स्पेनचा अल्कारेझ उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ मोनॅको
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना फ्रान्सच्या फिल्सचे आव्हान संपुष्टात आणले. दुसऱ्या एका सामन्यात ग्रीकचा या स्पर्धेतील विद्यमान विजेता सित्सिपस याचे आव्हान उपांत्य पूर्व फेरीत इटलीच्या मुसेटीने संपुष्टात आणले.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अल्कारेझने फ्रान्सच्या आर्थर फिल्सचा 4-6, 7-5, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना अडीच तास चालला होता. अनुभवी अल्कारेझचा उपांत्य फेरीचा सामना स्पेनच्या फोकिनाशी होणार आहे. फोकिनाने ऑस्ट्रेलियाच्या पॉपिरीनचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेता ग्रीकच्या सित्सिपसला इटलीच्या लोरेंझो मुसेटीने पराभूत केले. मुसेटीने सहाव्या मानांकित सित्सिपसवर 1-6, 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये मात करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. मुसेटीचा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या मिनॉरशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने केवळ 44 मिनिटांच्या कालावधीत बल्गेरीयाच्या टॉप सिडेड डिमीट्रोव्हचा 6-0, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली.