For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

16 वर्षांनी स्पेन प्रथमच उपांत्य फेरीत

06:58 AM Jul 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
16 वर्षांनी स्पेन प्रथमच उपांत्य फेरीत
Advertisement

बेल्जियमवर 2-1 ने मात, फॅबियन रूईझ, मेरिनो यांनी केले गोल, आता टक्कर बलाढ्या फ्रान्सशी

Advertisement

वृत्तसंस्था, इंग्लवूड, कॅलिफोर्निया : मिकेल मेरिनो पुन्हा एकदा स्पेनचा विश्वचषक नायक ठरला आहे. मेरिनोने 88 व्या मिनिटाला गोल करून स्पेनला शुक्रवारी 2-1 असा विजय आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. स्पर्धेतील प्रबळ दावेदार फ्रान्सशी आता त्यांची गाठ पडेल.

पोर्तुगालला हरवताना बदली खेळाडू म्हणून अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल केल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमच्या गोलरक्षकाने चेंडू सोडला त्यावेळी मेरिनो पुन्हा एकदा योग्य ठिकाणी होता. बेल्जियमचा गोलरक्षक सेने लॅमेन्सने ही संधी उपलब्ध करून दिली. मूळ गोलरक्षक थिबाउट कोर्टुआ दुखापतग्रस्त झाल्यामुळे 71 व्या मिनिटाला लॅमेन्सला त्याच्या पहिल्याच विश्वचषक सामन्यात उतरावे लागले. 86 व्या मिनिटाला मैदानात आलेल्या मेरिनोने सामन्यातील आपल्या दुसऱ्याच ‘टच’वर गोल केला. पाऊ कुबारसीचा लांबून मारलेला फटका लॅमेन्सच्या हातातून निसटला आणि मेरिनोने वेगाने ‘बॉक्स’मध्ये घुसून त्यावर झडप घालत गोल नोंदवला.

Advertisement

स्पेनसाठी फॅबियन ऊईझने 30 व्या मिनिटाला ‘रिबाउंड’वर गोल केला, परंतु 41 व्या मिनिटाला बेल्जियमचा आघाडीपटू चार्ल्स डी केटेलेरे याने गोल करून बरोबरी साधली. या संपूर्ण विश्वचषकात स्पॅनिश संघाने स्वीकारलेला हा पहिलाच गोल होता. मोठा उलटफेर करण्याच्या इराद्याने खेळणाऱ्या बेल्जियमविऊद्ध मेरिनोने केलेल्या या निर्णायक गोलमुळे स्पेनचा संघ 2010 नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

स्पेन आणि फ्रान्स मंगळवारी टेक्सासच्या आर्लिंग्टनमध्ये आमनेसामने येतील. या वर्षीच्या विश्वचषकात दोन्हीपैकी एकाही संघाचा पराभव झालेला नाही. ही दोन दिग्गज संघांमधील लढत असेल, असे स्पेनचे प्रशिक्षक लुईस डी ला फुएन्ते यांनी सांगितले. आम्ही तो सामना जिंकण्यास सक्षम आहोत आणि केवळ आताच नाही, तर काही आठवड्यांपूर्वीही मी हेच म्हटले असते. ते फुटबॉलमधील एक बलाढ्या संघ आहेत, पण मला आमच्या संघावर विश्वास आहेठ, असे त्यांनी सांगितले.

सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत बरोबरी साधण्यासाठी बेल्जियमने आक्रमक प्रयत्न केले आणि बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेला आरोमेलू लुकाकूने या प्रयत्नांचे नेतृत्व केले. मात्र, ‘इंज्युरी टाइम’च्या दुसऱ्या मिनिटाला मिळालेली सर्वोत्तम संधी आयमेरिक लॅपोर्टने चपळाईने ‘व्हॉली’ मारून विफल ठरविली आणि चेंडू बॉक्सबाहेर काढला.

मार्च 2023 पासून स्पेन सलग 37 स्पर्धात्मक सामन्यांत अपराजित राहिला आहे, तर दुसरीकडे बेल्जियमची सर्व स्पर्धांमधील सलग 18 सामने अपराजित राहण्याची मालिका या सामन्याने खंडित झाली. या स्पर्धेतील आपल्या पहिल्या पाच सामन्यांत स्पेनने प्रतिस्पर्ध्याला एकही गोल करू दिला नव्हता. ही मालिका जेव्हा डी केटेलेरेने कुबारसीला मागे टाकत टिमोथी कॅस्टाग्नेने दिलेल्या ‘क्रॉस’वर हेडरद्वारे गोल करून बेल्जियमसाठी बरोबरी साधली तेव्हा खंडित झाली.

मेरिनो पुन्हा ठरला स्पेनचा नायक

आपल्या देशासाठी किंवा इंग्लिश क्लब आर्सेनलसाठी एक राखीव खेळाडू म्हणून कोणत्याही भूमिकेत आधीपासूनच अष्टपैलू योगदान देणारा मेरिनो आता एका सर्वोत्कृष्ट सुपर-सबमध्ये रूपांतरित झाला आहे. त्याने अव्वल प्रतिस्पर्ध्यांविऊद्धच्या दोन बाद फेरीच्या सामन्यांमध्ये टिकून राहण्यासाठी स्पेनला ज्याची नेमकी गरज होती ती पूर्ण केली आहे. मेरिनोने आपल्या पहिल्या विश्वचषकात दोन गोल केले आहेत आणि ते दोन्ही ऐतिहासिक आहेत. मेरिनोने स्वत:च कबूल केले की, त्याला नशिबाचीही साथ मिळाली.

गोलरक्षक कोर्टुआची दुखापत बेल्जियमला पडली महागात

कोर्टुआने चार बचाव केले, परंतु दुसऱ्या सत्रात एका लांब किकनंतर ‘रेयाल माद्रिद’चा हा गोलरक्षक मैदानावर खाली कोसळला. ‘हायड्रेशन ब्रेक’दरम्यान त्याला वैद्यकीय उपचार देण्यात आले, परंतु काही क्षणांनंतर प्रशिक्षक ऊडी गार्सिया यांनी त्याला बाहेर बोलावले तेव्हा तो भावूक होऊन रडू लागला. कोर्टुआ 21 विश्वचषक सामने खेळला आहे. त्याच्यापेक्षा जास्त सामने केवळ जर्मनीचा मॅन्युएल न्युअर खेळला आहे. यामुळे मँचेस्टर युनायटेडचा गोलरक्षक लॅमेन्स गेल्या चार विश्वचषक स्पर्धांमधील कोर्टुआव्यतिरिक्त बेल्जियमसाठी खेळणारा पहिला गोलरक्षक बनला. पण सामना बरोबरीत राखणारा बचाव करण्यात त्याला अपयश आले.

‘मी विजयी गोल पुन्हा एकदा केला आहे आणि माझ्यासोबत हे पुन्हा घडले आहे, त्यामुळे योगायोग अस्तित्वात असतो असे दिसते’

- मेरिनो, स्पॅनिश खेळाडू

Advertisement
Tags :

.