For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोर्तुगालला 1-0 ने नमवून स्पेन उपांत्यपूर्व फेरीत

06:56 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोर्तुगालला 1 0 ने नमवून स्पेन उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

दुसऱ्या सत्रामधील ‘स्टॉपेज टाइम’च्या पहिल्याच मिनिटाला मेरिनोकडून गोल

Advertisement

वृत्तसंस्था, आर्लिंग्टन, टेक्सास : निर्धारित वेळेच्या अखेरच्या मिनिटांत मिकेल मेरिनो राखीव खेळाडूंच्या बाकावर होता. सामना अतिरिक्त वेळेत जाण्याची शक्यता असल्याने स्पेनचे प्रशिक्षक लुईस डी ला फुएंटे आपल्या राखीव खेळाडूंना शक्य तितके उशिरा मैदानात उतरविण्याच्या विचारात होते. मात्र, आर्सेनलचा आघाडीपटू असलेल्या मेरिनोने ती चिंता अनावश्यक ठरवली. त्याने दुसऱ्या सत्रामधील ‘स्टॉपेज टाइम’च्या पहिल्याच मिनिटाला गोल केला आणि स्पेनने पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत सुपरस्टार क्रिस्तियानो रोनाल्डोच्या विश्वचषक कारकिर्दीचा शेवट केला.

मेरिनो त्यावेळी खाली पडला होता आणि ‘फाऊल’ देण्यात आले होते. पोर्तुगालचा बर्नाडो सिल्वा या निर्णयावर वाद घालत असतानाच मेरिनोने चेंडू पुन्हा खेळात आणला आणि गोलच्या दिशेने धाव घेतली. फेरान टोरेसने मधून दिलेल्या उत्कृष्ट पासनंतर काही पासेसची देवाणघेवाण झाली आणि शेवटी मेरिनोने गोलरक्षक डियोगो कॉस्ताला सहज चकवत गोल केला.

Advertisement

मेरिनो 85 व्या मिनिटाला मैदानात उतरला होता. त्याच्या सतर्क खेळाने त्याच्या अष्टपैलूत्वाची झलक दाखवून दिली. त्याच्या याच गुणांमुळे आर्सेनलला 20 वर्षांहून अधिक काळानंतर यावेळी पहिले प्रीमियर लीग विजेतेपद जिंकता आले होते. उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे आर्सेनलसोबतचा त्याचा हंगाम अर्धवट संपला होता. त्यामुळे मेरिनोचा विश्वचषकातील सहभागही अनिश्चित होता. पण स्पेनसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी ताजातवाना होऊन तो मैदानात उतरला आणि त्याने आपल्या डाव्या पायाने चेंडू जाळीच्या डाव्या कोपऱ्यात मारत गोल पूर्ण केला. मिकेल मेरिनोचा हा पहिलाच विश्वचषक गोल आणि राष्ट्रीय संघासाठीचा 11 वा गोल होता.

दुसरीकडे, रोनाल्डोला सर्वांत चांगली संधी 37 व्या मिनिटाला एका चपळ ‘बॅकवर्ड किक’च्या वेळी मिळाली होती. तेव्हा जुआंव फेलिक्सचा हेडर सिमॉनच्या डाव्या खांद्याला लागून हवेत उडाला आणि रोनाल्डोकडे आला. त्याने उजव्या पायाने चेंडू फ्लिक केला, पण तो फटका पुरेसा वेगवान नसल्यामुळे सिमॉनला सावरण्याची आणि उडी मारून चेंडू पकडण्याची संधी मिळाली.

सामन्याच्या शेवटी मिळालेल्या आठ मिनिटांच्या ‘स्टॉपेज टाइम’मध्ये बरोबरी साधण्यासाठी पोर्तुगालने आटोकाट प्रयत्न केले. त्यात सिल्वाचा हेडर गोलजाळीच्या अगदी वरून गेला. विश्वचषकातील पोर्तुगालविरुद्धची अन्य एक लढत स्पेनने 1-0 अशा फरकाने जिंकली होती. ती देखील 16 संघांच्या फेरीमधीलच लढत होती. आणि त्यावेळी स्पेनच्या संघाने दक्षिण आफ्रिकेत विजेतेपद पटकावले होते.

सलग सहा सामने गोल न स्वीकारलेला स्पेन पहिला संघ

सलग 35 सामन्यांत अपराजित राहिलेल्या स्पेनने 2010 मध्ये एकमेव विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्यांना आता शुक्रवारी कॅलिफोर्नियातील इंग्लेवूड येथे बेल्जियमविऊद्ध खेळावे लागेल. विश्वचषकात सलग सहा सामने गोल न स्वीकारलेला स्पेन हा पहिला संघ ठरला आहे.

क्रिस्तियान रोनाल्डोचे स्वप्न राहिले अधुरे

पोर्तुगालला सलग दुसऱ्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत नेण्याचा रोनाल्डोचा प्रयत्न होता. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल (146) केलेल्या आणि सर्वाधिक सामने (233) खेळलेल्या या खेळाडूची फुटबॉलच्या सर्वांत मोठ्या मंचावरील कारकीर्द आता संपुष्टात आली आहे. आठ वर्षांपूर्वी गट फेरीतील सलामीच्या सामन्यात पोर्तुगालची स्पेनविऊद्ध 3-3 अशी बरोबरी झाली होती, ज्यात रोनाल्डोने आपली एकमेव विश्वचषक ‘हॅट्ट्रिक’ साधली होती. हा सामना स्पर्धेतील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक मानला जातो. या 41 वर्षीय सुपरस्टारने या स्पर्धेत तीन गोल केले, परंतु स्पेनचा गोलरक्षक उनाई सिमॉनविऊद्ध त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत.

Advertisement
Tags :

.