हाला वाट दाखविली नि आम्ही त्यावरून प्रवास केला...स्पॅनिश संघातील एखाद्या प्रमुख चषकाचं दर्शन घेतलेला एकमेव खेळाडू म्हणजे 38 वर्षांचा जिझस नावास. त्याला 2010 सालच्या विश्वचषक स्पर्धेत नि 2012 सालच्या ‘युरो’ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. विशेष म्हणजे स्पेनचं यश पाहण्यासाठी स्टेडियममध्ये इनेस्टा, शावी, त्यांचा माजी खतरनाक ‘स्ट्रायकर’ डेव्हिड विला हजर होते. त्यांना पाहायला मिळाली ती युवा स्पॅनिश खेळाडूंची नवीन आक्रमक शैली...

दरम्यान, उपविजेत्या इंग्लंडच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब म्हणजे 1966 साली विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांना गेल्या 58 वर्षांत एकही प्रमुख जेतेपदाचं दर्शन घेता आलेला नाही आणि ती परंपरा मोडणं यंदाही त्यांना जमलं नाहीये...तथापि, इंग्लिश इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत यशस्वी प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे गॅरेथ साऊथगेट यांच्यावर मात्र राजीनामा देण्याची पाळी आलीय. त्यांच्या कारकिर्दीत यंदाप्रमाणं 2021 मध्ये सुद्धा ‘युरो’ची अंतिम फेरी इंग्लंडनं गाठली होती. शिवाय दोन वेळा प्रमुख स्पर्धांच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली...असो !

2012 मध्ये ‘युरो’ जिंकल्यानंतर स्पेनच्या संघानं नेहमीच त्यांच्या प्रतिभेवर सातत्यानं अन्याय केला असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे गोल करण्यापेक्षा चेंडूवर जास्तीत जास्त ताबा मिळविण्याचं वेड...जर्मनीत मात्र स्पेननं नवीन हत्याराचा वापर केला नि प्रतिस्पर्ध्यांवर बचावासाठी अक्ष्रश: मैदानात पळण्याचा प्रसंग आणला...अजूनही त्या जुन्या शैलीचं दर्शन कित्येक वेळा घडलेलं असलं, तरी ते राष्ट्र बदलतंय एवढं मात्र खरं. कारण ‘विंग्स’ हा स्पॅनिश संघाचा मजबूत पैलू बनलाय !

यामालची कमाल...

  • जर्मनीत स्पेननं विश्वाला आपल्या नव्या क्षेपणास्त्राचं दर्शन घडविलं...अंतिम सामन्याच्या एक दिवस पूर्वी वयाची अवघी 17 वर्षं पूर्ण करणारा, स्पर्धेतील सर्वोतम युवा खेळाडूचा किताब जिंकणारा लमिन यमाल...
  • यमालनं क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात स्पेनचं प्रतिनिधीत्व केलं नि इतिहास घडविला. ‘बार्सिलोना’च्या या ‘फॉरवर्ड’चं त्यावेळी वय होतं 16 वर्षं व 338 दिवस. युरोपियन स्पर्धेत सहभागी झालेला तो आतापर्यंतचा सर्वांत कमी वयाचा फुटबॉलपटू. त्यानं मात केली ती 2020 सालच्या ‘युरो’मध्ये खेळलेल्या पोलंडच्या कॅस्पर कॉझलोवस्कीवर (17 वर्षं नि 246 दिवस)...
  • यमालनं दुसरा विक्रम साजरा केला तो फ्रान्सविरुद्ध अक्षरश: दर्जेदार गोल करून. त्यासरशी तो बनला ‘युरो’मध्ये गोल नोंदविणारा सर्वांत तरुण वयाचा फुटबॉलपटू (16 दिवस व 362 दिवस)....

कोण हा लमिन यमाल ?...

  • ‘युरो’मध्ये चर्चा राहिली ती लमिन यमालचीच...त्यानं आपल्या प्रभावी कौशल्यानं आणि मैदानावरील अष्टपैलूत्वानं फुटबॉल जगताला वेड लावलंय...एक तऊण स्थलांतरित ते राष्ट्रीय संघातील ‘स्टार’ हा त्याचा प्रवास प्रेरणादायीच म्हणावा लागेल...
  • बार्सिलोनामध्ये जन्मलेल्या यमालचे पालक इक्विटोरियल गिनी नि मोरोक्कन वंशाचे. यमाल हा इतक्या लहान वयात स्पॅनिश संघाचा प्रमुख खेळाडू बनलाय तो त्याचा वेग, चपळता आणि गोल करण्याच्या क्षमतेच्या जोरावर...
  • यमालची झेप सुरू झाली ती ‘बार्सिलोना’ फुटबॉल क्लबच्या युवा श्रेणीतून. पण त्याला खरा ‘ब्रेक’ मिळाला तो ‘सेव्हिल क्लब’मध्ये सामील झाल्यावर. तिथं ‘स्टार्टर’ म्हणून जम बसविण्यास त्याला वेळ लागला नाही. त्यानंतर संघाला अनेक विजेतेपदं पटकावण्यास त्यानं मदत केली...
  • यमालची वाटचाल स्पॅनिश राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकांच्या नजरेत लगेच भरली आणि त्याचं पदार्पण घडलं ते 2023 मध्ये. तेव्हापासून तो स्पेनचा अविभाज्य भाग बनलाय. त्यानं आतापर्यंतच्या कारकिर्दीत मोलाचे गोल करण्याबरोबर महत्त्वाच्या सामन्यांमध्ये गोल नोंदविण्यासाठी साहाय्यही केलंय...
  • यंदाची ‘युरो’ ही यमालच्या कारकिर्दीतील पहिली मोठी अंतिम फेरी...त्याला इतरांहून वेगळं ठरवतं ते सर्जनशीलता, झपाटा आणि मैदानावरील दूरदृष्टी यांचं अनोखं मिश्रण. खेळाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याची आणि सहकाऱ्यांसाठी गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याची त्याची क्षमता चाहत्यांसाठीच नव्हे, तर फुटबॉल पंडितांसाठी देखील कौतुकाचा विषय बनलीय...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.